म्हारो प्रणाम...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

किशोरीताईंच्या सुरांना अभिजाताचा दैवी स्पर्श होता आणि कमालीच्या निगुतीने त्यांनी त्यातली चिरंतन विशुद्धता जतन केली.
 

किशोरीताईंच्या सुरांना अभिजाताचा दैवी स्पर्श होता आणि कमालीच्या निगुतीने त्यांनी त्यातली चिरंतन विशुद्धता जतन केली.
 

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या जाण्याने अभिजात हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्राची प्रचंड हानी झाली, हे फार तोकडे वाक्‍य झाले. ही प्रचंड हानी म्हणजे नेमके काय झाले, हे शब्दांत मांडणे अशक्‍य व्हावे, असे किशोरीताईंचे कलावंत म्हणून कर्तृत्व होते. त्यांच्या सुरांना अभिजाताचा दैवी स्पर्श होता आणि कमालीच्या निगुतीने त्यांनी त्यातली चिरंतन विशुद्धता जतन केली. किशोरीताईंच्या शास्त्रीय संगीताचा आवाका आणि त्यातला विचार इतका मूलभूत होता, की यापुढेही त्यांचे गाणे चिरकाल खुणावत राहील. घराण्यांच्या अंगचोर वृत्तीमुळे घुसमटून गेलेल्या हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या विचाराची त्यांनी नव्याने मांडणी केली.

परंपरेला सरसकट झुगारून न देताही नवे प्रश्‍न विचारले. त्यांचे गाणे जितके भावात्म होते, तितकेच तर्काशी स्नेह टिकवणारेही होते. ‘कुठलेही गाणे गाता यावे, यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया भक्‍कम हवा,’ असा पोक्‍त सल्ला भले भले पार्श्‍वगायकही देत असतात. त्यात प्रथमदर्शनी वावगे काही नाही; पण याच मल्लिनाथीवर किशोरीताईंनी मात्र ‘शास्त्रीय संगीत हा पाया असेल, तर चित्रपट संगीत हा कळस मानायचा का?’ असा निरुत्तर करणारा प्रश्‍न विचारलाच. 

किशोरीताईंच्या गाण्याचे कूळ आणि मूळ जयपूर अत्रौली घराण्यात; पण जयपूर घराण्याच्या रागनाट्याच्या शैलीत त्यांनी सुसंगत असे बदल केले. त्याखातर त्यांना टीकेचे धनीदेखील व्हावे लागले. ‘सहेला रे, आ मिल गाए’ ही त्यांची भूप रागातली बंदिश आजही जगभर आळवली जाते, ऐकली जाते. किंबहुना सामान्य, म्हणजे बेतासबात शास्त्रीय संगीताचा कान असलेल्यांच्या मनातही, ही बंदिश म्हणजेच किशोरीताई अशी ओळख असते.

या बंदिशीत त्यांनी अर्धा तीनताल वापरल्याबद्दल अनेक घराणेदार पंडितांनी नाके मुरडली होती. हे सोवळेपण किशोरीताईंच्या सुविद्य मनाला ना कधी झेपले, ना कधी त्यांनी ते जुमानले. किंबहुना ‘सर्व घराण्यांनी एकत्र येऊन समजा उदाहरणार्थ ‘यमन’ म्हटला तर त्याचा केवढा विशाल वृक्ष दिसू लागेल’, असे त्या म्हणायच्या. ‘घराण्यांची उणीदुणी काढणे, सोवळेपण टिकवणे यात न रमल्याने मी एकाकी पडले,’ असा विषाद त्यांच्या मनात असे. घरीसुद्धा ‘गीत गाया पत्थरोंने’ या शांतारामबापूंच्या चित्रपटात गाणे म्हणायचे त्यांनी ठरवले, तेव्हा त्यांच्या गुरू आणि मातोश्री मोगूबाईंनी ‘यापुढे माझ्या तानपुऱ्यांना हात लावू नकोस’, असे बजावले होते. सुगम संगीतातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला असला तरी, त्यात त्या विशेष रमल्या नाहीत. ‘जाईन विचारीत रानफुला’ हे शांताबाई शेळक्‍यांनी लिहिलेले गोड भावगीत असो किंवा ‘हे श्‍यामसुंदरा राजसा...’ ही पहाट आळवणी असो, किशोरीताईंनी घराघरांच्या माजघरात एक अभिजात स्थान मिळवलेच होते. त्यांच्या सुगम संगीतातही कमालीची विशुद्धता होती, जी रसिकांना भावली. तो त्यांच्या गाण्याचा आत्मा होता.

