स्वबळाची सत्त्वपरीक्षा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

युती तोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतो; शिवाय ही शिवसेनेबरोबरच भाजपचीही सत्त्वपरीक्षा आहे.
 

युती तोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतो; शिवाय ही शिवसेनेबरोबरच भाजपचीही सत्त्वपरीक्षा आहे.
 

भारतीय जनता पक्षाशी सव्वादोन वर्षे सुरू असलेल्या हमरीतुमरीचे रूपांतर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रणकंदनात झाल्यानंतर या असलेल्या, नसलेल्या किंवा होऊ घातलेल्या युतीचा ‘निकाल’ अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला आणि यापुढे कोणत्याही निवडणुकीत कोणाही पुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे न राहण्याचे जाहीर केले! खरे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या रौप्यमहोत्सवी वर्षातच भाजपने ती तोडल्यानंतर शिवसेनेने सरकारमध्ये सामील होण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, पक्षफुटीच्या भीतीपायी उद्धव यांना तो निर्णय घेणे भाग पडले. त्या चुकीची काही प्रमाणात आता ते दुरुस्ती करू पाहत असले, तरी सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस मात्र त्यांना दाखवता आलेले नाही आणि त्यामुळेच पक्षफुटीची टांगती तलवार अद्यापही त्यांच्या डोक्‍यावर लटकत आहे काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. अर्थात, शिवसेनेला या निर्णयाप्रत येण्यास भाजपनेच भाग पडले होते!

मुंबई महापालिकेच्या सत्तेत दोन-अडीच दशके शिवसेनेबरोबर सामील असतानाही भाजपच्या बोलभांड शिलेदारांनी मुंबई महापालिकेत ‘माफियाराज’ असल्याचे आरोप सातत्याने केले. त्याचीच परिणती युती तुटण्यात झाली आहे. मात्र, अत्यंत घणाघाती भाषण करून उद्धव यांनी भाजपबरोबर संबंध न ठेवण्याचे धोरण जाहीर केल्यानंतरच्या १२ तासांत शिवसेनेचे मंत्री सरकारी कार्यालयांतील देव-देवतांचे फोटो काढण्याचे परिपत्रक काढण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांपुढे झोळी पसरून उभे राहिल्यामुळे सत्तेत भागीदार असलेल्या या दोन पक्षांचे संबंध यापुढे नेमके कसे राहणार, याबाबतचा गोंधळ कायमच आहे.

उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे नवे वळण देऊ शकतो; शिवाय ही शिवसेनेबरोबरच भाजपचीही सत्त्वपरीक्षा आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून ३५ हजार कोटींहून अधिक ताळेबंद असलेल्या मुंबई महापालिकेत हे दोन पक्ष एकत्र येणार की नाही, याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. एकीकडे दोन्ही पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेकही जोरात चालली होती. ते आता संपले असून, ‘मुंबई कोणाची?’ हा एकमात्र प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शिवाय, मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून गेलीच, तर त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावरच घाला पडू शकतो. शिवसेनेचे ‘प्राण’ या गडगंज श्रीमंत अशा महापालिकेतील राजकारणावर अवलंबून असल्यामुळेच अखेर उद्धव यांना या ‘आर-पार’च्या लढाईसाठी बिगुल फुंकणे भाग पडले आहे. विधानसभा निवडणुकीत युती तोडल्यानंतर आणि पुढे त्यांच्यासमोर सत्तेचा चतकोर तुकडाही फेकला, तेव्हापासूनच भाजप शिवसेनेला कस्पटासारखी वागणूक देत होता, त्यामुळेच आता पुन्हा मुंबई महापालिका शिवसेनेच्या हाती आलीच, तर उद्धव आणि त्यांचे मावळे याचा बदला घेतील काय आणि तो बदला त्यांना फडणवीस घेऊ देतील काय, हे कळीचे प्रश्‍न आता बदलत्या राजकीय रंगमंचावर उभे ठाकले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपने पोतेरे करून सोडल्यावरही शिवसेनेचा मंत्रिपदाचा मोह कायमच आहे आणि हे फडणवीस पक्‍के ओळखून आहेत,

त्यामुळेच त्यांनी देव-देवतांच्या फोटोबाबतचे पत्रक तातडीने मागे घेऊन पुन्हा शिवसेनेपुढे एक गाजर फेकले आहे! अर्थात, शिवसेनेच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘मनसैनिक’ काय भूमिका घेणार, यावरही बरेच काही अवलंबून आहे. त्यांनी शिवसेनेच्या पारड्यात छुप्या पद्धतीने आपले बळ टाकले तर मुंबई जिंकणे भाजपला कठीण जाईल, त्यामुळे या लढतीस ‘मराठी माणूस’ विरुद्ध ‘अ-मराठी’ अशी झालर देण्याचा प्रयत्न भाजपने केल्यास तो त्यांच्या अंगाशी येऊ शकतो आणि तसे झाल्यास या महानगराच्या ‘कॉस्मोपॉलिटन’ संस्कृतीलाच धक्का बसेल. शिवाय, या लढतीचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी कितपत उठवतात, हाही प्रश्‍न आहेच. मात्र, आता शिवसेना-भाजप लढत हीच सारे अवकाश व्यापणार असल्याने नागरी समस्या आणि नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्‍न कुठच्या कुठे वाहून जातील, यात मात्र शंका नाही!

Web Title: editorial artical