आनंदझड

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 23 मार्च 2017

ऊन तापू लागलं आहे. दशदिशांचे कोपरे ऊष्णभाराच्या दाटीवाटीनं भरून गेले आहेत. झाडांचे हात सोडून देऊन वारं गायब झालं आहे. पक्ष्यांचे भरारही विरळत चालले आहेत. नद्या-ओढे आक्रसले आहेत. पाणवठे सुकू लागले आहेत. झाडांखाली घरंगळून आलेले सावलीचे गोल ऊनझळांनी कोरडे पडलेले आहेत. पानांचे चेहरे सुकून गेले आहेत. फुलांच्या पाकळ्यांचे निःश्वास वाढत चालले आहेत. मातीचा कणन्‌कण भाजून काढला जात आहे. हवेतील उरलासुरला थंडावा ओढून घेण्यासाठी घरट्यांच्या तोंडांशी पक्ष्यांच्या चोचींचे ‘आ’कार रुंदावत चालले आहेत. त्यांचे चिवचिवते हाकारेही शुष्क झाले आहेत. जनावरांचे कळप पाणथळ जागांच्या शोधात देशांतराला निघाले आहेत.

ऊन तापू लागलं आहे. दशदिशांचे कोपरे ऊष्णभाराच्या दाटीवाटीनं भरून गेले आहेत. झाडांचे हात सोडून देऊन वारं गायब झालं आहे. पक्ष्यांचे भरारही विरळत चालले आहेत. नद्या-ओढे आक्रसले आहेत. पाणवठे सुकू लागले आहेत. झाडांखाली घरंगळून आलेले सावलीचे गोल ऊनझळांनी कोरडे पडलेले आहेत. पानांचे चेहरे सुकून गेले आहेत. फुलांच्या पाकळ्यांचे निःश्वास वाढत चालले आहेत. मातीचा कणन्‌कण भाजून काढला जात आहे. हवेतील उरलासुरला थंडावा ओढून घेण्यासाठी घरट्यांच्या तोंडांशी पक्ष्यांच्या चोचींचे ‘आ’कार रुंदावत चालले आहेत. त्यांचे चिवचिवते हाकारेही शुष्क झाले आहेत. जनावरांचे कळप पाणथळ जागांच्या शोधात देशांतराला निघाले आहेत. उदंड पाणीसाठ्यांचा शेजार धुंडाळून माणसांनी वस्ती केली. वाढत्या वस्तीनं आता सारेच पाणीसाठे प्राशन करून टाकले आहेत. पाण्याच्या थेंबाच्या शोधात माणसं रानोमाळ निघाली आहेत. डोंगर फोडून पाहताहेत. खडकांचे तळ उचकटून पाहताहेत. पाण्याचे थेंब जणू डोळ्यांतील पाण्यांसह माणसांना पारखे झाले आहेत. 

अशा रखरखीत वातावरणातही एखाद्या कातळाच्या कोपऱ्याशी कोवळं हसू घेऊन इवल्या पानांचे निरागस चेहरे आशेचा महोत्सव साजरा करण्यात गुंग झालेले दिसतात. त्या एवढ्याशा लुसलुशीत जिवाची नोंद क्वचितच कुणी घेत असेल. पूर्वी कधीही न पाहिलेल्या याचकाला तृप्त सावलीचं, फुलाफळांचं भरलं दान देण्याच्या निर्मम ओढीनं हा जीव तिथं तगमगत असतो. कडक ऊन कधी तरी निवळतं, आभाळ कधी ना कधी भरून येतं, त्यातून धावत येणारं आवेगी पाऊसगाणं आपल्या आशेला गातं करतं, या सृष्टिक्रमावर त्या सतेज पानांची किती गाढ श्रद्धा असते! अमूक एक गोष्ट नक्की होणारच, अशा विश्वासानं ज्यांचं आयुष्य बहरलेलं असतं, त्यांना फुलून आलेल्या झाडाचं भाग्य आपोआपच लाभतं. ‘नाही’ हा एवढा एकच शब्द आयुष्यातून वजा करून टाकला, तर आपल्या ओंजळीत होकाराच्या फुलांचे किती तरी घोस एकसारखे हसत-नाचत राहतील. या फुलांच्या गंधकंपनांचा दरवळ आपल्या प्रत्येक कृतीचं पूजाविधीत रूपांतर करील. 

मरगळलेल्या उन्हाळ दुपारी वारंदेखील मलूल झालेलं भासतं; पण त्याच वेळी आपल्या मनात मेघाच्छन्न अंबराचं सुखद दर्शन जागं होत जातं. पक्ष्यांचे थवे भरारत इकडून तिकडं जात राहतात. पावश्‍याच्या हाकांतून पाऊसधारा बरसू लागल्याचा आनंदभास होऊ लागतो. त्या धारांतून तनामनात उतरणारी शिरशिरी रोमांचित करू लागते. सगळीकडं हिरवं वैभव उमलत असल्याचा भास होऊ लागतो. घनभाराचे लहरते तरंग मनाच्या वळचणीतून पाण्याच्या धारांसारखे ओघळू लागतात. परस्परविरोधी भावावस्थांचं घट्ट मैत्र असतं, तसं रखरखाटाला जोडूनच पाऊसथेंबांचं संगीतही लगडलेलं असतं. एखाद्या अशा-तशा परिस्थितीनं निराश कशाला होता? ‘ये रे घना’च्या आळवणीनंतर बरसणारी आनंदझड तिथंही थबकलेली असतेच. हात उंच करा; आणि ती झेलून घ्यायला सज्ज व्हा!

Web Title: editorial about anandzad