अग्रलेख : असहिष्णुतेचे अंतरंग!

atal bihari vajpayee
atal bihari vajpayee

‘बेनकाब चेहरे हैं, दाग बडे गहरे हैं, टूटता तिलिस्म आज, सच से भय खाता हूँ...गीत नहीं गाता हूँ’ माजी पंतप्रधान आणि कविवर्य अटलबिहारी वाजपेयी यांच्याच गाजलेल्या या ओळींची आठवण होते आहे. कारण, वाजपेयींनी या ओळी बहुधा आणीबाणीच्या काळात लिहिल्या असाव्यात. मात्र, त्या कवितेत उमटलेले ‘सत्याचे भय’ सध्या देशात निराळ्या अर्थाने वावरू लागले आहे काय, अशी शंका येण्यास वाव आहे. विरोधी टीकेचा सूर राज्यकर्त्यांना सहन न होण्याचे प्रसंग आपल्या देशात नवे नाहीत. किंबहुना, कित्येकदा टीकाकारांचे आवाज बंद करण्याचे विविध मार्ग राज्यकर्त्यांनी याआधीही चोखाळल्याची डझनावारी उदाहरणे देता येतील; पण गेली पाच वर्षे राज्यारुढ असलेल्या मोदी सरकारवर असहिष्णुतेचे सर्वाधिक आरोप झाले, हे नाकारून चालणार नाही. त्यातील अनेक आरोप निव्वळ राजकीय असतील किंवा हेतुत:ही केले गेले असतील; पण जेएनयूमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, किंवा विचारवंतांच्या हत्येचा मुद्‌दा असो, दरवेळी सरकारी यंत्रणांनी आपल्या प्रतिक्रियावादी असहिष्णुतेचे दर्शन घडवले आहे, हे नाकारता येत नाही. हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याला सध्या निमित्त आहे, आंतरराष्ट्रीय पत्रकार आतिश तासीर यांच्यावर गृहखात्याने केलेल्या कारवाईचे. 

परदेशात स्थायिक असलेले तासीर हे भारतीय वंशाचे. त्यांच्या मातोश्री श्रीमती तवलीन सिंग या भारतातील गाजलेल्या स्तंभलेखिका आणि पत्रकार, तर वडील सलमान तासीर हे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गव्हर्नर. २०११मध्ये वडिलांची पाकिस्तानात हत्या झाली. वयाच्या २१ वर्षांपर्यंत पित्याचे तोंडदेखील न पाहिलेल्या तासीर यांनी पुढे परदेशात पत्रकारिता सुरू केली. आपले वडील पाकिस्तानी होते, ही बाब आतिश तासीर यांनी दडवून ठेवली, असा ठपका ठेवून केंद्रीय गृहखात्याने त्यांचे ‘परदेशस्थ भारतीयत्व’ रद्द केले आहे. वास्तविक याच तासीर यांनी गेल्या मे महिन्यात सारा देश सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीत रंगला होता, तेव्हा ‘टाइम’ या नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा ‘डिव्हायडर-इन-चीफ’ या शीर्षकाचा लेख लिहून वादळ उठवले होते.

आतिश तासीर यांना त्यांच्या त्यामुळेच ‘शिक्षा’ मिळाल्याची जगभरातील विचारवंतांची भावना आहे. तसे ‘काळजी व्यक्‍त करणारे’ एक जाहीर पत्र या विचारवंतांनी पंतप्रधान मोदींना पाठवले आहे. अर्थात, ते प्रसिद्धही केले आहे. या पत्रावर नोबेल विजेते तुर्की लेखक ओराम पामुक, जॉन मॅक्‍सवेल कोट्‌झी, बुकर विजेत्या मार्गरेट ॲटवुड यांच्यासह अमिताव घोष, सलमान रश्‍दी, झुंपा लाहिरीसारख्या निर्भय लेखणीच्या तब्बल अडीचशे तालेवार वैचारिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रामुळे राज्यकर्ते जागे होणार काय, हा प्रश्‍न आहे. आपल्या देशाबद्दल वैचारिकांच्या विश्‍वात कुठली प्रतिमा मूळ धरून आहे, एवढे तरी आपल्याला कळावे.

अर्थात असहिष्णुतेची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असे मानण्याचे कारण नाही. जगभरात डाव्या-उजव्या विचारसरणीची असोत वा लष्करी किंवा हुकूमशाही राजवटी असोत, तेथे विरोधी विचारांचेही स्वागत होते, असा दावा कुणी केला तर तो दांभिकपणाच होईल. काही ठिकाणी दमनाचा वरवंटा असा काही फिरतो की, माणुसकीचा हा कुठला पैलू आहे? असा प्रश्‍न जाणत्यांना पडावा. भारतात तितकी वाईट अवस्था नसली तरी ज्या खुलेपणाचा, सहिष्णुतेचा आपण अभिमानाने उल्लेख करतो, त्या गोष्टी टिकविणे हे आपले कर्तव्य आहे. विरोधी सूर दडपण्याचा राज्यकर्त्यांचा उघड पवित्रा त्या प्रतिमेलाच धक्का देतो, हे लक्षात घ्यायला हवे. असहिष्णुतेचे दर्शन घडवण्यासाठी सरकारी यंत्रणाच राबवावी लागते असे नव्हे! समाज माध्यमांपासून ते झुंडशाहीपर्यंत कित्येक मार्ग या दमनकार्यासाठी खुले असतात. ‘सबका साथ, सबका विकास...सबका विश्‍वास’ अशी घोषणा देऊनही मोदी सरकारविरोधातील हा असहिष्णुतेच्या आरोपांचा सिलसिला अजूनही थांबायला तयार नाही.

२०१५ मध्ये असहिष्णुतेच्या निषेधार्थ डझनभर कलावंतांनी आपले राष्ट्रीय पुरस्कार परत केले होते. त्याआधी तब्बल ४१ विचारवंत व कलावंतांनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ पंतप्रधानांना जाहीर पत्र लिहिले होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महम्मद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शिवसेनेच्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईत आयोजकांच्या तोंडाला काळे फासले होते. ‘पद्‌मावत’ चित्रपटाच्या संदर्भात देशभर उठलेली राळ, राजकीय विरोधालाही राष्ट्रद्रोह मानणे हा काही जुना इतिहास नव्हे. टीकेने घायाळ होणारा राज्यकर्ता ज्या क्षणी उसळून प्रतिघात करायला जातो, त्या क्षणी लोकशाही नामक व्यवस्थेचा एक चिरा ढासळतो, हे ध्यानी घ्यायला हवे. विविधांगी संस्कृतींनी विनटलेल्या भारतात असहिष्णुतेला थारा नाही.

आतिश तासीर यांच्या प्रकरणाची सत्यासत्यता यथावकाश बाहेर येईल. देशाचा कायदा त्यांनी मोडला असेल, तर उचित कारवाईदेखील होईल; परंतु ही प्रक्रिया सुरू असताना जगभरातील विचारवंत आपल्या राज्यव्यवस्थेबद्दल कोणती प्रतिमा उरात बाळगत आहेत, याचेही भान राज्यकर्त्यांनी ठेवायचे असते. तसे झाल्यास वाजपेयींच्या कवितेत उमटलेले ‘सत्याचे भय’ वाट्याला येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com