शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardabai Pawar

शारदाबाईना एकंदरीत तेरा मुले झाली, नऊ मुले व चार मुली. त्यातील दोन मुले लहान असतानाच वारली. या दोघांचेही नाव यशवंत ठेवले होते. मुलांना उपदेश करताना त्या अनेकवेळा म्हणत, किडामुंगीसारखे जगू नका, जीवनात उच्च ध्येय ठेवा. स्वत:च्या उत्कर्षाबरोबरच समाजाच्या उत्कर्षाचेही ध्येय समोर ठेवा.

शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास

शारदाबाई गोविंदराव पवार हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्याविषयी, त्यांच्या हयातीतील परिस्थितीबद्दल, त्या त्या काळानुसार घडलेल्या स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थितीविषयी, घटनांविषयी, त्यांच्या मुलांविषयी, कार्याविषयी, कौटुंबिक जीवनाविषयी सर्वांगाने व अभ्यासपूर्ण विचार व लेखन माझ्या 'शारदाबाई गोविंदराव पवार' या पुस्तकात मांडलेले आहेतच. पुस्तकामध्ये समाविष्ट असलेले बाईंचे लोकल बोर्डमधील कार्य मी जवळपास साडेतीन महीने रोज जिल्हाधिकारी कार्यालयात बसून चौदा वर्षण च्या प्रोसिडिंगमधून अभ्यासले आहे. ते कधीही प्रकाशात आलेले नव्हते कि कोणालाही नीट माहिती नव्हते. सर्वच विषय सलगपणे, विस्तृतपणे पुस्तकामध्ये सामावणे शक्य नव्हते. या लेखात उणिवांची भरपाई करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

शारदाबाई : बालपण, शिक्षण
पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरमध्ये शारदाबाईंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे या गावात 12 डिसेंबर 1912 ला झाला. बाईंचा जन्म झाला तो काळ स्वातंत्र्यपूर्व होता, पेशवाई गेल्यानंतरचा काळ. मराठी जनतेसाठी स्वतला दिशा देण्याचा तसेच सामाजिकदृष्ट्या पुनर्बांधणीचा काळ. इंग्रजांनी आपल्याबरोबर आणलेल्या विचारांमध्ये, संकल्पनांमध्ये महाराष्ट्रातील तत्कालीन समाजसुधारकांनी नवीन समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी आवश्यक अशा प्रेरणा व दिशा धुंडाळण्याचा प्रयत्न केला. बाईंच्या जन्मदरम्यान राजर्षी शाहूंनी कोल्हापूरमधे महात्मा फुल्यांच्या विचारसरणीने प्रेरित असलेल्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या मूलगामी सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या विचारधारेशी सुसंगत वर्तन बाईनीं पुढील काळात दाखवून दिले. आणि सामाजिक बांधिलकीचे व जबाबदारीचे संस्कार मुलांच्या मनावर रुजविले. अगदी लहानपानापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बाईंना स्वतःच लखलखण नियती नावाच्या अगम्य अशा दैवगतीसमोर पारखून द्याव लागले. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे वयाच्या अडीच टिनाच्या वर्षीच वडिलांच्या मायेची पाखर, पितृछाया या सर्व गोष्टींना पारखे व्हावे लागले. बाईंचे वडील वारले तेव्हा त्यांना दोन बहिणी, एक भाऊ व आई होते. एका बहिणीचे लग्न श्रीपतराव जाधव या सद्गृहस्थांशी झाले.

माझी लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस : पवार

या बहिणीच्या घरी बाई, त्यांचे भाऊ व आई पितृछत्र हरपल्यानंतर राहण्यास गेले. श्रीपतराव जाधव हे त्याकाळी मुंबई सरकारच्या सेवेत चांगल्या हुद्द्यावर होते. पण याच दरम्यान बाईंच्या आयुष्यात दुसरी दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे या बहिणीला क्षयरोग झाला. त्याकाळी क्षयरोग हा एक दुर्धर, जीवघेणा रोग होता. त्यातच त्या गेल्या! काय घडतेय हे कळण्याचेही ते वय नव्हते. ते वय होते फक्त खेळण्या, बागडण्याचे, हट्ट करण्याचे, लाडकौतुक करून घेण्याचे. ! पण नियतीने बाईंपुढे पुन्हा एकदा रडीचा डाव टाकला होता! अंगी मोठेपण सहजगत्या चालून येत नसते !अडीअडचणींनी भरलेल्या आयुष्यात शांतपणे सामोरे जाण्यासाठी बहुतेक त्यांच्या मनाची मशागत करून घेतली जात असावी! येईल ती परिस्थिती त्या स्वीकारीत होत्या! काकासाहेबांनी बाईंना शिकविण्याचा निर्धार केला. त्याप्रमाणे त्यांना सेवासादांमध्ये ठेवण्यात आले. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी न्या. म. गो. रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या व्यापक कार्यातून हि संस्था उभी राहिली.

सेवासदनमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणाला संदर्भ होता तो आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्याचा! संस्थेची एक शाखा बारामती येथे होती व संस्थेने त्या काली स्त्रियांसाठी वसतिगृह काढले. हे वसतिगृह मुलींचे व प्रौढ स्त्रियांचे मोठे आधारकेंद्र झाले होते. बाईंसारख्या निराधार मुलींना संस्थेचे वसतिगृह हा दुसरे 'घरंच' मिळाले होते. बाईंचे सर्व शिक्षण याच वसतिगृहातून झाले होते. १९११ साली श्री. लल्लुभाई सामलदास मेहता व विठ्ठलदास ठाकरसी यांनी पहिल्या सहकारी बँकेची स्थापना केली. या बँकेचे नाव 'बॉम्बे अर्बन को ऑपरेटिव्ह बँक' असे होते. बँकेचे मॅनेजर म्हणून श्री. वैकुंठभाई मेहता काम होते. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच बारामतीमध्ये सहकारी कामाचे लोण आले. पूर्वी सर्व सोसायट्यांचे रेकॉर्ड तपासणीकरिता सुपरवायझिंग यूनियनचे सुपरवायझर नावाची एक पोस्ट असायची. आबा प्रथम सुपरवायझर होते. नीरा कॅनालच्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे दैन्य हळूहळू दूर होऊ लागले. या साठी सहकारी चळवळीला मदत करण्याचे प्रयत्न या बँकेने केले . त्यासाठी शेती मालाच्या विक्रीचे एक अडत दुकानही बँक चालवत असे. पण खरेदी विक्रीचे काम बँकेचे नेहमीचे नसल्याने श्री. वैकुंठलाला मेहता यांनी नीरा कॅनाल सोसायट्यांचा खरेदी विक्री संघ स्थापन केला. या संघाचे आबा प्रथम सेक्रेटरी व नंतर मॅनेजिग डायरेक्टर झाले.

कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील

आबा बाईना एकंदरीत तेरा मुले झाली, नऊ मुले व चार मुली. त्यातील दोन मुले लहान असतानाच वारली. या दोघांचेही नाव यशवंत ठेवले होते. मुलांना उपदेश करताना त्या अनेकवेळा म्हणत, किडामुंगीसारखे जगू नका, जीवनात उच्च ध्येय ठेवा. स्वत:च्या उत्कर्षाबरोबरच समाजाच्या उत्कर्षाचेही ध्येय समोर ठेवा. मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी बाई स्वतः कधीही स्टॅंडपर्यंत पोहोचवायला गेल्या नाहीत. सर्व मुलांना उडण्यासाठी पंखात बळ दिले, सर्वाना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रगतीचीही एक विशाल दृष्टी दिली. एवढेच नव्हे तर माधवराना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा होती तर त्यासाठी जमीन विकून पैसे उभे केले. पवार कुटुंबाच्या यशामध्ये माधवरावांनी उभारलेल्या उद्योगधंद्यांचा मोठा वाटा होता. लंडनमधील शिक्षणाचा आपला खर्च भागविता यावा म्हणून माधवराव मैदानाच्या बाहेर उशा भाड्याने देऊन पैसे मिळवीत. एवढेच नव्हे तर हॉटेल खर्च जास्त येतो म्हणून प्रवासामध्ये मोटारसायकलवरून हिंडताना संध्याकाळी गाडीचे दिवे बंद करीत असत, साहजिकच पोलिसाने पकडल्यावर रात्रभर पोलिस ठाण्यात राहण्याची शिक्षा होत असे. वसंतराव हे बाईंचे सर्वात थोरले सुपुत्र. त्यांनी बडोदा व पुणे येथून शिक्षण घेतले. पुढे ते शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत गेले. पुणे जिल्ह्यातील एक निष्णात कायदेपंडित म्हणून त्यांचा नावलौकिक होता, पण अवघे ३५ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. बाईंच्या सर्व मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले पण डॉक्टर कोणीच झाले नाही, बाई आबांना एक तरी मुलगा डॉक्टर व्हावा असे वाटत होते.

