पणती जपून ठेवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

चांगल्या बाजू अधिक उजळविण्यासाठी; आणि अंधारलेल्या बाजूंना प्रकाशाच्या मदतीनं सावरण्यासाठी दिवाळीची योजना असते. हे दीप जितके कणखर होतील, तितका दीपोत्सवाचा प्रकाश आसमंत उजळून टाकील

दिवाळीचा सण केवळ माणसांचीच मनं उजळून टाकणारा असतो असं नव्हे; तर चराचर सृष्टीलाच तो नवं रूप बहाल करतो. विजयादशमीच्या निमित्तानं सीमोल्लंघन करून आणखी उत्तुंग दिग्विजयासाठी निघालेली पावलं दिवाळीत प्रकाशचिन्हं उमटवीत स्वतःच्या वाटांच्या दिशा निश्‍चित करीत असतात. त्यांच्या ओंजळीत उद्दिष्टांचे दिवे असतात; आणि पावलांत स्वप्नपूर्तीचा ध्यास असतो. आकाशदिव्यांनी झगमगून गेलेले रस्ते चालणाऱ्यांचे आश्‍वासक आधार होतात. दिवा घेऊन पुढं जाणारा एकटा असला, तरी आजूबाजूनं येणाऱ्या तशाच अनेक झगमगाटांचं वेगळं जगच या पदयात्रींच्या समूहासाठी खुलं होतं. दिवाळीचा सण अंधाराचा नाश करतो; आणि आपल्या जगण्याला प्रकाशाची जोड देतो. धरतीवरलं कधीकाळचं अंधारयुग काही आपोआप संपलं नाही. उजेडाचा शोध घेण्यासाठी माणसांनी सातत्यानं प्रयत्न केले; आणि एका क्षणी गारगोट्यांच्या घर्षणातून ठिणगी चमकली. त्या एका झगमगीत बिंदूनं अंधाराच्या भवतालाचा भेद केला; आणि या चमकदार साक्षात्कारानं मानवाच्या संस्कृतीचं प्राक्तन बदलून गेलं.

अंधारगुहांत राहणाऱ्यांना ठिणगीच्या खुणेनं एकमेकांजवळ आणलं. ठिणगीनं अग्नी प्रज्वलित करण्याचं तंत्र माणसाच्या समूहांना गवसलं. प्रकाश आणि उष्णता ही महत्त्वाची आयुधं त्यांना लाभली; आणि त्यांच्या जोरावर माणसांनी जगाच्या गोलावर आपली विजयमुद्रा उमटविली. उजेडाचा ध्वज खांद्यावर घेऊन माणूस जगाचे कोनेकोपरे शोधण्यासाठी निघाला. अंधाराच्या ओझ्याखाली दडपली गेलेली त्याच्यासारखीच कित्येक माणसं या प्रवासात त्याला भेटली. निसर्गाची विविध रूपं त्याच्यापुढं उलगडत गेली. प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं अचंबित करणारं अनोखं जग त्याला माहीत झालं. झाडावेलींचं, पानाफुलांचं आणि फळांचं मैत्र त्याला मिळालं. सूक्ष्म आणि अजस्र आकारांची ओळख त्याला झाली. लख्ख प्रकाशात जे जे दिसलं, त्याच्या पुढं माणूस नतमस्तक झाला. त्यांचे अर्थ शोधू लागला. माणसाच्या संस्कृतीची मुळाक्षरं प्रकाशाच्या अशाच पानांवर लिहिली गेली. या मुळाक्षरांनी माणसाला शब्द दिले, ध्वनी दिला, भाषा शिकविली. माणसांना त्यातच विचारांचे तेजोमय दीप मिळाले. पृथ्वीचा गोल आणि गगनाचा गाभारा या अवकाशात माणसाची संस्कृती साकारत आणि बहरत गेली. जे जे उन्नत, उदात्त दिसलं, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणूस या प्रतीकांची पूजा करू लागला. पणती, निरांजन, समई, पंचारती, दिवट्या, पलिते, दीपमाळा, तेजोगोल अशी विविध अग्निरूपं माणसाच्या उपासनेत आली. माणूस दगडांची, झाडांची, नद्यांची पूजा बांधू लागला. दिशांच्या कडा अंधकारानं काजळरंगी होऊ लागल्या, की आजही तुळशीवृंदावनाजवळ आणि घरात दीप लावण्यात येतो. हा युगायुगांचा संस्कार आहे.

