इंटरनेटच्या विकासाला मुंग्यांचा हातभार

प्रदीपकुमार माने (विज्ञान-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक)
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंग्या आणि इंटरनेट दोन्ही गुंतागुंतीच्या प्रणाली आहेत आणि त्या सारख्याच नियमांनी काम करतात, ही गोष्ट चकित करणारी आहे. मुंग्यांची माहिती आदान-प्रदान करण्याची पद्धत इतकी विकसित आहे, की इंटरनेटचा विकास करण्यासाठी ती उपयोगी पडतेय.
 

मुंग्या आणि इंटरनेट दोन्ही गुंतागुंतीच्या प्रणाली आहेत आणि त्या सारख्याच नियमांनी काम करतात, ही गोष्ट चकित करणारी आहे. मुंग्यांची माहिती आदान-प्रदान करण्याची पद्धत इतकी विकसित आहे, की इंटरनेटचा विकास करण्यासाठी ती उपयोगी पडतेय.
 

‘मुंग्याचं जीवन म्हणजे एक स्विस घड्याळ - एकदम अद्‌भुत आणि सुंदर.’- एडवर्ड विल्सन या महान मुंगीशास्त्रज्ञानं मुंग्यांच्या जीवनाविषयी असं म्हटलंय. संपूर्ण आयुष्यभर अभ्यास करूनही विल्सनचं मुंग्यांविषयीचं हे मत आजही बदलेलं नाही. आजही वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी त्यांची मुंग्यांच्या जीवनाविषयीची उत्सुकता कमी झालेली नाही. ‘आधुनिक डार्विन’ समजल्या जाणाऱ्या या शास्त्रज्ञानं फक्त मुंगीशास्त्राचा पायाच घातलेला नाही, तर कित्येक संशोधकांना मुंग्यांचं अद्‌भुत विश्‍व उलगडण्यासाठी प्रेरणा दिली आहे. डेर्बा जॉर्डन हे त्यापैकी एक नाव. गेली तीस वर्षं ही संशोधिका विल्सनप्रमाणेच झपाटल्यासारखी मुंग्यांचा अभ्यास करतेय. या संशोधिकेनं केलेलं संशोधन इतकं महत्त्वपूर्ण आहे, की त्यामुळं मुंगीशास्त्राच्या अभ्यासात नवीन प्रवाह निर्माण होत आहे. तिच्यासारख्याच स्टॅनफोर्ड विद्यापीठात काम करणाऱ्या बालाजी प्रभाकर या संशोधकाच्या साह्यानं तिनं ही विलक्षण संकल्पना मांडली आहे अन्‌ ती संकल्पना आहे - ‘इंटरनेटचा वापर करणाऱ्या मुंग्या.’ इंटरनेटचा वापर करणाऱ्या मुंग्या? हे कसं काय शक्‍य आहे? मुंग्या कसा काय इंटरनेटचा वापर करू शकतील? त्यांना थोडीच आपल्यासारखी बुद्धी आहे, अशा गोष्टी करायला? पटणार नाही, पण गेल्या तेरा कोटी वर्षांपासून मुंग्या इंटरनेटचा वापर करीत आहेत. ही संकल्पना समजून घेण्यासाठी इंटरनेट आणि मुंग्या कसं काम करतात, हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे.

इंटरनेट ज्या पद्धतीनं काम करतं, तशाच पद्धतीनं मुंगी अन्‌ तिचा समाज काम करीत असतो, असं जॉर्डन आणि प्रभाकर या संशोधकांना चार वर्षांच्या संशोधनातून आढळून आलं. इंटरनेटवर ज्या पद्धतीनं माहितीचं आदान-प्रदान केलं जातं, तसंच माहितीचं आदान-प्रदान मुंग्यांकडूनही केलं जातं.

पण वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, मुंग्या ही गोष्ट लाखो वर्षांपासून करत आहेत. इंटरनेटचा राहू दे, मानवासारख्या जिवाचाही तेव्हा जन्मही झाला नव्हता. मुंगी आणि इंटरनेट दोन्ही गुंतागुंतीच्या प्रणाली आहेत आणि दोन्ही प्रणालीही सारख्याच नियमांनी काम करतात, ही गोष्ट विज्ञान अन्‌ तंत्रज्ञानाच्या विश्‍वाला चकित करणारी आहे. इतकंच नव्हे, तर मुंग्यांची माहिती आदान-प्रदान करण्याची पद्धत इतकी विकसित आहे, की इंटरनेटचा विकास करण्यासाठी ती उपयोगी पडतेय.