अकरा मुलांचे संगोपन, शिक्षण, लग्न, व्यवसाय उभारणी या सर्वात बाई आबा तसूभरही कमी पडले नाहीत. बाईनीं मुलगा मुलगी भेद न करता सर्वाना शिकविले जीवनाच्या पाठशाळेतील स्नातकांच्या ज्ञानाला सेवेची जोड असावी, असा संस्कार बाईंनी आपल्या मुलांवर रुजविला. या संस्कारातून समाजप्रबोधनाचे बीज रुजले जाणे, हे परिस्थितीशी सुसंगत तर आहेच पण तितकेच गरजेचेही आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास, त्याची यशाकडे होणारी वाटचाल, या सर्व प्रक्रियेमागची प्रेरणा, संस्कार , विचार, जडणघडण, शिकवन यांचा प्रगल्भतेने विचार होणे नेहमीच गरजेचे असते. यश हे फक्त पैशाअधारे वा प्रयत्नाधारे मिळत नसून मूळ विचारांमध्ये दूरगामी नियोजन असणे व त्याप्रमाणे नेमकेपणाने पण कठोर अंमलबजावणीची तयारी ठेवणे हे हि गरजेचे आहे. मुलांच्या यश-अपयशात तटस्थतेने सहभागी होऊन त्यांना सातत्याने पाठिंबा देणे, हि साधी गोष्ट नाही. अशा आईचे मन शब्दात पकडणे हे फार कठीण काम आहे!

साधारणपणे 80-90 वर्षांपूर्वीचे शिक्षण व व्यावसायिक कोशल्यांबाबतचे बाईंचे निर्णय व मार्गदर्शन हे कृतिशील विचारवंतानादेखील विचार करायला लावतात. त्यांनी आपल्या मुलांबरोबरच इतरही मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला. त्यांच्या लेखी जातीभेद, अंधश्रद्धेला थारा नव्हता. बाई लोकल बोर्ड मध्ये असताना एक प्रसंग असा घडला, भिवंडी तालुक्यातील चाबे नावाचे एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावातील हरिजनाने तेथील विहिरीवर पाणी भरण्याचा मानवी हक्क शाबीत केला आणि तेथील गावकर्यांनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. बाईंनी लागलीच सभेमध्ये झाल्या प्रकारचा तीव्र निषेध केला. मनाला पटेल ते सभेमध्ये सांगण्याची व न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे.

