पाकिस्तानची कबुली की खेळी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

हाफिज सईद हा दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची कबुली पाकिस्तानने प्रथमच अधिकृतरीत्या दिली असली, तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही. पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता ही त्या देशाची खेळीही असू शकते.

हाफिज सईद हा दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची कबुली पाकिस्तानने प्रथमच अधिकृतरीत्या दिली असली, तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही. पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता ही त्या देशाची खेळीही असू शकते.

मुंबईवर २००८ मध्ये २६/११ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्करे तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिज सईद आणि त्याच्या चार साथीदारांना, अमेरिकेने कानपिचक्‍या दिल्यानंतर का होईना, अखेर पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या देशाचा आजवरचा खोटेपणा उघडा पडला आहे. ‘जिहाद’च्या नावाखाली सातत्याने दहशतवादी कारवाया करत असल्याबद्दल हाफिज आणि त्याच्या चार साथीदारांवर ही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या गृहखात्याने, हाफिजवरील कारवाईचा फेरविचार करणाऱ्या न्यायिक मंडळापुढे स्पष्ट केले आहे. आजवर भारतात झालेल्या कोणत्याही दहशतवादी कारवायांबद्दल कायमच हात वर करण्याचे धोरण पाकिस्तानने अवलंबिले होते. या पार्श्‍वभूमीवर प्रथमच, हाफिज हा दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा पाकिस्तानने अधिकृतरीत्या दिलेला हा कबुलीजबाब आहे. मात्र, त्यामुळे लगोलग हुरळून जाण्याचे कारण नाही. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या सुनावणीच्या आदल्याच दिवशी पाकिस्तानने अधिकृतरीत्या हे मान्य करणे, हा योगायोग नाही. आपण न्याय्य भूमिकाही घेऊ शकतो, हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पाकिस्तानने केलेली ही आणखी एक खेळी असू शकते. मात्र, हाफिजला हे मान्य असणे अशक्‍यच आहे. ‘आपण काश्‍मिरी जनतेचा आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला सरकारने ताब्यात घेतले आहे,’ असा साळसूद पवित्रा त्याने घेतला आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या डावपेचांवरही प्रकाश पडला आहे. पाक सरकारला अर्थातच हाफिजचा दावा फेटाळून लावणे भाग पडले असून, त्यामुळेच न्यायिक मंडळाने हाफिजवरील कारवाईबाबत तपशीलवार कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच आता पाक सरकार यासंबंधात नेमके कोणते पुरावे पुढे आणते, ते बघितल्यावर मुंबईवरील हल्ल्याच्या तपासालाही नवे वळण लागण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

अर्थात, पाकिस्तानला हे जे काही करणे भाग पडले, त्यास चारच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने दिलेला इशाराच अधिक कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. अर्थात, ट्रम्प प्रशासनाला हा इशारा पाकिस्तानला का द्यावा लागला, ही बाब समजावून घेणे जरुरीचे आहे. भारतीय उपखंडातील सुरक्षेला पाकिस्तानच्या कारवायांमुळे धोका निर्माण झाल्याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तान सातत्याने देत असलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे ओबामा प्रशासनही अस्वस्थ होते, ही बाबही नव्या प्रशासनाने लक्षात घेतलेली दिसते. त्यामुळेच पाकिस्तानला हाफिज आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेणे भाग पडले आहे. हाफिजही पाक सरकारच्या या कारवाईमुळे अस्वस्थ झाल्याचे सुनावणीच्या वेळी दिसून आले. आपले वकील हजर असतानाही त्याने स्वतःच युक्‍तिवाद करणे पसंत केले आणि ‘काश्‍मिरी जनतेचा आवाज’ उठवण्यास सरकारच्या या कारवाईमुळे प्रतिबंध होत असल्याचा दावा त्याने केला.  गेल्याच आठवड्यात अमेरिकेने हाफिजवर कारवाई न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या या कारवाईला पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्षाचीही पार्श्‍वभूमी आहे. पाक सरकार आजवर भारतातील दहशतवादी कारवायांशी आपल्या देशाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचा दावा करत आले आहे. हाफिजने नेमक्‍या याच मुद्द्यावर आपल्यावरील कारवाई रद्दबातल ठरवण्याची मागणी केली आहे, हे यासंबंधात विचारात घेण्याजोगे आहे. मात्र, पाकव्याप्त काश्‍मीरमधील ‘लष्करे तैयबा’चे तळ हे पाकिस्तानच्या अधिकृत लष्करी तळाच्या परिसरातच असतात आणि त्यांच्यातील परस्परसंबंध कधीच लपून राहिलेले नाहीत व पाक लष्कर हे नवाज शरीफ यांना कायमच डोईजड ठरलेले आहे, त्यामुळे लष्कराला शह देण्यासाठी शरीफ हे हाफिजचा वापर एक प्यादे म्हणून तर करत नाहीत ना, असाही मुद्दा यामुळेच पुढे आला आहे.

अर्थात, यामुळे अमेरिकेच्या या उपखंडातील भूमिकेबाबत बदल झाला आहे काय, असा प्रश्‍न आहे. पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचे अखेर ट्रम्प प्रशासनाने ध्यानात घेतले असले, तरी त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे थेटपणे म्हणता येणार नाही. गेली अनेक दशके अमेरिका अशाच प्रकारे दोन्ही दरडींवर पाय ठेवून, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवत आहे, त्यामुळेच आता अमेरिकेच्या दबावाखाली का होईना, हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय नवाज शरीफ सरकारने घेतला असला, तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही; कारण दहशतवाद आणि छुपे युद्ध याबाबत पाकिस्तानशी सुरू असलेली दीर्घकालीन लढाई अखेर भारताला एकट्यानेच लढायची आहे, हाच या घटनेचा मथितार्थ आहे.

Web Title: editorial artical