सुखाचे कवडसे

सुखाचे कवडसे

एकदा एका चित्रकारानं प्रदर्शन आयोजित केलं. आपली कला परिपूर्ण असावी आणि त्यातून रसिकांना शंभर टक्के आनंद लाभावा, यासाठी हा चित्रकार कमालीचा आग्रही होता. सतत सुधारणेचा ध्यास घेतलेल्या या कलाकारानं प्रदर्शनात एक फलक लावून ठेवला. त्यावर लिहिलं - चित्रांतल्या उणिवा दाखवा; मी त्या दुरुस्त करीन. 

अनेकांनी चित्रं बारकाईनं न्याहाळली. नजरेला जाणवलेल्या उणिवा त्यांनी नोंदविल्या आणि त्या चिठ्या चित्रकारापर्यंत पोचवल्या. त्यांचा सारांश होता - सगळीच चित्रं सुमार आहेत. त्यांत कुठं काय सुधारणा हवी, हे जाणकारांनी तपशीलवार लिहिलं होतं. 

चित्रकार मनातून खूप निराश झाला. आजवरची साधना कुचकामी ठरली, म्हणून खंतावला. अखेर गुरुचरणाशी बसला. गुरूंना विचारलं - माझी कला इतकी दर्जाहीन आहे? ऋषितुल्य गुरूंच्या चेहऱ्यावर स्मितरेषांचे किती तरी कवडसे हेलकावत राहिले. ते शिष्याला म्हणाले - आता फलक बदल. त्यावर लिही - चित्रांतलं चांगलं-देखणं काय ते नोंदवा. फलक पाहून रसिकांनी तशा नोंदी केल्या. सारांश होता ः अप्रतिम. उत्तम.सुंदर. देखणा आविष्कार; आणखीही असंच खूप काही. चित्रकाराची कळी खुलून गेली. समाधानाच्या, कृतार्थतेच्या गंधस्वरांत गाऊ लागली. 

गुरू म्हणाले - परिपूर्ण कुणीच नाही. अगदी मीसुद्धा! त्या स्थितीला पोचायचं ध्येय जरूर हवं. विटेवरलं सुंदर ध्यान उराउरी भेटावं, म्हणून तर वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटी वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होतो. कळसाच्या दर्शनानंही त्याच्या कपाळी टिळ्याच्या जागी कानड्याची चरणधूळ येऊन बसते. त्या स्पर्शानं त्याच्या अंगभर अभंगांचे आणि टाळ-मृदंगांचे स्वर निनादू लागतात. अपूर्ण असतानाही वारकरी पूर्णत्वाचं समाधान मिळाल्याच्या आनंदानं नाचतो, गातो. 

चराचर सृष्टीतल्या प्रत्येकात अपूर्णत्व आहे. त्या सगळ्यांची वारी पूर्णत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठीच सुरू आहे. पूर्णत्व लाभतं की नाही ठाऊक नाही; पण पूर्णत्वाच्या ध्यासाने तीर्थथेंब मात्र त्याचं कर्तृत्व तेजोमय करतात. त्यासाठी उणिवांचा नव्हे; तर ओंजळीत आहे त्याचा विचार करायचा असतो. ओंजळीतली सारी सात्विकता बेरजा-गुणाकार करत वृद्धिंगत होत जाते. 

पौर्णिमेचं निरसं चांदणं आजूबाजूनं झिरझिरत असताना काहींना त्यात केशरकण मिसळल्याचा अनुभव येतो. काहींना त्याचा गंध जाणवतो. त्याचा खुललेला स्वाद काहींच्या रसनेवर पसरत जातो. असे चंद्रकेशरी क्षण आपल्याही अवतीभवती एकसारखे उतरून येत असतात. झाडावरून आनंदपक्षी अलगद खाली यावा, तसे हे क्षण तुम्हाला जाणवतही असतात; मात्र खूप जण ते पाहत नाहीत. पांढऱ्यापेक्षा काळा रंग पटकन लक्ष वेधून घेतो, तशी इथंही त्यांची फसगत होते. तुम्ही काय टिपून घेता, ते महत्त्वाचं असतं. अमृतभरले सौख्यक्षण तुमच्याकडं यायला उत्सुक असतात. त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही तयार राहायला हवं. त्यासाठी मनाचं दार उघडलं, तरच सुखाचे चंद्रकवडसे घरात हसू लागतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com