लोकल बोर्डमधील कार्य
जग रेतीच्या रहाटगाडग्यात न अडकून पडता, वेगळ्या पद्धतीचे आयुष्य जगणारे, वेगळ्या वाटेने जाणारे वाटसरू या जगात फार थोडे होते. प्रपंच, मुलेबाळे, त्यांचे शिक्षण,संगोपन, लग्नकार्य, अडीअडचणी,सुखदुःख तर घरोघरी आहे. हि वाट मळवट जाणारे अनेकजण आहेत. बाईंचा स्वभाव मळलेल्या वाटेने जाण्याचा नव्हता. मळलेली वाट चालायला सोपी असते . त्या वाटेवर ना काटेकुटे , ना खाचखळगे. परंतु त्या वाटेवरून चालणाऱ्या माणसाला जिकडे जायचे असेल तिकडे ती वाट त्याला नेईलच अशी हमी नसते. उलट ती वाट जिकडे नेईल तिकडेच त्या माणसाला जाणे भाग पडते. जिवनात काहीतरी नवे घडविण्याची कुवत ज्यांच्यात असते ती माणसे इतरांना वाट मळवून देण्यासाठी आपले पाय रक्तबंबाळ झाले तरीही चालत राहतात. बाई अशाच चालत राहिल्या रक्तबंबाळ पायाने, काट्याकुट्यातून, दगड धोंड्यातून! जून 1938 मधील निवडणुकीत बाईंना काँग्रेस पक्षाने लोकल बोर्डच्या निवडणुकीत उभे केले. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून एक जागा महिला राखीव असायची व संपूर्ण पुणे जिह्वा मतदारसंघ असायचा. या जागेवर बाईंची बिनविरोध निवड झाली. त्यावेळच्या निवडणूक पद्धतीप्रमाणे कमीत कमी २८ रुपये शेतसारा भरणाऱ्यास मतदानाचा हक्क असे. शनिवार 9 जुलै 1938 पासून बाईंनी जिल्हा लोकल बोर्डमधील आरंभलीला कामाचा यद्न सलग 14 वर्षे अखंडपणे धगधत होता. त्यावेळी पुणे जिल्हा लोकल बोर्डमधील पन्नासपैकी 36 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, या 36 मधील एकमेव स्त्री उमेदवार होत्या शारदाबाई गोविंदराव पवार! तेव्हाचे अध्यक्ष होते शंकरराव मोरे. बाईंना शंकररावांच्या जनताभिमुख, स्वच्छ कारभारातुन खूप काही शिकता आले. तो काळ स्वातंत्र्यपूर्व होता. त्या काली व्हॅनची नीट सोय नसायची. बारामतीहून एक खासगी गाडी पुण्याला येत असे. ती कोळशावर चालणारी असे. त्यामुळे पहाटेपासूनच वाहनचालकाला कोळसा पेटवावा लागे. त्यातून जी वाफ तयार होई त्यावर गाडी चालत असे, या गाडीतूनच बाई बारामती-पुणे-बारामती असा प्रवास करीत असत. दर महिन्यातून एकदा बोर्डाच्या मीटिंगला हजर राहावे लगत असे. एकाच दिवशी दोन मीटिंग असत. पहिली एक वाजता होई. हि संपूर्ण बोर्डाची मीटिंग असे. दुसरी चार वाजता सुरु होई. हि विविध समित्यांची असे. बोर्डाच्या कामकाजात विविध समावेश असे. बाईंनी चौदा वर्षनमध्ये विविध समित्यांवर कार्य केले आहे. त्यातील काही काळ त्या बांधकाम समितीच्या चेरमनही होत्या. साधारणपणे पन्नास सदस्यीय सभेमध्ये बाई एकट्याच स्त्री सदस्य होत्या, बाकी सर्व पुरुष सदस्य असत.

बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी घरातून लवकर निघत असत. घरातील कामे उरकून बाहेर पडावे लागे. एक मूल खांद्यावर तर एक मूल पोटात अशा परिस्थितीत त्या सलग नऊ वर्षे पुण्याला येत. खासगी बसने पुण्याला स्टँडवर आल्यानंतर तेथून पायी किंवा टांग्याने मिटींगच्या ठिकाणापर्यंत जात. बरोबरच्या मुलाला बाहेर शिपायाकडे किंवा तान्हुबाई पाटील यांच्याकडे सांभाळायला देत. बहुधा टांग्याचे पैसे वाचवले जात व बाई पायीच पोहोचत असत. प्रत्येक मुलाच्या वेळी त्या सात महिन्यांच्या गर्भवती असेपर्यंत प्रत्येक सभेला हजर राहत असत. मूळ दोन महिन्यांचे झाल्यावर परत मीटिंगला
उपस्थित राहणे सुरु. 1938 ते 47 च्या दरम्यान बाईंनी चार मुली व दोन मुलांना जन्म दिला. लोकल बोर्डच्या चौदा वर्षांच्या कालखंडात बाई तीन वेळा पब्लिक हेलथ कमिटीच्या सदस्य झाल्या. दोन वेळा पंचायत कमिटीच्या सदस्य झाल्या. तर बरीच वर्षे त्यांनी बांधकाम कमिटीच्या सदस्य व चेअरमन म्हणून काम पाहिले. 50 साली या एकाच वर्षात त्या पब्लिक हेल्थ कमिटी, स्टँडिंग कमिटी, बजेट कमिटी, पंचायत कमिटी या सर्व समित्यांवर काम करीत होत्या! मीटिंगनंतर पुन्हा पायी स्टॅंडपर्यंत !खासगी बसने बारामतीचा प्रवास. घरी आल्यानंतर घरातील कामे, वाचन हे नित्यक्रम चुकत नसत. घराची जबाबदारी, मुलांचे संगोपन, शिक्षण , संस्कार, शेतीचा व्याप, पैपाहुना, सामाजिक कार्य ,आबांच्या कार्यात सहकार्य आणि लोकल बोर्डच्या मध्यातून सर्वसामान्यांच्या अडचणी या सर्व गोष्टी एका वेळी जबाबदारीने सोडविणे पार पाडीत आल्या. 1938 ते 52 कालखंड हा जगाच्या, भारताच्या तसेच तत्कालीन मुंबई प्रांताच्याही इतिहासात अनेक राजकीय घडामोडींनी गजबजलेला कालखंड होय. १ सप्टेंबर 1939 ला जागतिक महायुद्ध सुरु झाले. भारतालाही या युद्धात गोवले गेलं , मुख्य मुद्दा म्हणजे हा कालखंड राजकीय संक्रमणावस्थेचा होता. या काळात समाजाला एक नवी दृष्टी देण्याची व सामाजिक मानसिकतेमध्ये बदल घडविण्याची आवश्यकता होती ! इंग्रजांनी न्यायव्यवस्था, प्रशासनव्यवस्था या माध्यमातून आपली राज्यव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा लोकल बोर्ड हा इंग्रजांच्या जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. जमीन महसूल हा बोर्डाच्या उत्पन्नाचा मुख्य भाग असे. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने, जमीनमहसूल हे उत्पन्नाचे हमखास साधन मानने धाडसाचे होते. उत्पन्नाची इतर साधने रस्ता कर ,धनवान लोकांकडून मिळणाऱ्या देणग्या आणि सरकारी अनुदाने हे होते. 1923 च्या कायद्याप्रमाणे रस्तेदुरुस्ती,विहीरदुरुस्ती, सार्वजनिक इमारती ,रस्त्याच्या कडेचे वृक्षारोपण या सर्वांचा खर्च जर तीन हजार रुपये पेक्षा जास्त येत असेल तर ब्रिटिश सरकारने नेमलेल्या अभियंत्याची लगे. अशा प्रकारे अतिशय काटेकोर आणि कडक बंधनामध्ये ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत तेव्हा काम करावे लागे.

तेव्हाच्या एकंदरीतच राजकीय,सामाजिक, आर्थिक घडामोडींचा विचार करता कोणतेही विचारस्वातंत्र्य, भाषण- लेखन स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य सरकारने कोणालाही बहाल केलेल नव्हते. तर दडपशाहीचा जोरदार वरवंटा सरकार संपूर्ण देशात फिरवीत होते. अशाच वेळी बाईंचे जबरदस्त कणखर व्यक्तिमत्व, एकट्या स्त्रीचे नेतृत्व, बोर्डातील कार्यातून दिसणारे कर्तृत्व व इविध विषयावर केलेले बुद्धिमान, विद्ववतापूर्ण वक्तृत्व झळकत राहिले. 1938 साली ऑगस्ट महिन्यात पुण्यात लॉर्ड रे मुसीयूमतर्फे औद्योगिक प्रदर्शन भरणार होते. बाईंनी या औद्योगिक प्रदर्शनातं शेतकी प्रदर्शनहि भरविण्यात यावे असे मत मांडले. या शेतकी प्रदर्शनातील उत्तम ठरणाऱ्या शेतकी विषयक जिनसेस 50 रुपये रकमेचे रोख बक्षीसही लोकल बोर्डास त्यांनी जाहीर करण्यास सांगितले. बाईंची पंचायत कमिटी सदस्य म्हणून नेमणूक केलेली तेव्हा बाईंनी मौजे वाक येथील शाळेत 1ली व 2री या वर्गांसाठी 'बेसिक एडुकेशन' या योजनेची आग्रही मागणी केली. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक प्रश्न जाणून घेताना, त्यांना मदत करताना मात्र बाईंचे हळवे, सवेंदनाशिल रूप पाहावयास मिळते. त्यामुळेच खेडपांचायतीतील दिवाबत्तीसाठी व पगाराची रक्कम वाढवण्याची शिफारस बाईंनी पंचायत कमिटी सदस्य असताना केली. बाई सदस्य असताना शंकरराव मोरे लोकल बोर्डचे अध्यक्ष होते. अतिशय निस्पृह, कडक शिस्तीचे व्यक्तिमत्व! तत्कालीन मुंबई प्रांताच्या राजकारणात शंकरराव मोरे , केशवराव जेधे ,काकासाहेब गाडगीळ या नावांचा दबदबा असे. शंकरराव मोरे व केशवराव जेधे हि जोडगोळी सत्यशोधक समाजाचाही कार्यात सहभागी असे. बोर्डातील कामकाजाच्या निमित्ताने अशा मोठमोठ्या नेत्यांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. नेत्यांच्या देशाभिमानाने भारलेल्या व्यक्तिमत्वाचा बाईंच्या मनावर विलक्षण प्रभाव पडू लागला. घराबाहेरची जग उघड्या डोळ्यांनी त्या जाणून घेऊ लागल्या. त्यांच्याही मनात समाजाविषयीची, बांधिलकी निर्माण झाली. शिक्षणाचे महत्व तर त्या जाणून होत्याच पण त्याबरोबरच समाजाची