किशोरीताईंचा लहरीपणा, त्यांचा उग्र संताप याची सकारण, अकारण चर्चा वेळोवेळी झाली आहे. एखादा राग मैफलीत गायचा म्हटल्यावर त्या रागाने निर्माण होणाऱ्या भावात्मकतेशी, वातावरणाशी गायकाने तद्रुप होणे अपेक्षित आहे. हे तादात्म्यच साधले नाही, तर त्या साधनेला तरी काय अर्थ आहे आणि गाण्याला तरी काय आकार आहे? असा त्यांचा सवाल आहे. म्हणून बहुतेकदा त्या मैफलीच्या आधी दोनेक तास एकट्या बसून चिंतन करीत असत. श्रोत्यांची समरसता आणि मैफलीची जागाही त्या रागाविष्काराला पोषक असावी, अशी त्यांची रास्त अपेक्षा असे. या अपेक्षांना तडा जाई, तेव्हा किशोरीताई अस्वस्थ होत. त्यांच्या वर्तनाने अचंबित होणारे इतर नामचीन कलावंतही ‘‘लेकिन एक बार दो तानपुरे के बीच में वो बैठ गईं, तो समझो भगवान के दर्शन हो गए...’’ अशा शब्दांत त्यांच्या गाण्याचे वर्णन करत असत. अर्थात, त्यांच्या गाण्यात आकंठ बुडालेल्या रसिकांचीही हीच नेमकी भावना राहिल्याने किशोरीताई या अखेरपर्यंत आदराच्या अत्युच्च शिखरावर विराजमान राहिल्या. पंधराव्या शतकात महिनोनमहिने उलटे लटकून व्हॅटिकन सिटीमधल्या ‘सिस्टिन चॅपेल’चे छत अलौकिक चित्रांनी रंगवणारा मायकेलॅंजलो, प्रेयसीला कान कापून देणारा चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉफ किंवा लहरीपणाबद्दल तितकाच प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांची आणि किशोरीताईंसारख्या कलावंतांची जातकुळी एकच असते. जनसामान्यांच्या मोजमापाने त्यांची सृजने मोजायला गेले की फसगत झालीच म्हणून समजा. किशोरीताईंचे अस्वस्थ सर्जनशील मन हेच त्यांच्या गायकीची विशुद्धता टिकवणारे आणि जतन करणारे अस्त्र बनले होते. आजकालच्या रिमिक्‍स किंवा झटपट प्रसिद्धीच्या जमान्यात चित्रवाहिन्यांवरचे दोन-चार रिॲलिटी शोज गाजवले की ‘ग्रेट’ आर्टिस्ट बनता येते. कुठल्याही क्षेत्रात व्यक्‍त होण्यासाठी तप करावे लागते, याची जाणीवच विरू लागलेली दिसते; मग विशुद्धता जपणे ही तर खूप दूरची बाब झाली.

किशोरीताईंनी मात्र असंख्य अडचणींना सामोरे जात, सारे आयुष्य गानसाधनेला वाहून घेत स्वत:ला घडवले आणि त्या स्वत:च एक मानदंड होऊन गेल्या. ती विशुद्धता, तो मानदंडच हरपला, हीच ती हानी. देवाघरचे लेणे होते, देवाने परत नेले.

Web Title: editorial artical