अग्रलेख : पोलिसी ‘न्याय’

Hydrabad-Police
Hydrabad-Police

देशभरात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांसंबंधातील अत्यंत संतापजनक बातम्या एका पाठोपाठ एक येत असतानाच, हैदराबादमध्ये घडलेल्या अशाच एका मन विषण्ण करून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ‘चकमकी’त गोळ्या घालून ठार केले. या त्यांच्या कृतीमुळे देशभरात ज्या प्रकारे जल्लोष झाला, त्यातून अनेक प्रश्‍न उभे राहतात. पण, ते उपस्थित करण्यापूर्वी सध्याच्या वास्तवाची दखल घेतली पाहिजे. बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास, त्यांच्यावरील आरोप सिद्ध होणे व आरोपींना शिक्षा होणे या संपूर्ण प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईविषयी कमालीचा राग समाजात आहे.

जनतेमधून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांना या उद्विग्नतेची पार्श्‍वभूमी आहे, हे नाकारता येणार नाही. हैदराबादेतील ही चकमक घडण्याच्या दोनच दिवस आधी बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीने फिर्यादी पीडितेवर हल्ला करून तिला पेटवून दिल्याची घटना घडली. एका प्रकरणात आरोप सिद्ध होऊनही फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी वेळेत न झाल्याने आरोपीची शिक्षा माफ झाली. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळेच आरोपींना ठार करणाऱ्या पोलिसांवर हैदराबादेतील जनता पुष्पवृष्टी करते, फटाके वाजवले जातात आणि पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतो, तेव्हा त्याचा या एका घटनेपुरता विचार करून चालत नाही.

आपल्या व्यवस्थेतील; विशेषतः गुन्हेगारी तपास व न्यायदान प्रक्रियेतील त्रुटींकडे अत्यंत गांभीर्याने पाहून त्यात सुधारणांची निकड किती तीव्र आहे, हे या प्रतिक्रियांवरून लक्षात येते. बलात्कार करून संबंधित पीडितेचा खून करण्याचे गुन्हेही वाढत आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान समोर उभे आहे, याची जाणीव करून देणारा हा घटनाक्रम आहे. तरीदेखील जे घडले, त्याची योग्यायोग्यता तपासायला हवी.

बलात्कार करणाऱ्यांना तत्क्षणी ठार करून अशा प्रकारचे गुन्हे थांबतील काय, याचा नीट विचार केला पाहिजे. तत्कालिक भावनिक प्रक्षोभ काही वेळा स्वाभाविक ठरतो, हे खरे असले, तरी त्याचीच रीत तयार होणे हे व्यवस्था म्हणून समाज आणि देशाचे ढळढळीत अपयश असते, हे समजून घेतले पाहिजे. भविष्यातील हा संभाव्य धोका नजरेआड करता येणार नाही. हैदराबादेतील पशुवैद्यक डॉक्‍टर असलेली सव्वीस वर्षांची युवती रात्री घरी परतत असताना, चार तरुणांनी मदतीच्या बहाण्याखाली फसवून तिच्यावर अमानुष बलात्कार केला आणि तिचा खून करून पेट्रोल-डिझेल ओतून जाळले होते. या प्रकरणी ‘एफआयआर’ दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसांवर टीकेचा भडिमार झाला होता.

या पार्श्‍वभूमीवर चकमकीत चार आरोपी मारले गेल्याची घटना घडली आहे. ही घटना एखाद्या दाक्षिणात्य हाणामारीच्या चित्रपटांतून उचलून वास्तवात सादर करावी, अशा प्रकारे घडली आहे. तिचे स्वागत करण्यात सिने-अभिनेते पुढे असावेत, हा निव्वळ योगायोग नव्हे. अक्‍कीनेमी नागार्जुनासारख्या दाक्षिणात्य अभिनेत्याबरोबरच ऋषी कपूर यांच्यासारखा कलावंत पुढे आल्यामुळे सिनेमात जे काही घडते, ते तसेच वास्तवातही घडावे, एवढ्यापुरतीच त्यांची दृष्टी सीमित असल्याचे दिसते. पोलिस तपासासाठी आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते; पण त्यासाठी त्यांनी थेट मध्यरात्रीनंतरची वेळ निवडली. आरोपी पळून जात असताना, पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या, असे सांगण्यात आले. पोलिसांनी या चकमकीविषयी जे काही कथन केले, त्याने संशयाचे धुके कमी होण्याऐवजी गडदच होते.

ज्यांनी सत्तेची पदे उपभोगली आहेत, राजकीय व्यवस्थेत काम केले आहे, त्या मायावती वा उमा भारती यांच्यासारख्यांनीदेखील पोलिसी ‘न्याया’चे समर्थन करावे, यात कोणालाच काही खटकत नसेल, तर ही भयावह स्थिती म्हटली पाहिजे. आपल्याला देशात ‘पोलिसराज’ आणावयाचे आहे काय, असाच प्रश्‍न यातून निर्माण होतो. पोलिसांनी हे जे काही केले, ते कितीही अपवादात्मक असले, तरी या चकमकीची रीतसर चौकशी कायद्यानुसार होईल. तशी ती झालीही पाहिजे. याचे कारण असा परस्पर ‘न्याय’ करण्याची पद्धत रूढ झाली, तर अनवस्था ओढवेल. ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेलाच हरताळ फासला जाईल. आपली न्यायव्यवस्था पीडित महिलांना जलदगतीने न्याय देऊ शकत नसेल, तर त्यांना थेट गोळ्याच घालणे योग्य, असे वाटू लागणे, ही खरे तर आपली सध्याच्या ‘व्यवस्थे’विषयी वाटणारी हतबलता आहे.

बलात्कारासारख्या गुन्ह्यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ही शिक्षा न्यायव्यवस्थेच्या चाकोरीतून जाऊन, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यावर व्हायला हवी. न्यायव्यवस्थेलाच वळसा घालून रस्त्यावर ‘न्याय’ होत असेल, तर निरपराध भरडले जाणार नाहीत, याची हमी कोण देईल? सुव्यवस्था ही निव्वळ भावनांच्या आधारावर चालविली जात नाही, याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com