नवाज शरीफ यांना घेरण्याचा डाव

विजय साळुंके
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात विविध शक्ती एकत्र आल्या आहेत. त्या शक्तींना लष्कराचीही फूस आहे. त्यातच पंतप्रधान होण्याच्या इच्छेने पछाडलेले इम्रान खान यांनी लष्कराचे मांडलिकत्व पत्करले आहे.
- विजय साळुंके (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरुद्ध इम्रानखान यांनी पुकारलेली रस्त्यावरची लढाई आता न्यायालयात पोचली आहे. शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इम्रान व मुहंमद ताहिर उल कादरी यांनी २ नोव्हेंबरला इस्लामाबादेत बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयीन आयोग नेमल्यानंतर इम्रान यांनी आपला विजय झाल्याचे सांगून आंदोलन मागे घेतले. 

नवाज सरकार यांची सरकारे यापूर्वी दोनदा बडतर्फ झाली असून, आताचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ, इम्रान खान, ताहिरुल काद्री आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेला चौकशी आयोग, अशा तीन आघाड्यांवर त्यांना लढावे लागणार आहे. ‘पनामा पेपर्स’मधून शरीफ कुटुंबीयांच्या परदेशात कंपन्या, मालमत्ता असल्याचे बाहेर आल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी जोर धरून त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला होता.

भारतीय उपखंडातील राजकारणी, उद्योगपती, सरकारी बडे अधिकारी, लष्करी अधिकारी या सर्वांवरच बेहिशेबी मालमत्ता, परदेशी बॅंकांत पैसा व परदेशात मालमत्ता केल्याचे आरोप होत असतात. स्वीस बॅंकांच्या जोडीला ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, मॉरिशिस, केमन आयलंड, लंडन अशा ठिकाणांची या संदर्भात चर्चा होत असते. शरीफ यांनी परदेशात पैसा गुंतवलेला नसल्याचे लेखी जाहीर केले असले तरी, मुलांच्या आर्थिक व्यवहाराला आपण जबाबदार नाही, अशी पळवाट शोधली आहे. शरीफ यांच्या वडिलांचेही पोलाद उत्पादन, साखर कारखाने असे उद्योग होते. तो वारसा शरीफ यांच्याकडे आला. जनरल झिया उल हक यांच्या लष्करी राजवटीने नवाज शरीफ यांना धरून ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’च्या नेत्या बेनझीर भुट्टोंना प्रतिस्पर्धी म्हणून उभे केले. १९९० च्या निवडणुकीत नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग, जमाते इस्लामी तसेच अन्य इस्लामी कट्टरपंथीयांचे गट मिळून इस्लामी जम्हुरी इत्तेहाद (इस्लामी लोकशाही आघाडी) उभी करण्यात आय.एस.आय.ची भूमिका होती. बेनझीर भुट्टोंना पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ यांच्या आघाडीला बारा कोटींचा निधी पुरविला होता. प्रारंभी लष्कराचे प्यादे असलेले नवाज शरीफ लष्कराकडून बडतर्फ झाल्याने लोकशाहीवादी झाले. लष्कराची पकड सैल करून मुलकी राजवटीला बळ देण्यासाठी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी बेनझीर भुट्टोंशीही समझोता केला. बेनझीर यांची हत्या घडवून आणल्यानंतर नवाज शरीफ यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी लष्कराने इम्रानखान नावाचे प्यादे हाती धरले आहे.

पाकिस्तानात लष्कराने राजकीय नेत्यांना जखडण्यासाठी वेळोवेळी लष्करी कायदा, न्यायालये, कट्टर धार्मिक संघटना तसेच नॅशनल अकांडंटॅबिलिटी ब्युरो (राष्ट्रीय उत्तरदायित्व विभाग) यांचा वापर केला आहे. राजकारणी सत्तेचा वापर करून पैसा जमा करतात. हे सर्वत्र घडते; परंतु पाकिस्तानात सर्वाधिक काळ सत्ता गाजविणाऱ्या लष्करातील अधिकाऱ्यांनीही अमाप संपत्ती निर्माण केली आहे. पाकिस्तानात आर्थिक उलाढालीत लष्कराचे नियंत्रण असलेल्या कंपन्यांची पकड मजबूत आहे. फौजी फर्टिलायझर, हॉटेले, निर्यात कंपन्या, कापड उद्योग, साखर कारखाने अशा अनेक क्षेत्रात लष्कराचे उद्योग आहेत. त्याद्वारे माजी सेनाधिकारी व निवृत्त सैनिकांना केवळ रोजगार मिळालेला नाही, तर अशा कंपन्यामार्फत त्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे आणि त्यातील बरीचशी परदेशात बॅंका वा मालमत्तांमध्ये गुंतविण्यात आली आहे. नवाज शरीफ यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणांना धार चढावी, या हेतूने जनरल राहिल शरीफ यांनी काही महिन्यांपूर्वी लष्करातील काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा देखावा केला होता.
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था उधळून पुन्हा तालिबान राजवट आणण्यात पाक लष्कराला विशेष रस आहे. भारताविरुद्धच्या संभाव्य लढाईत स्ट्रॅटेजिक डेप्थ (सामरिक खोली) प्राप्त व्हावी, हा हेतू असला तरी त्याहूनही अधिक हेतू तेथील अमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेला आहे. तालिबान्यांना मदतपोटी तेथील अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाखो डॉलर्सची कमाई होत होती. लष्करी अधिकारीही भ्रष्टाचारात, अमली पदार्थांच्या व्यापारात मोठी कमाई करीत असताना इम्रान खान, ताहिर अल काद्री अथवा तेथील न्यायालयांनी त्याची दखल घेतलेली नाही. नवाज शरीफ लष्कराच्या मदतीने आधी पंजाबचे मुख्यमंत्री व नंतर देशाचे पंतप्रधान झाले. इम्रान खान याच्या पक्षाला खैबर व पख्तुन या राज्यांत आघाडी सरकार स्थापन करता आले असले तरी, त्याचा पक्ष देशव्यापी नाही. म्हणून पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी लष्कराचे मांडलिकत्व पत्करले आहे.  

इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्यावर परदेशात कंपन्या काढून पैसा दडवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी स्वतः लंडनमधील मालमत्ता विकताना ब्रिटिश सरकारचा कर चुकविण्यासाठी परदेशी कंपन्या स्थापन करण्याची चोरवाट चोखाळली होती. आयुबखान, झुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो, असिफ अली झरदारी ते इम्रान खान या सर्वांनीच आर्थिक व्यवहारात लपवालपवी केली आहे. राजकारणातील अस्थिर, सुरक्षित ठेवण्यात लष्कराचे हितसंबंध गुंतले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप, कारस्थाने, सूडभावना हा पाकिस्तानच्या राजकारणाचा स्थायीभाव ठरला आहे. नवाज यांच्या जागी उद्या इम्रान खान सत्तेवर आले आणि ते डोईजड वाटू लागले तर त्यांचीही तीच गत होईल.

Web Title: editorial artical vijay salunke