महागठबंधनाय नमो नम:

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजपवादाच्या छत्राखाली विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश मिळाले तर राजकारणाचे चित्र बदलेल; परंतु त्यात अनेक अडचणीही आहेत.

राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजपवादाच्या छत्राखाली विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश मिळाले तर राजकारणाचे चित्र बदलेल; परंतु त्यात अनेक अडचणीही आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६७ मध्ये केला आणि त्यांच्या त्या प्रयत्नास यशही मिळाले होते. या बिगरकाँग्रेसवादी राजकारणाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच ‘बिगर-भारतीय जनता पक्ष’वादी राजकारणाच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्यात थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पुढाकार घेतला आहे. एक मे रोजी समाजवादी विचारवंत मधू लिमये यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या बाहेरील अनेक पक्षांचे नेते एकत्र आले होते. तेथेच अशा प्रकारच्या आघाडीचे विचारमंथन सुरू झाले. लिमये यांचा लोहियांच्या बिगर-काँग्रेसवादी राजनीतीस असलेला पाठिंबा लक्षात घेतला, तर हा काळाने उगवलेला सूडच आहे, असे म्हणावे लागते; कारण आताच्या या नव्या ‘गठबंधना’साठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला आहे! मात्र, सध्या देशात निधर्मी विचारांना तिलांजली देणारे हिंदुत्ववादी विचारांचे जे पेव फुटले आहे, ते बघता सोनिया यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरतो, हेही खरे. निमित्त राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे असले तरी त्यास उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करूनही पदरी आलेल्या दारूण पराभवाची जशी पार्श्‍वभूमी आहे, त्याचबरोबर दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकांत आम आदमी पक्षाच्या झालेल्या धुळधाणीचेही संदर्भ आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेचा मुद्दा आणि प्रकृतिअस्वास्थ्य या दोन्ही बाबी बाजूस सारून सोनिया जातीने मैदानात उतरल्या आहेत. 

खरे तर अशा प्रकारचे ‘महागठबंधन’ करून नितीशकुमार यांचे संयुक्त जनता दल , लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांनी संयुक्‍तपणे बिहार जिंकलेही होते. मात्र, उत्तर प्रदेशात आघाडीला पराभूत व्हावे लागले; कारण मायावती यांचा बहुजन समाज पक्ष त्या ‘गठबंधना’त नव्हता. त्यामुळेच आता देशभरातील सर्वच बिगरभाजप पक्षांना सोनिया एकत्र आणू पाहत असून, भाजपच्या आघाडीत सामील असलेल्या शिवसेना आणि अकाली दल यांच्याशीही संपर्क साधण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. शिवसेनेने यापूर्वीही ‘रालोआ’मधील आपले स्थान कायम राखत, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत दोन वेळा प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना जाहीर पाठिंबा दिला होता. गेले काही महिने भाजपविरोधात मैदानात असलेली शिवसेना यंदाही आपल्या बाजूस येते काय, हे चाचपडून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील मतांची गणिते उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात बदलली असली, तरी देशातील सर्व विरोधक एकदिलाने एकत्र आल्यास ते भाजपला पराभूत करू शकतात. अर्थात, ही कागदावरील आकडेवारी आहे आणि प्रत्यक्षात आपल्या देशातील खंडीभर विरोधकांची तोंडे दहा दिशांना आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोनिया यांनी गेले काही महिने विरोधी ऐक्‍याचे सूर आळवणारे नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्याशी बातचीत केली आणि मुलायमसिंह यांच्याशीही दूरध्वनीवरून बोलणे केले. आता त्या मायावती यांच्याशीही तातडीने संपर्क साधणार आहेत. मुलायमसिंह आणि मायावती हे ‘अहि-नकुलवत’ नाते असलेले दोन नेते एकत्र कसे येणार, या प्रश्‍नाचे उत्तरही उत्तर प्रदेशच्याच निकालांनी देऊन टाकले आहे.

राज्यसभेवर पुन्हा निवडून येण्यासाठी मायावती यांना ‘सप’ आणि काँग्रेस यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. त्यामुळे त्याही बिगरभाजप आघाडीत सामील होऊ शकतात. तशीच परिस्थिती पश्‍चिम बंगालमध्ये आहे. तेथेही विळ्याभोपळ्याचे नाते असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांनाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भाजपची घोडदौड रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज भासू लागली आहे. तर या निवडणुकीच्या निमित्ताने गेले काही दिवस चर्चेत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच सोनियांची यासंदर्भात घेतलेली भेटही या हालचालींना कारणीभूत ठरली आहे.

हे ऐक्‍य होण्यास अनेक अडचणीही आहेत आणि त्यास काँग्रेसचे दिग्विजयसिंह यांच्यासारखे वाचाळवीर कारणीभूत आहेत. तेलंगण पोलिसांनी ‘इसिस’च्या नावाने खोटे अकाउंट इंटरनेटवर उघडल्याचा तथाकथित गौप्यस्फोट त्यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या ‘महागठबंधना’तून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोनिया यांना दिग्विजय यांच्यासारख्या वाचाळवीरांना लगाम घालावा लागेल, तसेच तमिळनाडूतील द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांना बरोबर घेण्याची कसरत करावी लागेल. त्याशिवाय हुकमाचे पान खरे तर मोदी यांच्याच हातात आहे; कारण ते एखादे अनपेक्षित नाव राष्ट्रपतिपदासाठी बाहेर काढून या संभाव्य ‘गठबंधना’ला चकवा देऊ शकतात. तरीही या निमित्ताने किमान काही बिगरभाजप पक्ष खरोखरच एकदिलाने एकत्र आले आणि २०१९ पर्यंत हे ‘गठबंधन’ टिकलेच तर भाजपला शह बसू शकतो. एक मात्र खरे. मोदी यांच्या टिकून असलेल्या करिष्म्यामुळेच हे सगळे होऊ घातले आहे. त्यामुळे हे गठबंधन झाल्यास त्याचे श्रेयही मोदींना द्यावे लागेल!

Web Title: editorial artical