'भूकंपा'नंतरची धुळवड (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे यथावकाश बाहेर येईलच; पण हे आरोप सिद्ध करता आले नाहीत, तर राहुल यांचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात येऊ शकते. 
 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे यथावकाश बाहेर येईलच; पण हे आरोप सिद्ध करता आले नाहीत, तर राहुल यांचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात येऊ शकते. 
 

'मी बोललो, तर भूकंप होईल,' असे सांगत असलेल्या राहुल गांधी यांना नेमके काय बोलायचे आहे आणि असा काय तपशील त्यांच्या हाती आहे, याबद्दल कुतूहल होते. या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले असले, तरी त्यांनी नवे काय सांगितले हा प्रश्‍न आहे. तसाच पंतप्रधानांच्या शुभ्रधवल प्रतिमेला हात घालताना किमान पुरेशी तयारी तरी केली होती काय? याविषयी शंका वाटावी अशीच स्थिती आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेचे अधिवेशन वाहून गेले, तेव्हा 'मी गौप्यस्फोट करणार आहे; पण मला बोलूच दिलं जात नाही, असे राहुल सांगत होते. तेव्हा राहुल यांच्या हाती काय लागले, याचे औत्सुक्‍य होतेच; पण त्यांनी केलेल्या आरोपात संपूर्ण नवे काहीच नाही. तरीही आता कॉंग्रेससह सारे मोदीविरोधक 'पाहा, हेही तसलेच' असे सांगत राहतील आणि भाजपवाले मोदींवर शंका घेणेही पाप असल्यासारखा युक्तिवाद करतील, हे सद्यःस्थितीतील राजकारणात अपेक्षितच आहे. अनेकांना जैन हवाला डायरीत लालकृष्ण अडवानींचे नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन निर्दोष होईतोवर पदावर न राहणे निवडले, याची आठवण होऊ लागली, हेही देशात प्रत्येक मुद्यावर सुरू असलेल्या ध्रुवीकरणात स्वाभाविक आहे. 

राहुल यांनी आपल्या गौप्यस्फोटासाठी नेपथ्य मात्र नेमके उभे केले होते. गुजरात हे मोदींचे 'होम पीच'; शिवाय मेहसाणा या आरक्षणाच्या मुद्यावरून पटेल लॉबीने भाजपच्या विरोधात उभा केलेला गड. याच परिसरात गोहत्येवरून दलितांना झालेली मारहाण, असा सारा मोदीविरोधी माहोल राहुल यांनी गौप्यस्फोटासाठी निवडला होता आणि त्यांच्या सभेस गर्दीही बरीच होती. त्यामुळेच आता हा मुद्दा राहुल देशभरात विशेषत: उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुकांत लावून धरणार, यात शंका नाही. 'सीझरची पत्नी ही संशयाच्या पलीकडे असली पाहिजे!' हे तत्त्व मोदींनी चौकशीला सामोरे जावे, यासाठी जरूर सांगितले जाईल; मात्र त्याच वेळी ज्या नोंदीवरून राहुल यांनी मोदींनी 'सहारा'कडून पैसे घेतल्याचा निष्कर्ष काढला, त्यात सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिकरीत्या तरी तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे, हेही विसरण्याचे कारण नाही.

राहुल यांच्या आरोपानुसार गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणजेच ऑक्‍टोबर 2013 ते फेब्रुवारी 2014 या काळात सहारा उद्योग समूहाने मोदींना 40 कोटी रुपये दिले, हेच आरोप अरविंद केजरीवालही करत आहेत आणि प्रशांत भूषण यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मोदींना पैसे दिल्याच्या नोंदी सकृतदर्शनी गांभीर्याने घेण्यासारख्या नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या स्थितीत आणखी खोलात गेल्यानंतरच न्यायालय अंतिम निष्कर्षापर्यंत येईल, तोवर राजकीय धुळवड सुरू राहील. तसेही आपल्याकडची राजकीय संस्कृती 'चहापेक्षा किटली गरम' थाटाची असल्याने उभय बाजूंनी मुक्ताफळे उधळण्यास सुरवात झालीच आहे.

पंतप्रधानांचे चारित्र्य हे कोणत्याही संशयापलीकडचे असायला हवे, असा संकेत आहे; मात्र पंतप्रधानपदावरील व्यक्तीवर आरोप करताना किमान प्राथमिक पुरावे तरी समोर आणायला हवेत. राहुल यांनी या खडतर वाटेऐवजी आरोपांची राळ उडवण्याचा मार्ग का निवडावा, हे कोडेच आहे.

एकतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने काही ना काही आरोपांचे धनी झाले आहेत. आरोपांकडे चक्क दुर्लक्ष करत वाटचाल करायची शैली त्यांनी विकसित केली आहे. साहजिकच ठोस पुरावे नसलेल्या आरोपांनी ते विचलित होतील, चौकशीला सामोरे जातील, असे घडण्याची शक्‍यता नाही.

दुसरीकडे मोदी हे गंगेइतकेच शुद्ध असल्याची 'क्‍लीन चिट' भाजपने विनाविलंब दिली आहे, तर 'राहुल यांच्या या तथाकथित गौप्यस्फोटामुळे आता देशावरील भूकंपाचे संकट टळले आहे,' अशा शब्दांत मोदी त्यांची खिल्ली उडवत आहेत. हा मामला राजकीय वळणानेच अधिक जाईल, यात शंका नाही आणि राहुल यांना बालिश ठरवून बाकी मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असाच भाजपचा प्रयत्न राहील. राजकारण हे प्रतिमांच्या लढाईचे बनत आहे. या खेळात पारंगत मोदींसारख्या प्रतिस्पर्ध्यावर वार करण्यापूर्वी राहुल यांनी याचे भान ठेवायला हवे होते. मोदी यांची प्रतिमा हेच भाजपचे निवडणुकीच्या मैदानातील मोठे भांडवल आहे. साहजिकच राहुल यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. हाच मुद्दा आधी मांडला गेला, तेव्हा याची इतकी दखल घेतली गेली नाही. तूर्त राहुल यांचे यश असेल, तर ते इतकेच.

एका बाजूला ही राजकीय लढाई आहे, दुसरीकडे ती कायदेशीरही आहे. तिथे प्रशांत भूषण यांच्यासारखे नावाजलेले वकील ती लढत आहेत. राजकीय आरोपबाजी उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जवळ येतील तशी तीव्र होत जाईल. न्यायालयात मात्र ठोस पुरावेच मांडावे लागतील. यात थोडेही यश आले, तर मोदी यांच्या स्वच्छ प्रतिमेचा प्रश्‍न तयार होईल. असे न झाल्यास आधीच लडखडती राजकीय वाटचाल सुरू असलेल्या राहुल यांच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा तयार होईल. राहुल यांचे आरोप म्हणजे भूकंप की फुसका बार, याचा फैसला राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत आणि कायदेशीरदृष्ट्या न्यायालयाच्या पुढील सुनावणीतच होईल.

Web Title: Editorial on allegations by Rahul Gandhi on PM Narendra Modi