अग्रलेख : प्रशिक्षक ‘पर्मनंट’!

Ravi-Shastri
Ravi-Shastri

प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांनाही ठाऊक होते. तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी जे सोपस्कार केले गेले, ते कशासाठी? आधी रिझल्ट लावून नंतर पेपर तपासण्यासारखेच हे होते!

क्रिकेटच्या दुनियेत गेले दशक मॅच फिक्‍सिंगच्या आरोपांनी कमालीचे वादळी ठरले होते. तेव्हा उठलेला धुरळा अजूनही पुरता खाली बसला आहे, असे म्हणायला जीभ रेटत नाही. सामन्याचे निकाल ‘फिक्‍स’ केले जात असल्याच्या खळबळजनक बातम्यांनी लोकांचा क्रिकेटवरचा विश्‍वास उडाला होता. त्यात अनेक क्रिकेटपटूंच्या कारकिर्दी संपल्या किंवा खुंटल्या. ते सारे मागे टाकून भारतीय संघाने जणू कात टाकली आणि या घटकेला तर कर्णधार विराट कोहलीचा संघ हा क्रिकेटमधली एक अदम्य शक्‍ती म्हणून उदयाला आला आहे. हे सारे घडले, तोवर संघाचा प्रशिक्षक काय घडवू आणि बिघडवू शकतो, हे भारतीय क्रिकेटने अनुभवले होते. या पदाला प्राप्त झालेल्या वलयाची कल्पना रवी शास्त्री यांची निवड आणि त्यासाठीची प्रक्रिया यावरूनही सहजच यावी.

नव्या सहस्रकात पाऊल ठेवताना भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे न्यूझीलंडच्या जॉन राइटकडे होती. त्यानंतरची दोन वर्षे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचे हेकट मार्गदर्शन भारतीय संघाला ‘भोगावे’ लागले. चॅपल यांची प्रशिक्षकपदाची कारकीर्द दोनच वर्षांची ठरली. त्यांच्यानंतर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनने मात्र जणू जादूची कांडी घुमवत भारतीय संघ नावाचे एक मिथक जन्माला घातले. अर्थात, तोवर कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीसारखा लढवय्या युद्धनायक त्यांच्या दिमतीला आला होता; आणि सचिन तेंडुलकर एक असामान्य फलंदाज म्हणून वाजत गाजत होता. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने थेट २०११ मध्ये विश्‍वकरंडक पटकावून आपल्या देदीप्यमान कारकिर्दीचा कळस गाठला.

कर्स्टन यांनी निवृत्त होता होता प्रशिक्षकपदासाठी डंकन फ्लेचर यांचे नाव सुचवले. फ्लेचर यांच्या कारकिर्दीत २०१३ मध्ये भारतीय संघाने ओळीने आठ मालिका जिंकत चॅम्पियन्स करंडकही जिंकला. फ्लेचर दोनच वर्षे टिकले.

नंतर शास्त्री, कुंबळे, संजय बांगर यांनी ही अवघड जबाबदारी सांभाळून पाहिली होती. कर्णधार विराट कोहलीशी न पटल्याने वर्षभरातच कुंबळेच्या प्रशिक्षणाचा कारभार आटोपला. कोहली- कुंबळे भांडणानंतर शास्त्री यांनी सूत्रे हातात घेऊन संघाची पुनर्बांधणी केली. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटला बरेच गोड, काही कडू अनुभव वाट्याला आले आहेत, तरीही त्यांचीच पुन्हा प्रशिक्षकपदी निवड करून क्रिकेट मंडळ आता मोकळे झाले आहे. रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सामान्य चाहत्यालाही ठाऊक होते, तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी मंडळाच्या सल्लागार समितीने निष्कारण फार्स उभा केला. वास्तविक हे आधी रिझल्ट लावून नंतर पेपर तपासण्यापैकीच होते. कपिलदेव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीने इच्छुकांची प्रेझेंटेशन्स पाहून, मुलाखती घेऊन शेवटी शास्त्री यांचेच नाव घेतले. एवढे नाटक करण्याची गरज काय होती? प्रशिक्षकपदाच्या इच्छुकांमध्ये लालचंद रजपूत, रॉबिन सिंग, टॉम मूडी, माइक हेस्सन आणि फिल सिमन्स या अन्य तालेवारांचा समावेश होता.

संघातील खेळाडू आणि व्यवस्थांची इत्थंभूत माहिती शास्त्री यांना असल्याने त्यांचे पारडे जड ठरले, असे कपिलदेव यांनी नंतर सांगितले. शास्त्री यांनी भारतीय संघाला बऱ्यापैकी यशस्वी मार्गदर्शन केले आहे, हे मान्य करावे लागेल. गेल्या २१ कसोटीत १३ विजय, ६० एकदिवसीय लढतींमधले ४३ विजय आणि ३५ ट्‌वेंटी-ट्‌वेंटी सामन्यांत २५ विजय भारताच्या खात्यावर जमा आहेत. ही टक्‍केवारी गुणवत्ता यादीतलीच मानायला हवी. पण गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातली भारताची हाराकिरी आणि धोनीला फलंदाजीसाठी वरच्या फळीत न पाठवण्याची चूक शास्त्री यांनी केली होती. त्यांचे इतरही काही निर्णय चुकले होते. परंतु त्याची कुठलीच ‘शिक्षा’ न होता उलट त्यांना ‘पर्मनंट’ करण्याचा मंडळाचा निर्णय सध्या टीका ओढवून घेतो आहे. शास्त्री यांची निवड ही ‘फिक्‍सिंग’ असल्याची शेरेबाजी नेटकऱ्यांनी सुरू केली नसती तरच नवल होते.

काहीही असले तरी, शास्त्री यांना भारतीय क्रिकेटमधल्या ‘व्यवस्थां’चे नीट ज्ञान आहे, हे यावरून उघडच दिसते. अन्यथा, एवढा देखावा होऊन त्यांची निवड तरी कशी झाली असती? सल्लागार समितीने प्रशिक्षकपदाच्या उमेदवारांची रीतसर लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली. मुलाखती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे तामझाम करत त्यांना शंभरपैकी गुणदेखील दिले. परंतु, त्यात रवी शास्त्री अपेक्षेप्रमाणे गुणवत्ता यादीत झळकले, त्याला सल्लागार समिती तरी काय करणार? चालायचेच. प्रशिक्षक हा संघाचा गुरू, मार्गदर्शक आणि एका अर्थाने पालकच असतो. रवी शास्त्रींना ही भूमिका आता २०२१पर्यंत निभवायची आहे. झाल्यागेल्या नाटकावर पडदा पाडून भारतीय क्रिकेटला पुन्हा एकवार कळसाला नेण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवावी, एवढीच अपेक्षा. कारण क्रिकेट नावाच्या बेभरवशाच्या सदाबहार खेळात वशिला चालत नाही, तेथे मोजमाप होते ते थेट यशापयशाचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com