अग्रलेख : महागाईची चेटकीण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मतदान करून जनतेने आपले कर्तव्य बजावले असले, तरी सरकार स्थापनेच्या बाता मारणारे पुढारी अजूनही खुर्चीच्या भांडणात मश्‍गूल आहेत. त्यांना ना दरकार पावसाने झोडपून निघालेल्या शेतकरी बांधवांची, ना महागाईने पिचलेल्या ग्राहकांची!

मतदान करून जनतेने आपले कर्तव्य बजावले असले, तरी सरकार स्थापनेच्या बाता मारणारे पुढारी अजूनही खुर्चीच्या भांडणात मश्‍गूल आहेत. त्यांना ना दरकार पावसाने झोडपून निघालेल्या शेतकरी बांधवांची, ना महागाईने पिचलेल्या ग्राहकांची!

‘सखी सैंया खूब ही कमात है, मेहेंगाई डायन खाये जात है’ असे एक फिल्मी लोकगीत काही वर्षांपूर्वी बरेच लोकप्रिय झाले होते. चित्रपटाच्या तिकीटबारीवर हमेशा गर्दी करणाऱ्या मध्यमवर्गीय भारतीय रसिकांनी या गीताला चांगली दाद दिली आणि आपल्या कडकी लागलेल्या खिशावर भरपूर हसूनही घेतले होते. अर्ध्या भाकरीत चंद्र बघणारी आपली सामान्य भारतीय मने खरोखरच सहनशील. महागाईची ही हडळ झपाटून टाकत असतानाही हूं की चूं न करण्याचे शहाणपण जणू आपल्या अंगवळणी पडून गेले आहे.

दु:खाच्या मोजपट्टीवर दुसऱ्याची रेघ किंचित जरी लांब दिसली, तरी तेवढा दिलासा जगण्यासाठी पुरेसा ठरतो. शेतकऱ्यांच्या हालांना पारावार राहिला नाही, हे पाहून आपले मन द्रवते. शहरगावात अचानक नोकरी गमावणाऱ्या तरुणांचे तांडे पाहून हृदयात कालवते. महामंदीच्या फेऱ्यात रिकाम्या दुकानी गल्ल्यावर भकास चेहऱ्याने बसलेल्या व्यापाऱ्यालाही पाहून चुकचुकायला होते. इतकेच काय, मोटारविक्री मंदावून वाहनव्यवसाय उतरणीला लागल्याच्या बातम्यांनीही हळहळायला होते. वास्तविक, मोटारींचे भाव उतरले तरी, ती का आपल्या दारी लागणार आहे? लागली तरी तिच्या टाकीत घालायला पेट्रोल आणि डिझेल कुठल्या कवड्या मोजून आणायचे? पण, असे प्रश्‍न आपल्याला पडत नाहीत. परदु:खाच्या सावलीत आपल्या नशिबी असलेली जुनाट सायकलची प्याडले आणि वारंवार घसरणारी चाकावरली साखळी दुर्लक्षित राहते. स्वत:च्या नष्टचर्याबाबतीतच उदासीन असलेल्या मध्यमवर्गीय मराठी मनांना उभारी देण्यासाठी कुठलाही मसीहा धावून येत नाही, हे मात्र खरे.

अस्मानी-सुलतानीने पार भरडून निघालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलाच पाहिजे, यात शंका नाही. त्यांनी पिकवले नाही, तर आपल्या ताटात कुठून येणार आहे? हवालदिल शेतकऱ्यांना ‘आधार देण्या’साठी मोठमोठे पुढारी अगदी वांद्य्रापासून बांधापर्यंत धावत जातात. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहेच; पण तेवढे पुरेसे नाही. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मूळ प्रश्‍न वर्षानुवर्षे आहेत तिथेच आहेत, त्यांचे काय?

शेतकऱ्यांचे प्रश्‍न व्यवस्थेशी संबंधित आहेत आणि त्यावर राज्यकर्त्यांनी मार्ग काढायचा नाही, तर कुणी? भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यात फेकून दिला? देऊ दे. दूध उत्पादकांनी संतापाने शेकडो लिटर दुधाचे टॅंकर भररस्त्यात ओतून दिले? देऊ दे. शेतकऱ्यांनी रस्त्यात ओतलेल्या टोमॅटोच्या राशींचा चिखल झाला? होऊ दे. कोथिंबिरीची जुडी अडीचशे रुपये? पालकाची जुडी ऐंशी रुपये? कांदे किती?- ऐंशी रुपये किलो? होऊ देत. हे सारे शेतकऱ्यांना जसे भोगावे लागते, तसेच शहरगावात राहणाऱ्या चाकरमान्यांनाही भोगावे लागते. कधी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल कवडीमोलाने विकण्याची वेळ येते, तर कधी भाव गगनाला भिडल्याने आम आदमीच्या डोळ्यांत पाणी येते. महागाईने आज जो आगडोंब उसळला आहे, त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसत असतो. कारण, ग्राहकाला कुठलीही वस्तू कधीही पुरेशी स्वस्त मिळत नसते, हा बाजारपेठेचा नियमच आहे. कारण, ‘पुरेशी स्वस्त’ ही संकल्पनाच सापेक्ष असते. पुरेशी म्हणजे किती? याचे उत्तर प्रत्येकाच्या खिशाने द्यायचे असते. उदाहरणार्थ, कांद्याचा भाग गडगडला की शेतकऱ्यांची अवस्था बिकट होते.

पण, तेव्हा ग्राहकाला तोच कांदा कस्पटाच्या भावात उपलब्ध होतो काय? याचे उत्तर नकारार्थीच येईल. कोथिंबिरीला आज केशराचा भाव आला आहे. हीच कोथिंबीर मुबलक प्रमाणात आठवडी बाजारात किंवा मंडईत येते, तेव्हाही आपल्याला तिच्यासाठी किमान दहा रुपयांची नोट काढून द्यावीच लागते. अडते-दलालांच्या कह्यात गेलेल्या शेतीमालाच्या बाजाराची सूत्रे ना शेतकऱ्याला धड जगू देतात, ना ग्राहकांना! या बेमुर्वत अव्यवस्थेला मोडीत काढण्याचे काम सरकारचे असते. पण, लोकांनी लोकांसाठी चालवलेले ते लोकांचे सरकार आज जाग्यावर आहेच कुठे? मतदान करून जनतेने कर्तव्य बजावले असले, तरी सरकार स्थापनेच्या बाता मारणारे पुढारी अजूनही खुर्चीच्या भांडणात मश्‍गूल आहेत. त्यांना ना दरकार महागाईने पिचलेल्या ग्राहकांची, ना पावसाने झोडपून निघालेल्या शेतकरी बांधवांची. राजकीय नेत्यांनी शहरांतल्या भाजीमंडयांमधला हाहाकारदेखील एकदा डोळ्यांखालून घालायला हवा. एरवी पुढाऱ्यांसमोर सत्तास्थापनेचे प्रश्‍न विचारत फिरणाऱ्या माध्यमांनाही महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांचा आवाज व्हावे, असे वाटत नाही. खुद्द मध्यमवर्गालाच आपल्याला कुणी वाली असावा, असे वाटत नाही. तेथे इतरांचे काय? महागाईची चेटकीण दूर ठेवणारी अशी कोणती विभूती या वर्गाकडे आहे? ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे अच्छे दिन’ अशा शांतवृत्तीने महागाईला सामोरे जाणाऱ्या या ग्राहकवर्गाला विचारावेसे वाटते : कौनसी चक्‍की का आटा खाते हो भाई?... या कुछ खातेही नही?’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article