व्यावहारिक बाजू समजून घेऊन याचे महत्व मुलांच्या मनावर बिंबविण्याचा हरप्रकारे प्रयत्न करू लागल्या. सार्वजनिक पैशाच्या वापराबाबत त्यावेळच्या राजकीय धुरिणांची नीतिमत्ता किती उच्च दर्जाची होती याचे उदाहरण म्हणजे, तर एकदा असे झाले, बाई बोर्डाच्या मिटिंगसाठी बारामतीहून बसने पुण्याला आल्या. बस थोढीशी उशिराच पोहोचली. बाईंना मिटिंग हॉल मध्ये पोहोचण्याशी उशीर झाला. परंतु त्या दिवशी बडोदा नरेश सयाजीराव महाराजांचे दुःखद निधन झाल्याची बातमी आल्यामुळे अध्यक्षांनी फक्त शोकप्रस्ताव मांडून इतर कोणतेही कामकाज न करता सभेचे विसर्जन केल्यामुळे सभा विसर्जित व्हायला आणि बाईंनी होलमध्ये पाऊल ठेवायला एकच गाठ पडली. बाईंना उद्देशून शंकरराव म्हणाले 'शारदाबाई, तुम्ही मिटिंगसाठी बारामतीहून आल्या आहेत खऱ्या ,परंतु मिटिंग संपण्याच्या वेळी तुम्ही हॉलमध्ये पोहोचल्यामुळे तुम्हाला येण्याजाण्याचा भत्ता अगर दैनंदिन भत्ता मिळणार नाही. 'बाईंनी त्यांना उत्तर दिले' मलाही हेच अभिप्रेत होते. 'या नीतिमत्तेची आज नवनिशाणी शिल्लक राहिलेली नाही.
बाईंना शंकररावच्या कडक धोरणाचा व सार्वजनिक शिस्तीचा फार जवळून अभ्यास करण्यास मिळाला. यातील एक उदाहरण म्हणजे, एकदा एका ओव्हरसिअरने कोपरे व हडपसर मांजरी रस्त्याच्या कामातील टेंडरमध्ये अनाधिकाराने जादा कामे मागाहून घातल्याचा आरोप होता. अशा कामामुळे शंकररावांनी त्या ओव्हरसिअरचा तात्काळ राजीनामा घेतला. या निस्पृहतेचे उदाहरण आता शोधूनही सापडणार नाही !

