अग्रलेख : नहले पे दहला

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

‘आरे’च्या परिसरातील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना उतरली आहे; परंतु त्यात पर्यावरणाच्या मुद्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा प्रयत्नच जास्त दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही हुकमाचे पान आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले. 

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गळामिठी मारल्यानंतर साडेतीन-चार महिने उलटून गेले, तरीही केंद्र तसेच राज्यातही सत्तेचे भागीदार असलेल्या या दोन पक्षांत जागावाटपाच्या उताऱ्या रोजच्या रोज सुरू आहेत. जागावाटपाच्या या पत्तेवाटपात मुंबईतील ‘आरे’ दुग्ध वसाहतीतील जागा मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्धारास विरोध करून शिवसेनेने एक डाव टाकला आहे. ‘आरे’चे ‘नाणार’ होईल, हे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हा त्याचाच भाग होता. मात्र यावर कोणताही बचावात्मक पवित्रा न घेता मुळात ‘नाणार’मधील प्रकल्प तेथेच करण्याचा विचार असल्याचे सांगून फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रत्युत्तर दिले. या ‘नहले पे देहला’ ठरणाऱ्या उताऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हुकूम आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले. 

राजापूर परिसरातील या महत्त्वाच्या प्रकल्पास सत्तेत असतानाही शिवसेनेने विरोध केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री सर्वशक्‍तिनिशी हा प्रकल्प नाणार येथेच उभारण्यासाठी प्रयत्नशील असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प नाणार येथे होणार नसल्याची सनसनाटी घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर जमिनींच्या अधिग्रहणासंबंधातील अध्यादेश रद्दबातल करत असल्याचे जाहीर केले. त्या वेळी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी  हातातला हुकूम बाहेर न काढता, शिवसेनेपुढे नमते घेतले होते. त्यामुळे शिवसेनेचा रथ जमिनीपासून चार अंगुळे वरूनच चालू लागला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला दुर्री-तिर्रीसारखी पाने वाटायला सुरुवात केलेली दिसते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’चेही ‘नाणार’च होणार, अशी घोषणा करताच फडणवीस यांनी नाणार प्रकल्प राजापूर परिसरातच व्हायला हवा आणि त्यासाठी नव्याने चर्चा करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे.

महाजनादेश यात्रेदरम्यान कोकणात मुख्यमंत्र्यांनी ‘नाणार प्रकल्प हा हरित प्रकल्प आहे आणि त्यामुळे लाखभर नोकऱ्या उपलब्ध होतील.’ या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. पण त्याचा मुख्य हेतू शिवसेनेचे नाक दाबणे, हाच आहे. लोकसभा निवडणुकीत ‘युती’साठी थेट दिल्लीहून येऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांना उद्धव यांना गळामिठी मारणे भाग पडले आणि तेव्हापासून उद्धव हे ‘आमचं ठरलंय!’ असे रोजच्या रोज सांगत आहेत.

प्रत्यक्षात विधानसभेतील ५०-५० टक्‍के जागावाटपाच्या शिवसेनेच्या मागणीस भाजपने लोकसभेतील मोठ्या यशानंतर खो घातला आणि ५० टक्‍क्‍यांचे सूत्र हे दोन्ही पक्षांनी गेल्या विधानसभेत जिंकलेल्या जागा वगळून उर्वरित म्हणजे जेमतेम १०३ जागांसाठी असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे विधानसभेत भाजपपेक्षा जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याचे शिवसेनेचे स्वप्नही भंगले आणि त्यानंतरच शिवसेनेने ‘आरे’तील जागा मेट्रो कारशेड देण्याविरोधात मोठा आवाज लावला, ही वस्तुस्थिती आहे. याचा आणखी एक पदर आहे. ‘नाणार’ असो की ‘आरे’, भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना पर्यावरण रक्षण वा निसर्ग संवर्धन यात रस नसून, या बाबींचा वापर ते केवळ सत्ताकारणाच्या राजकारणात आपल्याच तथाकथित मित्रपक्षांवर कुरघोडी करण्यासाठी करत आहेत. शिवसेनेने ‘आरे’च्या विषयावरून इतके वादंग माजवले नसते, तर फडणवीस हेही आपल्या हातातील पत्त्यांतून ‘नाणार’ची उतारी करतेच ना! त्यामुळे हा सारा खेळ म्हणजे सत्तेच्या राजकारणातील रसीखेच आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या कोकण दौऱ्यात आणखी एक उतारी झाली आणि ती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची. भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत निवडून आल्यापासून राणे हे आपला ‘स्वाभिमान पक्ष’ भाजपमध्ये विलीन करून आपल्या दोन्ही पुत्रांचे राजकीय भविष्य सुखद करण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र अद्यापि भाजपने त्यांना दाद दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे कोकणात राणे यांनी जातीने स्वागत केले आणि त्यानंतर आपण लवकरच भाजपमध्ये दाखल होत आहोत, असे पत्रकारांना सांगून टाकले! मात्र ‘नाणार’ प्रकरणातून हुकूम बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनी त्याबाबत काहीही भाष्य करण्याचे टाळले आणि बहुधा ‘नाणार’पेक्षा कोकणातील पत्रकार राणे यांच्या भविष्याबाबतच अधिक उत्सुक असल्याने त्यांनी आपली पत्रकार परिषदही रद्द केली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आता संपली असून, या यात्रेत त्यांनी विरोधकांचे अनेक गड काबीज करण्यात यश मिळविले. कोकणात गेल्यावर कोकणी माणसासारखाच बेरकीपणा दाखवत त्यांनी राणे कुटुंबीयांच्या तथाकथित बालेकिल्ल्याबाबत अवाक्षरही काढले नाही! या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपला आता मित्रपक्षांचे फारसे सोयरसुतक नाही. शिवसेनाही उपमुख्यमंत्रिपद तरी पदरात पडते काय, याच्याच प्रयत्नात असणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com