पारण्याचा प्रसाद

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कुठल्याही गोष्टीच्या प्रारंभ-क्षणांत जल्लोष असतो. काठोकाठ आनंद असतो. स्वागतशीलतेचा उत्स्फूर्त दरवळ असतो. गंधकोवळ्या सुरांची मंगल सनई आणि अभिमानाचे उत्तुंग पहाड उभे करणारा चौघडा यांचे आनंदस्पर्श या क्षणांत जाणवत असतात. प्रारंभाच्या दुसऱ्या बाजूला समाप्तीचा क्षणही अवघडलेला असतो. त्याचा नूर काही वेगळाच असतो. निरोपाचा क्षण आठवणींच्या कल्लोळांनी भारलेला असतो. त्याच्या साथीला आत्ममग्ना दीपज्योत थरथरत असते. जपून ठेवलेल्या क्षणांच्या अनेक गोंदणखुणा निरोपाला लगडलेल्या असतात. मेघाच्छन्न दिवस भरून यावा; आणि पाऊसधारांच्या शब्दाशब्दांत निरोपाच्या भावना गलबलत राहाव्यात, तसं काहीसं या वेळी वाटत राहतं.

कुठल्याही गोष्टीच्या प्रारंभ-क्षणांत जल्लोष असतो. काठोकाठ आनंद असतो. स्वागतशीलतेचा उत्स्फूर्त दरवळ असतो. गंधकोवळ्या सुरांची मंगल सनई आणि अभिमानाचे उत्तुंग पहाड उभे करणारा चौघडा यांचे आनंदस्पर्श या क्षणांत जाणवत असतात. प्रारंभाच्या दुसऱ्या बाजूला समाप्तीचा क्षणही अवघडलेला असतो. त्याचा नूर काही वेगळाच असतो. निरोपाचा क्षण आठवणींच्या कल्लोळांनी भारलेला असतो. त्याच्या साथीला आत्ममग्ना दीपज्योत थरथरत असते. जपून ठेवलेल्या क्षणांच्या अनेक गोंदणखुणा निरोपाला लगडलेल्या असतात. मेघाच्छन्न दिवस भरून यावा; आणि पाऊसधारांच्या शब्दाशब्दांत निरोपाच्या भावना गलबलत राहाव्यात, तसं काहीसं या वेळी वाटत राहतं. प्रारंभाच्या क्षणांभोवती डोळे दिपविणारी तेजोवलयं असतात, त्यामुळं त्याची दुसरी निरोप-क्षणांची बाजू आपल्याला दिसत नाही. हाताच्या मध्यमेवर रंगविलेल्या खुणेची जागा तिच्या अलीकडचं आणि पलीकडचं बोट आलटून-पालटून बदलून जादूनं इकडं-तिकडं होत असल्याचा खेळ खेळावा, तसंच या प्रारंभाचं आणि निरोपाचंही असतं. 

एकाहून दुसरं पूर्णतः भिन्न; पण त्यांची असते मात्र जोडी. अशा द्वैताच्या जोड्या जुळविण्यामागं काही तरी योजना असलीच पाहिजे. मुसळधार पाऊस दाणादाण उडवितो, मोठं नुकसान करतो. नंतर होत्याचं नव्हतं वाटावं, तसा गायब होतो. मग सृष्टीच्या अंगोपांगी सर्जनाची लुसलुशीत, पाचूवर्खी नक्षी माना उंचावून पाहू लागते. फुलांच्या स्मिताकारांची मैफल तिथं रंगू लागते. पक्ष्यांच्या थव्यांची चित्रलिपी निळ्या गाभाऱ्यात सर्जनगीतं लिहीत लहरत राहते. पावसाच्या रौद्र रूपाच्या जागी कोवळ्या अंकुरांच्या ममतेचे स्पर्श उमलू लागतात. शाळा भरताना घंटा वाजते; आणि सुटतानाही ती तशीच वाजते. दोन्ही टोलांचे आवाज प्रौढांना सारखेच भासतात. मुलांना त्यांतील फरक चटकन कळतो. शाळा सुटल्याची घंटा होताच, चिवचिवणारे थवे ज्या गतीनं दिशामार्गांकडं झेपावतात, त्या हालचालींतून शाळा सुटल्याच्या घंटानादाचे आनंदथेंब मुक्तपणानं नाचत असतात. तेच आवाज; पण अर्थ वेगळे!

निरोपाचा क्षण अवघड असतो, हे खरंच आहे. आपण प्रारंभाची-आगमनाची तयारी करतो; निरोपाची तयारी करायचं मात्र सारखं टाळत राहतो.

आनंदक्षणांत निरोपाची काजळी कशाला, असा व्यावहारिक विचार आपण करतो. निरोपाची तयारी नसल्यानं त्या वेळी आपण सैरभैर होतो. गोंधळून-भांबावून जातो. अवघडतो. आक्रसतो. कोणत्याही येण्याला जाणं-परतणं असतं, हा सृष्टिनियम आहे. आपल्याकडं एक संस्कार आहे. पारण्याचा. धार्मिक व्रतवैकल्यांची सांगता पारण्यानं केली जाते. तो सांगतेचा सोहळाच असतो. प्रारंभक्षणांपासूनच्या अनेक स्मृतींचे निर्व्याज दरवळ या समाप्तीच्या क्षणांत असतात. एक संपतं, तेव्हा दुसरं आकार घेत असतं.

गंधभरल्या फुलांनी झाडांवरून उतरून अंगणात यावं, तशा टपटपत राहिलेल्या ‘परिमळा’चं पारणं होत असलं; तरी ताज्या ‘पहाटपावलां’च्या खुणा दुसरीकडं उमटत असणार, हे मात्र नक्की. पारण्याचा प्रसाद गोड असतो, तो असा.

Web Title: editorial artical malhar arankalle