मुंग्या आणि इंटरनेट दोन्हीमधील साम्य समजून घेण्यापूर्वी या संकल्पनेला जन्म देणाऱ्या जॉर्डन यांचं संशोधन समजून घेणं गरजेचं आहे. जॉर्डन या तीस वर्षांपासून अमेरिकेतील ॲरिझोन प्रांतातील तीनशे हार्वेस्टर मुंग्यांच्या कॉलनीचा अभ्यास करत आहेत. या मुंग्या अन्नासाठी बिया गोळा करीत असतात. म्हणून या मुंग्यांना ‘हार्वेस्टर’ (कापणी करणाऱ्या) मुंग्या म्हटलं जातं. ठराविक जिवाचा विचार करता सलग तीस वर्षे चालणारा हा अभ्यास हे जीवशास्त्राच्या इतिहासातील पहिलंच उदाहरण म्हणावं लागेल. या अभ्यासातून जॉर्डनला जे काही समजलं, ते मुंगी संशोधनाचा विचार करता क्रांतिकारी आहे. हार्वेस्टर मुंग्यांची अन्न शोधण्यासाठी बाहेर पडण्याची प्रक्रिया हे माहिती व्यवस्थापनाचं अद्‌भुत उदाहरण म्हणावं लागेल. हार्वेस्टर मुंग्यांना अन्नासाठी बाहेर पडावयाचं असतं, तेव्हा या मुंग्या वारुळातून एकदम बाहेर पडत नाहीत. सुरवातीला अन्नाचा अंदाज घेणाऱ्या ‘टेहळणी मुंग्या’ बाहेर पडतात. त्या अन्न घेऊन परत आल्या, तरच ‘अन्नशोधक मुंग्या’ बाहेर पडतात. टेहळणी मुंग्या परत आल्या नाहीत, त्या अर्थी बाहेर काहीतरी संकट आहे, याचा अंदाज वारुळातील मुंग्यांना येतो. बाहेर एखादा सरडा असू शकतो, की जो बाहेर येणाऱ्या मुंग्यांना खातोय किंवा खराब वातावरणामुळेही टेहळणी मुंग्या मृत्युमुखी पडत असतील. टेहळणी मुंग्यांतील सगळ्या किंवा जास्तीत जास्त मुंग्या परत आल्या नाहीत, तर त्या दिवशीचं अन्नशोधनाचं काम स्थगित केलं जातं. सर्वच टेहळणी मुंग्या परत येत असतील, तरीही अन्नशोधासाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला जात नाही. टेहळणी मुंग्या अन्न घेऊन परत येत असतील; पण वेळ लावत असतील, तर मुंग्यांच्या लक्षात येतं, की अन्नसाठा दूर आहे. अशा परिस्थितीत जास्त ऊर्जा खर्च करून अन्न आणणं परवडत नाही. याचं कारण म्हणजे हार्वेस्टर मुंग्यांची अन्नशोधनाची प्रक्रिया त्यांच्यातील म्हणजे त्यांच्या कॉलनीतील पाण्याच्या साठ्यावर ठरते. या मुंग्या पाणी साठवून ठेवत नसल्या, तरी गोळा केलेल्या बियांमधून त्यांना पाणी मिळतं. मुंग्या दूरवरून अन्न आणतात, तेव्हा त्यांच्या शरीरातलं पाणीही कमी होतं, तेव्हा शोधलेलं अन्न शरीरातील पाण्याची भरपाई करण्यासाठीच जातं. म्हणून अशाही वेळी अन्न आणणं टाळलं जातं.

मुंग्यांचा परत येण्याचा वेग सरासरी दहा सेकंदास एक असा असेल, तरच मुंग्या बाहेर पडतात असं या सर्व प्रयोगातून जॉर्डन यांना दिसून आलं. बाहेर पडायचं की नाही याचा निर्णय अन्नशोधक मुंग्यांना किती टेहळणी मुंग्या भेटल्या यावर ठरविला जातो. मुंग्यांची काम करण्याची ही पद्धती इंटरनेटसारखीच आहे, असं त्यांना आढळून आलं. इंटरनेटवर माहिती व्यवस्थापन करणारा ‘ट्रॅफिक कंट्रोल प्रोटोकॉल’ (टीसीजी) मुंग्यांच्या माहिती व्यवस्थापनाप्रमाणेच काम करतो. इंटरनेटवर माहिती ट्रान्सफर होताना रिसिव्हरकडून संदेश आला, तर सेंडरकडून माहिती पाठवली जाते. रिस्पॉन्स मिळत नसेल तर फाइल शेअरिंग टाइम आउट होते, जसं की हार्वेस्टर मुंग्यांमध्ये टेहळणी मुंग्या परत आल्या नाहीत, तर काम स्थगित केलं जातं. मुंग्या आणि इंटरनेट दोन्हीतही वेळ आणि ऊर्जा दोन्हीलाही महत्त्व आहे आणि इंटरनेटच्या ‘ट्रॅफिक कंट्रोल प्रोटोकॉल’च्या शोधाच्या लाखो वर्षांपूर्वीपासून मुंग्या अशीच माहिती व्यवस्थापन करतायत, ही गोष्ट विल्सनच्या ‘मुंगी - एक स्विस घड्याळ’ तुलनेला सार्थ ठरविते.

Web Title: editorial artical