अग्रलेख : बीसीसीआयचा ‘दादा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सौरभ हा आक्रमक फलंदाज होता, त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या दहा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातही तो काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकेल.

सौरभ हा आक्रमक फलंदाज होता, त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या दहा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातही तो काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकेल.

विसावे शतक संपत आलेले असताना, भारतीय क्रिकेट एका मोठ्या सावटाखाली आले होते. ‘मॅच फिक्‍सिंग’च्या आरोपामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिगंत कीर्ती मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंचे नीतिधैर्य खचण्याचा धोका निर्माण झाला होता. कर्णधार महंमद अझरुद्दीनला राजीनामा देणे भाग पडले होते आणि आक्रमक फलंदाजीमुळे मैदानावरचा ‘दादा’ असा किताब मिळालेल्या सौरभ गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. सौरभने त्या सावटातून भारतीय क्रिकेटला बाहेर काढले. एवढेच नव्हे तर विजयाची नशाही चाखायची संधी दिली. सचिन तेंडुलकरच्या साथीने हा ‘दादा’ मैदानात उतरला की भल्या भल्या गोलंदाजांची पाचावर धारण बसू लागली.

मात्र, काही काळानंतर चित्र बदलले आणि भारतीय संघाचे कोच म्हणून ऑस्ट्रेलियातून आयात केलेले ‘गुरू’ ग्रेग चॅपेल यांच्याशी त्याचे तीव्र मतभेद झाले. अखेर त्याला संघाबाहेर पडावे लागले. आज त्याच सौरभच्या हाती दोन रात्रींत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद आले आहे. प्रदीर्घ काळानंतर एका क्रिकेटपटूच्या हातात क्रिकेटच्या व्यवस्थापनाची सूत्रे आली आहेत आणि हा बदल स्वागतार्ह आहे.

अर्थात, मैदानावर चमकदार कामगिरी बजावणे आणि खेळाचे व्यवस्थापन सांभाळणे, या दोन भिन्न बाबी असल्या तरी सौरभ ही नवी जबाबदारीही तितक्‍याच समर्थपणे पार पाडू शकेल, असे सहज म्हणता येते. बुद्धिमत्ता तर त्याच्याकडे आहेच आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याला व्यवस्थापनात सतत कामी येऊ शकेल. हे अध्यक्षपद सांभाळताना त्याला सर्वांना सांभाळून घेत भारतीय क्रिकेटचा विश्‍वचषक जिंकून १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने क्रिकेटची मक्‍का म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडमधील लॉर्डस मैदानावर फडकवलेला झेंडा अधिक उंचावर नेण्याचे काम करावे लागणार आहे. 

अर्थात क्रिकेट तसेच हिंदी सिनेमाइतकेच भारतीय जनतेला आकर्षण असते ते राजकारणाचे आणि ‘बीसीसीआय’देखील राजकारणापासून कधीच दूर राहिलेले नाही. अनेक बड्या राजकीय नेते वा त्यांच्या पाठिंब्यावरील उद्योजक या मंडळाची धुरा सांभाळत आले आहेत. त्यात शरद पवारांपासून थेट अरुण जेटलींपर्यंत अनेकांची नावे सहज आठवतात. आज सौरभ ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष होत असतानाच या मंडळाचे सचिव म्हणून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या बिनविरोध निवडीची केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे. तर मंडळाचे खजिनदारपद हे भाजप नेते आणि विद्यमान मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू हे अरुणकुमार धुमल यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे सौरभच्या या निवडीलाही राजकारणाची झालर आहेच आणि त्याचा एक पदर हा थेट पश्‍चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुंतलेला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या हातातून त्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हिसकावून घेण्यास भाजप कमालीचा उतावीळ झाला आहे.

‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सौरभच्या हाती गेले त्यास ही अशी राजकीय पार्श्‍वभूमी आहे; कारण सौरभचा प. बंगालमध्ये ‘करिष्मा’ मोठा आहे. खरे तर माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेलचे नाव पुढे केले होते आणि त्यावर जवळपास शिक्‍कामोर्तब झाल्यातही जमा होते. त्यानंतरच्या ४८ तासांत आणि मुख्य म्हणजे दोन रात्रींत चक्रे फिरली आणि तीही ‘बीसीसीआय’चे मुख्यालय मुंबईत असताना चक्‍क दिल्लीतून! याचा अर्थ स्पष्ट आहे. ही सूत्रे हलविण्याचे काम मंडळाचे आणखी एक प्रमुख सूत्रधार अनुराग ठाकूर यांनीच केले. त्यामुळे आता सौरभ हा भाजपच्या हातातील प्यादे तर बनणार नाही ना, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता तो भाजपमध्ये जातो का आणि त्यापलीकडची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करतो काय, तेवढेच बघायचे!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील या सत्तेच्या संघर्षाला आणखी एक पदर आहे आणि तो ‘आयसीसी’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळावर ‘नॉमिनी’ म्हणून कोण जाणार, यासाठी होऊ घातलेल्या लढाईचा आहे. त्या पदासाठी श्रीनिवासन उत्सुक आहेत; मात्र या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद सध्या भारताकडेच प्रख्यात विधिज्ञ शशांक मनोहर यांच्याकडे आहे. ‘बीसीसीआय’वर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अनेकदा श्रीनिवासन आणि शरद पवार यांच्यात संघर्ष झालेला आहे आणि मनोहर हे पवार गटातील आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका यासंदर्भात महत्त्वाची आहे.

‘बीसीसीआय’वर गैरकारभाराचे आरोप झाल्यानंतर नेमण्यात आलेल्या न्या. लोढा चौकशी समितीने जारी केलेले निकषही या संदर्भात विचारात घ्यावे लागणार आहेत. लोढा समितीच्या शिफारशींनुसार त्याच्या वाट्याला अध्यक्षपदाचे जेमतेम दहा महिनेच येणार आहेत; कारण तो सध्या प. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. तो कालावधीही त्याच्या या नव्या पदाच्या काळासाठी मोजला जाणार आहे. अर्थात, सौरभ हा आक्रमक फलंदाज होता, त्यामुळे या दहा महिन्यांतही त्याने ‘बीसीसीआय’मधील आणि देशातील राजकारण बाजूला ठेवून चांगली ‘फलंदाजी’ अध्यक्षपदावरूनही केली, तर या अध्यक्षपदाचे सोने होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article