अग्रलेख : एका सत्तांतराचे मूकनाट्य!

sundar-pichai
sundar-pichai

सत्तांतराच्या तीनअंकी धुवाधार नाटकाचा कळसाध्याय संपवून महाराष्ट्रातली जनता थोडीफार उसंत घेत असतानाच जगाच्या पटलावर एका अतिबलाढ्य कंपनीतही बिनआवाजाचे एक सत्तांतर घडले. या कंपनीचा कारभार जगड्‌व्याळ म्हणावा असा.

पण, जवळपास संपूर्ण पृथ्वीगोल व्यापणाऱ्या या कंपनीच्या संस्थापकांनी स्वत:हून पायउतार होत, एका तरुण सर्वाधिकाऱ्याच्या हाती सारी सूत्रे देऊन टाकली. ‘अल्फाबेट’ ही ती कंपनी. नुसत्या ‘अल्फाबेट’ या संबोधनाने फारसे काही ध्यानी येणार नाही. पण, ही कंपनी सर्वव्यापी, सर्वसाक्षी ‘गुगल’ची पालक कंपनी आहे, एवढे सांगितले तरी पुरेसे ठरावे. आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जेमतेम साडेतीनशे अब्ज डॉलरची.

‘अल्फाबेट’ आणि ‘गुगल’चे बाजारमूल्य तब्बल नऊशे अब्ज डॉलरचे आहे. तरीही, तिथले सत्तांतर हे अगदी शांतपणे पार पडले. एक समंजस निर्णय म्हणून त्याकडे साऱ्या जगाने पाहिले. अर्थात, राजकारणातले सत्तांतर आणि कॉर्पोरेट कंपन्यांमधले सत्तांतर, यात गुणात्मक फरक असणारच. तसे ते आहेच; पण या परिवर्तनाचे परिमाणच वेगळे आहे आणि ते समजून घेतले पाहिजे. ‘गुगल’चे मुख्याधिकारी पिचाई सुंदरराजन ऊर्फ सुंदर पिचाई यांच्याच हाती ‘अल्फाबेट’च्या चाव्या देऊन लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन हे दोघेही संस्थापक पायउतार झाले. पेज हे कंपनीचे चेअरमन होते, तर ब्रिन मुख्याधिकारी. दोघेही वयोवृद्ध वगैरे नाहीत. वयवर्षे सेहेचाळीस हे काही निवृत्तीचे वयही नव्हे.

याच दोघांनी कॅलिफोर्नियातील एका मोटार गॅरेजमध्ये ‘गुगल’ची मुहूर्तमेढ रचली होती. मायावी आंतरजालात रुजलेल्या या एका बीजापोटी आज अब्जावधी डॉलर किमतीचे तरू कोटी कोटी निर्माण झाले आहेत. ‘गुगल’ घराघरांत पोचले आहे. अवघ्या सत्तेचाळीस वर्षांच्या सुंदर पिचाई यांनाच आपली लाडकी बलाढ्य कंपनी चालवायला देऊन टाकून पेज आणि ब्रिन यांनी नेमके काय साधले, असा प्रश्‍न कोणीही विचारील. लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन या जोडीला आता जी क्षितिजे खुणावताहेत, तिथे पोहोचण्यासाठी ‘थोडे मोकळे होणे’ त्यांना आवश्‍यक वाटले. पेज आणि ब्रिन यांना आता मानवाचे आयुर्मान वाढवण्यासाठी संशोधन करायचे आहे.

मानवरहित वाहनांच्या निर्मितीसाठीही त्यांची धडपड चालूच आहे. अशा महत्त्वाच्या कामात व्यग्र असताना ‘गुगल’चा व्याप सांभाळत बसण्यात त्यांना फारसे स्वारस्य वाटले नाही, एवढाच त्याचा अर्थ.

