जगावेगळा

डॉ. अण मांडे
शुक्रवार, 17 मार्च 2017

रजनीशांच्या बालपणीचा एक किस्सा आहे. त्यांची शाळा घरापासून लांब होती. रोज त्यांना पायी जावं लागे. त्यांचे काही मित्र सायकलवरून जायचे.

रजनीशांच्या बालपणीचा एक किस्सा आहे. त्यांची शाळा घरापासून लांब होती. रोज त्यांना पायी जावं लागे. त्यांचे काही मित्र सायकलवरून जायचे.

काही श्रीमंतांची मुलं मोटारीतून जात. रजनीशांच्या जवळून जाताना ती मुलं मोटारीच्या खिडकीबाहेर डोकं काढून हसत, त्यांच्याकडे बघून हात हलवत. एकदा त्यांच्या गावात एक हत्ती आला. त्याचा माहूत हत्तीला गावभर हिंडवायचा. लोक त्याला पैसे द्यायचे. हत्ती ते पैसे सोंडेत धरून वर बसलेल्या माहुताकडे द्यायचा. रजनीशांना त्यांचे वडील चणेफुटाणे खाण्यासाठी चार आणे द्यायचे. रजनीश एकदा त्या हत्तीजवळ गेले. त्यांनी हत्तीवर बसलेल्या माहुताला विचारलं, ‘मी तुला चार आणे देतो. मला हत्तीवरून शाळेत सोडतोस काय?’ त्या माहुताला गंमत वाटली. त्यानं हत्तीला सूचना दिल्या. हत्तीनं रजनीशांना सोंडेत धरून माहुताकडे दिलं. रस्त्यानं जाताना सगळे त्याच्याकडे बघत होते. मोटारीमधली मुलं आश्‍चर्यानं त्याच्याकडे बघत होती. रजनीश त्या दिवशी शाळेच्या फाटकापाशी हत्तीवरून उतरले. ते बघायला शाळेतली मुलं आणि शिक्षक बाहेर आले होते. 

आणखी एक वेगळी कथा आहे. एका गावात एकाचा घोडा हरवतो. घोड्याचा मालक  सगळ्यांना विचारतो की माझा घोडा कुणी बघितला का? आता घोडा कुठं शोधावा असा विचार करत असताना तिथून एक मुलगा चाललेला असतो. त्याला तो विचारतो, ‘माझा घोडा हरवलाय, तू बघितलायस का?’ तो मुलगा म्हणाला, ‘मी बघितला नाही; पण तो कुठं असेल हे सांगू शकतो.’

घोड्याचा मालक म्हणाला, ‘सांग.’  मुलगा म्हणाला, ‘मला तुमच्या तबेल्यात घेऊन चला.’ त्यानं त्या मुलाला घराच्या पाठीमागं असलेल्या तबेल्यात नेलं. मुलगा क्षणभर विचार करीत उभा राहिला. मग डोळे उघडून म्हणाला, ‘तुमचा घोडा इथून दीड कोसावरच्या टेकडीवर चरतोय.’ घोड्याच्या मालकानं तिथं जाऊन बघितलं, तर खरंच तिथं घोडा होता. गावात आल्यावर त्यानं मुलाला विचारलं, ‘घोडा तिथं आहे हे तुला कसं समजलं?’  मुलगा म्हणाला, ‘मी तबेल्यात उभा राहिलो. विचार केला- मी घोडा असतो, तर इथून कुठं गेलो असतो? मग ती टेकडी माझ्या डोळ्यांसमोर दिसली.’

माझ्या मित्राचा मुलगा नुकताच एक ते दहापर्यंत आकडे इंग्रजीत शिकला होता. तो वडिलांना म्हणाला, ‘टेन नंतर काय?’ वडील म्हणाले. ‘एलेवन.’ तर तो म्हणाला, ‘आता याच्यापुढचं मला माहितेय.’ त्याचे वडील म्हणाले, ‘सांग बरं.’ तो म्हणाला, ‘एलेवन, एलेटू, एलेथ्री.’ रजनीशांचा किस्सा, घोड्याची कथा आणि मित्राच्या मुलाची कथा यात तसं बघितलं तर काहीही संबंध नाही. पण एक खूप महत्त्वाचं साम्य आहे. रजनीशांनी आणि त्या मुलांनी जगावेगळा विचार केला होता. याला इंग्रजीत ‘लॅटरल थिंकिंग’ म्हणतात. असा चौकटीच्या बाहेर जाऊन वेगळा विचार करणारी माणसं काहीतरी जगावेगळं करून जातात. असं ‘लॅटरल थिंकिंग’ करणं काही जणांकडे जन्मजात असतं; परंतु आपल्यापैकी कुणी असा जगावेगळा विचार करण्याची सवय लावून घेतली, तर तोही जगावेगळं काहीतरी करून जाईल.
 प्रतिभावान माणूस जगावेगळा असतो, किंवा जगावेगळा विचार करणारा माणूस प्रतिभावान असतो.

Web Title: editorial artical dr. aan mande