सार्वजनिक पैशाचा काटेकोरपणे वापर करण्याबाबत त्या आग्रही असत. आज त्या हयात असत्या तर सार्वजानिक पैशाच्या चालेल्या उधळपटीकडे पाहून नक्कीच चवताळून उठल्या असत्या. !बाईंचा लोकल बोर्डच्या कार्यकालावधीतील काळ सामाजिकदृष्ट्या स्त्रियांना जाचक बंधनांचा होता. बहुजनसमाजतील स्त्रियांसाठी पारंपरिक चालीरितींचा नावाखाली घराचा उंबरठाही ओलांडण्याची परवानगी नव्हती. जेव्हा उंबरठा ओलांडला जाई तो गोष्टी घेऊनच ! अशाच काळात खेड्यातील एक कर्तृत्वशालिनी कधी मूल पोटात असताना तर कधी खांद्यावर मूल टाकून लोकल बोर्डाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी अखंड, अविरतपणे चौदा वर्षे पुण्याला येत असे. जिल्हा लोकल बोर्डच्या माध्यमातून त्या समाजात मिसळल्या. अवतीभोवतीच्या परिस्थितीचे, लोकांचे निरीक्षण, परीक्षण करू शकल्या. इतरांच्या मुलांचे वर्तन पाहून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, जीवनपद्धतीसाठी काय आडाखे असावेत याचे आत्मपरीक्षण करून स्वतःची व कुटुंबाची जीवनशैली विशिष्ट, वेगळ्या मार्गाने आखू शकल्या. खरी व उपजत बुद्धिमान व्यक्ती संधी मिळताच स्वतःच्या बुद्धिचातुर्याची, अष्टपैलू गुणांची उधळण करीतच असते! जीवनजाणिवेच्या सागरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाला अस्तित्व आहे. पाण्याच्या या थेंबामुळेच सागराला बळ आहे. थेंबाशीवाय सागर नाही न सागराबाहेर पाण्याच्या थेम्ब असू शकत नाही ! प्रत्येक माणसातील 'माणुसकी' सागरातील पाण्याच्या थेंबासारखीच असते. बाईंसारखी सांसारिक व्यक्ती, मुलाबाळांची आई ,हि देखील विराट सागरातील थेंबच होती. पण त्यांनी स्वतःतल्या माणुसकीचा वापर तत्कालीन परिस्थिती बदलण्यासाठी अशा प्रकारे केला कि, सागरालाही थेंबाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवावी लागली !

बाईंच्या मुलांपैकी शरदरावांकडे बाईंसारखीच समोरच्याचे बोलणे नेमके समजून घेण्याची क्षमता आहे. तसेच उत्तम आकलनशक्ती व अचूक निर्णयक्षमता आहे. १९९४ साली त्यांनी जाहीर केलेल्या महिला धोरणामुळे सामाजिक लोकशाहीचा पाया घातला गेला, महिलांना मनाचे, आदराचे स्थान मिळू शकले ! महाराष्ट्राच्या राजकीय लोकशाहीला सामाजिक आशय देण्याच्या कार्यात बाई व शरदरावांच्या महत्वपूर्ण वाटा आहे. काळोखातून चंद्रकोर प्रकट व्हावी, कलेकलेने ती वाढत राहावी व तमाम सृष्टीने पौर्णिमा अनुभवावी या पद्धतीने हे अघटीत प्रत्यक्षत घडले. बाईंनी केलेल्या कार्याची वाच्यता कधीही, कोठेही अगदी स्वतःच्या घरातही केली नाही. पण बाई सतत सर्वांशी योग्य तो सवांद साधून असत. कृतिशीलता हे ध्येय मानणारे, स्वतःच्या कल्पक दूरदृष्टीने जनतेचे कल्याणच करतात, फसवणूक नाही! कर्तव्यालाच जीवनशक्ती मानणारे सामाजिक जाणिवेतून आपल्या कर्माची अभिव्यक्ती करतात , लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यातून नाही !बाईंनी घडविलेले समाजकार्य हे आताच्या विकृत राजकारणातून निर्माण होत असलेल्या समाजकार्यापेक्षा फार वेगळे होते. आताचे समाजकार्याची व्याख्या म्हणजे उगाचंच सभा समारंभाला हजर राहणे होय.