मंत्र, अभंग, ओव्या, भारुडं आणि रसाळ निरूपणं यांचे दीप उजळले, तेव्हा सगळीकडं भक्तीचं तेज पसरलं. शिवछत्रपतींसारख्या तेजस्वी आणि स्फूर्तिदात्या "श्रीमंत योग्या'च्या अतुलनीय पराक्रमानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; आणि तळपत्या तलवारींनी क्षात्रतेजाच्या अखंडित विजयाची द्वाही फिरविली. जुलूम, अन्याय-अत्याचार, अमानुष रूढी-परंपरा यांचे मळभ गडद होऊ लागले, तेव्हा प्रबोधनाचे पलिते पेटून उठले; आणि त्यांनी त्या अंधारयुगाचा निरास केला. क्रांतिकारकांच्या पराक्रमानं दास्यशृंखला तोडून टाकल्या, तेव्हा स्वाभिमानाच्या दीपमाळांनी माणसांचे समूह प्रकाशपर्वात न्हाऊन निघाले; आणि स्वातंत्र्याचा मुक्त आनंद घेऊ लागले. संशोधन, सखोल चिंतन यांतून ज्ञानाचे असंख्य दीप उजळून गेले; आणि प्रज्ञेचं तेज दशदिशांना पोचलं. कलांच्या वृद्धीनं संस्कृतीच्या धाग्यांची वीण अधिक घट्ट होत गेली. माणसाच्या प्रयत्नांनी एक ठिणगी चमकली; आणि त्या प्रकाशरेषेनं केवढं मोठं मन्वंतर घडून आलं! दीपावली म्हणजे तर तेजाचा महोत्सव. त्या निमित्तानं युगांपूर्वीच्या उजळलेल्या ठिणगीची आठवण जागी करायची, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची; आणि नव्या सांस्कृतिक नोंदी करण्यासाठी आपणही अशीच एखादी ठिणगी प्रज्वलित करण्याची जिद्द बाळगायची. ठिणगी एकटी असली, तरी अनेक ठिणग्या पेटविण्याची ताकद तिच्यात असते. बीजमंत्राचं सामर्थ्यही असंच अमर्याद असतं. ते ब्रह्मांडालाही व्यापून उरतं. दीपतेजाचा हा सण एका ठिणगीचं महत्त्व अधिक ठळक करणारा असतो.

दर वर्षीची दिवाळी वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीवर येत असते. तिच्या आधीच्या काळाला अनेक संदर्भ जोडलेले असतात. जय-पराजय, यश-अपयश, कडू-गोड आठवणी यांचा लांबलचक पडदा दोन दिवाळ्यांच्या मध्ये पसरलेला असतो. काही ठिकाणचे भूगोल बदलतात. इतिहासाची फेरमांडणी होते. नैसर्गिक आपत्तींचे पहाड कोसळतात. दहशतवादाची रौद्र रूपं सामोरी येतात; आणि त्यातून नवी उतरंड आकाराला येते. त्यांतील चांगल्या बाजू अधिक उजळविण्यासाठी; आणि अंधारलेल्या बाजूंना प्रकाशाच्या मदतीनं सावरण्यासाठी दिवाळीची योजना असते. नेहमीचे ताणतणाव, चिंता, दुःखद आठवणी पाठीवर टाकून माणसं दिवाळीच्या दिवसांत एकत्र येतात. सुखाचे चार क्षण साजरे करतात; आणि पुन्हा रोजच्या धावपळीत मिसळून जातात. पावलांना पुढं जावंच लागतं; पण त्यांच्या बरोबरीनं नवा उत्साह घेऊन जायचा असतो. आजूबाजूनं वादळं घोंघावत असली, तरी प्रकाशरेषेचा शोध थांबवायचा नसतो, हेच मानवी संस्कृती सांगते. "अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' असं वारंवार सांगण्याची; आणि ते आचरणात आणण्याची गरज असते; किंबहुना आजच्या गतिमान बदलांच्या काळात तर ते आवश्‍यकही आहे. अंधारक्षण दाटून येणारच; आणि म्हणूनच हातांच्या तळव्यांनी दिव्याची ज्योत सांभाळायची असते. साधीसुधी माणसं त्यांची जगण्याची लढाई अशा दीपज्योतीला सावरूनच लढत असतात. हे दीप जितके कणखर होतील, तितका दीपोत्सवाचा प्रकाश आसमंत उजळून टाकील. समाजबांधणीची, समाजउभारणीची पणती तेवत ठेवण्याचे आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Web Title: editorial