अग्रलेख : गडावरील तोफा!

eknath-and-pankaja
eknath-and-pankaja

‘आम्ही पक्ष सोडलेला नाही; पक्षानेच आता आमचे काय करायचे ते ठरवावे!’ असे आव्हान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या गेल्या पाच-सहा वर्षांच्या राजवटीत प्रथमच मिळाले आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदींनी दिलेले हे आव्हान कसे हाताळले जाणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

महाराष्ट्रातील हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागल्याबरोबर भारतीय जनता पक्षात असंतोषाचे वारे वेगाने वाहू लागले होते आणि त्या असंतोषाला भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा पैलू होता. कोणे एके काळी मूठभरांचा पक्ष अशी जनसंघाची संभावना होत असे. मात्र, याच जनसंघाने ‘भाजप’ नावाचे नवे अंगडे-टोपडे धारण करताना आपल्यावरील हा शिक्का पुसून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. महाराष्ट्रात वसंतराव भागवत यांनी ‘माधव’ फॉर्म्युला म्हणजेच माळी-धनगर-वंजारी यांना पक्षाच्या छावणीत सामावून घेण्याची व्यूहरचना आखली खरी; पण तो ‘फॉर्म्युला’ यशाचा आहे, हे सिद्ध करून दाखवले ते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या अथक परिश्रमांमुळे. नरेंद्र मोदी यांच्या ‘सुनामी’त भाजपने विधानसभेच्या १२२ जागा जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सूत्रे दिल्यानंतरच्या पाच वर्षांत राज्यातील भाजप नेतृत्वाने या यशाचे मूळ ‘सूत्र’च विस्कटून टाकले की काय, अशी चर्चा सुरू झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी त्या चर्चेला आणखी जोर आला आणि त्याचा फटका बसलेल्या असंतुष्टांनी गुरुवारी गोपीनाथ मुंडे यांच्याच जन्मदिनाचा मुहूर्त साधत ‘गोपीनाथ गडा’वरून थेट फडणवीस यांनाच लक्ष्य करत तोफा डागल्या. त्यात अग्रभागी होत्या अर्थातच गोपीनाथरावांच्या कन्या पंकजा मुंडे.

विधानसभा निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे निकाल लागले तेव्हापासूनच दिसत होते. त्यामुळे या मेळाव्यात भाजपमधील खदखद बाहेर येणार हे अपेक्षित होते. गेली काही वर्षे उपेक्षा वाट्याला आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्‍तव्यावरूनही ते जाणवत होते. गडावरील या तोफखान्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने खरा बार भरला तो पंकजा यांच्याबरोबर खडसे यांनीच!

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’ या नावाने स्वतंत्र काम सुरू करण्याचा निर्णय जाहीर करून पंकजा यांनी थेट भाजपच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. शिवाय, त्यांनी पक्षाच्या ‘कोअर कमिटी’च्या कामातून आपण मुक्‍त झाल्याचेही जाहीर केले. ‘आम्ही पक्ष सोडलेला नाही; पक्षानेच आता आमचे काय करायचे ते ठरवावे!’ असे आव्हान मोदी व अमित शहा यांच्या गेल्या पाच-सहा वर्षांच्या राजवटीत अशा रीतीने प्रथमच मिळाले आहे. त्यामुळे आता या असंतुष्टांबाबत नेतृत्व काय भूमिका घेणार, असा प्रश्‍न या मेळाव्यातील घणाघाती भाषणांमुळे उभा राहिला आहे. 

पंकजा यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला खडसे यांच्याबरोबरच पक्षात असूनही निर्वासिताचे जिणे जगावे लागणारे आणखी एक माजी मंत्री प्रकाश महेताही उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपच्या मित्रपक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही आपली व्यथा उघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाला गेल्या पाच वर्षांत सत्तेचा दर्प कसा आणि किती चढला होता, त्याचेच दर्शन घडले. ‘हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे!’ अशा प्रकारचे राजकारण गोपीनाथरावांनी कधी केले नाही, असे सांगत नाथाभाऊंनी ‘या मेळाव्यात पक्षाच्या विरोधात बोलू नये!’ असा आदेशच आल्याचे जाहीर करून टाकले. शिवाय ते स्वत: व पंकजा यांच्या भाषणांमुळे हा आदेश या मेळाव्यात थेट कचऱ्याच्या टोपलीतच भिरकावून दिल्याचे बघावयास मिळाले आणि त्यामुळेच या मेळाव्यापूर्वी चंद्रकांतदादांनी या सर्व असंतुष्टांची बैठक घेऊन केलेली शिष्टाईही फळास आली नसल्याचे स्पष्ट झाले. खडसे यांनी तर भाषणाच्या ओघात ‘पंकजा पक्ष सोडणार नाही!’ अशी ग्वाही देतानाच ‘माझा मात्र भरवसा धरू नका!’ असे सांगून टाळ्या घेतल्या. या मेळाव्यात झालेल्या भाषणांमध्ये सर्वाधिक प्रतिसाद होता तो नाथाभाऊंनाच. त्यातच त्यांचे भाषण अत्यंत जहरी व तसेच वर्मावर घाव घालणारे होते. ही सारी घणाघाती टीका निमूटपणे ऐकण्याशिवाय व्यासपीठावरील चंद्रकांतदादांपुढे पर्यायच नव्हता. अखेर, या तक्रारी तसेच वेदना यांची दखल घेतली जाईल, असे सांगणे त्यांना भाग पडले. 

आता ‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’च्या नावाने पंकजा राजकारण करणार आहेत आणि २७ जानेवारी रोजी औरंगाबादेत मराठवाड्याचे प्रश्‍न सोडवण्याचे साकडे नव्या सरकारला घालण्यासाठी त्या एक दिवसाचे उपोषणही करणार आहेत. मात्र, गेली पाच वर्षे केवळ राज्यातच नव्हे; तर केंद्रातही भाजपची एकहाती सत्ता असताना आणि शिवाय, त्या मंत्री असतानाही या प्रश्‍नांची तड का लावता आली नाही, या प्रश्‍नाला मात्र पंकजा यांनी सोयीस्कररीत्या बगल दिली. एकूणातच या नेत्यांनी भाजपश्रेष्ठींना दिलेले हे जाहीर आव्हान मोठेच आहे आणि ‘पक्षानेच आपल्याला काढून टाकावे; आपण पक्ष सोडणार नाही!’ या त्यांच्या भूमिकेमुळे तर हा गुंता भलताच वाढला आहे. सत्ता असताना पक्षातील अंतर्विरोध हे झाकून टाकता येतात; पण सत्ता जाताच असंतुष्ट कसे रस्त्यावर येऊन लक्‍तरे काढतात, तेच या घटनेत दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com