बाईंच्या समाजकार्याच्या वैचारिक जाणिवेचे मूळ राजर्षी शाहू महाराज प्रणित सत्यशोधक चळवळीमध्ये आढळते. सत्यशोधक चळवळ कष्टकऱ्यांचे, अंग मेहनत करणाऱ्यांची, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ होती. ब्राह्मण पुरोहिताच्या मध्यस्थाशिवाय लग्न लावण्याचा उपक्रम महात्मा फुल्यानी सुरु केला. बाई आबांचे लग्नही मराठा पुरोहिताकडूनच लावले गेले होते. बाई-आबा सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. बाईंचे वाचन अफाट होते. त्यांच्या बुद्धिवादी विचारसरणीला वाचनाने वेगळेच तेज प्राप्त झाले होते. सामाजिक, राजकीय कार्यातून आणि अनुभवसमृद्धीतून या तेजाला नावीन्य प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांना नेहमी वाटे , 'समाजात मूलभूत सुधारणा व परिवर्तन घडून येतच नाही, फक्त कपड्यालत्त्यात बदल झाला, आंतरजातीय विवाह होऊ लागले, शिक्षणामुळे थोडीफार सुधारणा झाली, चळवळी घडून आल्या पण एकसंध समाज निर्मिती होऊन मूलभूत परिवर्तन घडून आलेच नाही. 'हे अगदीच खरे होते, कारण जन्माने, परमेश्वराने दिलेले हक्क समान आहेत हे कधी मानलेच गेले नाही. माणसामाणसात भेद निर्माण करणारा धर्म हा दुःखाला कारणीभूत थरला, तर जातीयवाद एखाद्या असाध्य रोगासारखा समाजात मिसळून राहिलाय . उत्पादनाच्या साधनांचे सामान वाटप व्हायला पाहिजे तसे होत नाही , कोणतीही चळवळ किंवा चळवळीशी निगडित विचारसरणी हि त्या त्या काळाचे, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे अपत्य असते. वैचारिक बदल काळानुसार समाजमध्ये होत राहतात.

बाईंचा थोरला मुलगा वारल्यानंतर बारामती परिसरातील शे.का.प.चे काम व एकंदरीतच राजकीय बस्तान थंडावलेच होते. ते शरदराव काँग्रेसमधून सक्रिय राजकीय पटलावर येईपर्यंन्त ! नाईलाजास्तव बाई काँग्रेसकडे वळल्या . पण नंतरच्या काळात मात्र त्यांची विचारसरणी समाजवादाकडे झुकू लागली होती. काँग्रेसकडे वळताना बाईंचे मन साशनकच असायचे कि काँग्रेसप्रणित समाजवादी समाजरचना तळागाळातल्या जनतेला न्याय कसा मिळवून देईन ? बाई विशेष बोलत नसत, पण त्यांच्या करारी चेहऱ्यामुळे सर्वाना त्यांचा धाक वाटे. स्वतःचे विचार पटवून देताना दुसऱ्याच्या कलाने त्याची चूक लक्षात आणून देऊन ती पटवून देण्याची नैसर्गिक हातोटी बाईंजवळ होती. त्यामुळे बाईंचा नेहमी दरारा वाटे. या गोष्टीचा लोकल बोर्डमध्ये कामकाज सांभाळताना त्यांना फार फायदा झाला. पण थोरला मुलगा गेल्यानंतर बाई काहीशा विमनस्क,निराश राहिल्या. उणेपुरे 23 वर्षे कुबड्यांच्या आधाराने चालत राहिल्या.

अतिशय जिद्दी, करारी व्यक्तिमत्व शेवटच्या दिवसात मात्र नियती नावाच्या अजब खेळापुढे हतबल झाले. शेवटची दोन अडीच वर्षे तर त्या आजारीच होत्या. तशातच कावीळ झाली, शेवटी शेवटी त्या बेशुद्धावस्थेत होत्या .तशातच एक महान पर्व १३ ऑगस्ट १९७५ रोजी दिवंगत झाले. तेव्हा शरदराव महाराष्ट्र राज्याचे शेती खात्याचे मंत्री होते., शरदराव मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळाले नाही. आबांना मुलाचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकारताना पाहावयास मिळाले. सर्वांची शिक्षण, लग्ने, संसार सुरळीत चालल्याचे, नातवंड पाहण्याचे भाग्य मात्र बाईंना मिळाले. मुलांच्या व्यवसायातील प्रगती त्यांनी अनुभवली नाही .सुखाचे दिवस येताहेत असे वाटतानाच काळाने त्यांना ओढून नेले. जन्माला आल्यापासूनच सुखदुखःच्या लपंडावात त्यांना माघार घ्यावी लागली, ती शेवटपर्यंत! बाईंचा मृत्यू आबांच्या हयातीत झाला. बाईंनी स्वतःला कायावाचामने एक करून आबांच्या चरणी फुल बनून वाहून घेतले होते. बाईंचे जाणे म्हणजे कापूर संपून जाताना मागे काहीही न उरत फक्त सुगंध उरतो ते होय !

Web Title: Sarojini Chavan Writes About Ncp Chief Sharad Pawar Mother Shardabai Govindrao

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad PawarBaramati