सुंदर पिचाईंना मिळालेले हे ‘प्रमोशन’ जगातले सर्वांत महागडे आणि महत्त्वाचे प्रमोशन मानले जाते. सुंदरकडे सूत्रे दिल्याचे पेज-ब्रिन यांनी जाहीर केल्या केल्या शेअर बाजारात ‘अल्फाबेट’ आणि ‘गुगल’च्या शेअरचा भाव वाढून दोघाही संस्थापकांना प्रत्येकी ऐंशी कोटी डॉलरची तत्काळ कमाई झाली. भागधारकांनी संस्थापकांना दिलेली ही निरोपाची भरभक्‍कम भेट म्हणावी लागेल. पेज-ब्रिन यांची कंपनीतली भागीदारी कायम राहणार असून, त्यांचे अधिकारही शाबूत राहणार आहेत. फक्‍त दैनंदिन कामकाजात आता त्यांचा सहभाग असणार नाही, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सुंदर पिचाई यांना मिळालेली ही बढती दिसायला गलेलठ्ठ दिसली असली, तरी नजीकच्या भविष्यकाळात त्यांना प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तसे जाताना त्यांना भारतासारख्या बाजारपेठेची, म्हणजेच पर्यायाने आपली गरज लागणार आहे, म्हणून हे सत्तांतर आपल्यासाठी महत्त्वाचे. ‘गुगल’ची मक्‍तेदारी मोडून काढण्यासाठी चिनी कंपन्यांनी कंबर कसली आहे. आजही चीनमध्ये ‘गुगल’ला शिरकाव नाही. ही बाजारपेठ खुली करून घेण्यासाठी पिचाई यांना बरीच कसरत करावी लागणार आहे.

‘चिनी टिकटॉक’ने ‘गुगल’च्या ‘यूट्यूब’शी झुंज मांडली आहे. ‘टिकटॉक’ हे बाइटडान्स नामक चिनी कंपनीचे अपत्य. लघुचित्रफितींचे सध्याचे अतिलोकप्रिय व्यासपीठ जणू. पण, या चिमुकल्या बाळाने ‘यूट्यूब’चा जणू नक्षा उतरवला. ‘गुगल सर्च इंजिन, गुगल मॅप्स, यूट्यूब, गुगल पे’ अशी अनेक उत्पादने सुंदर पिचाईंची कंपनी चालवते. आजवर त्यांना यशही भव्यदिव्य मिळाले. परंतु, पुढील काळात तिखट स्पर्धेसाठी कंपनीला स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. या बदलांसाठी आपण तयार व्हायचे की नव्या पिढीकडे सूत्रे सोपवायची, अशा प्रश्‍नातून पेज-ब्रिन या संस्थापकद्वयीने स्वत:शी प्रामाणिक राहून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या संक्रमणाचे लक्षण म्हणून या बदलाकडे आपल्याला पाहावे लागेल. ‘ॲपल,’ ‘मायक्रोसॉफ्ट’नंतर ‘गुगल’च्या जन्मदात्यांनीही आपली साम्राज्ये सोडल्याने नवीच स्थिती निर्माण झाली आहे.

‘ॲपल’चे स्टीव्ह जॉब्स असोत किंवा ‘मायक्रोसॉफ्ट’चे बिल गेट्‌स, यांच्यासारख्या अनेकांनी नव्वदीच्या दशकात संगणकांच्या डिजिटल दुनियेत आमूलाग्र बदल घडवले; किंबहुना संपूर्ण जगताचा चेहरामोहराच पालटला. परंतु, ‘फेसबुक’चा जनक मार्क झुकेरबर्गचा सन्मान्य अपवाद वगळता हे सारे प्रतिभावान ‘भगीरथ’ एकतर निवृत्त झाले आहेत किंवा निवर्तले आहेत. अफाट वेगाने जाणाऱ्या या डिजिटलयुगाला पुढे नेणाऱ्या पिढीने संक्रमणाला तोंड कसे द्यायचे, हे ठरवायचे आहे.

पूर्वसूरींच्या हाती निर्मितीची बीजे होती, येणाऱ्या पिढीला दिशा निश्‍चित करून झेप घ्यायची आहे. एका आव्हानाकडून दुसऱ्या आव्हानाकडे, असा हा अनंताचा प्रवास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com