विरागी साग

- आनंद अंतरकर
सोमवार, 10 एप्रिल 2017

सागाला एकलेपणाविषयी काही सांगायलाच नको. तो स्वतःच सदैव एकलेपण जगत असतो. वर्षाऋतूतील पर्णसमृद्धीचा पिंगट-करडा काळ असो, नाहीतर शिशिरातली निष्पर्ण अवस्था असो, याचे दिमाखदार एकलेपण कायम नजरेत भरतं. काही लोकांचं मित्रांवाचून बिलकूल नडत नाही. स्वार्थी, मतलबी किंवा निर्बुद्ध माणसांच्या मैत्रीत जगण्यापेक्षा एकट्या जिवाची कालक्रमणा नक्कीच सुखकर. कशाला असला "न्यूसन्स व्हॅल्यू' असलेला गोतावळा.

माझ्या सोसायटीच्या समोरच्या आवारात असाच एक साग आहे. सगळ्या विपरीत परिस्थितीतही तो दिमाखदारपणे उभा आहे, कणखरपणे. जगण्याच्या अदम्य लालसेनं. ऊर्जस्वल, तत्त्वज्ञ वृत्तीनं.

माझ्यासमोरचा हा सगळा परिसर म्हणजे एक छोटंसं पक्षिअभयारण्य आहे. या भूमीला "वेदभवना'चा, सुफलतेचा पवित्र मंत्र लाभलेला आहे. ही भूमी मस्तक उन्मत करणारी. वरद, शक्तिदायी. निर्भय बनवणारी. सदाचाराची दीक्षा देणारी. इथं विविध प्रकारची झाडं एकमेकांच्या हातात हात घालून निरागसपणे नांदत आहेत. आंबा, अशोक, टेंभूर्णी, सुबाभूळ, कडुनिंब, टणटण, साग...कितीतरी. पक्षी म्हणाल तर कावळे, चिमण्या, घारी, भारद्वाज, पावशा, घुबड, बगळे, मोर, बुलबुल, दयाळ असे कितीतरी. तुमचं काही पूर्वजन्मीचं सुकृत असेल, तर क्वचित तुमच्या नजरेला रंगांचा बादशहा किंगफिशर हाही दिसतो. एकदा माझ्या घराच्या ड्राय बाल्कनीतून चुकून एक गरुडाचं पोर घरात शिरलं. पलीकडची फ्रेंच विंडो बंद होती. काच न दिसल्यामुळे तो गरुड बराच वेळ काचेवर धडकत राहिला. त्याच्या तीक्ष्ण नजरेची धार इतक्‍या जवळून प्रथमच पाहायला मिळाली. वर्षाऋतूची चाहूल देणारे निळेजांभळे महुडे इथल्या आकाशात दाटून आले की पिसारा डोलवत मोरांच्या केका झाल्याच सुरू.

खारींचा एक मोठा समूह अगदी दृष्टीसमोर "चूं चूं' करीत सगळ्या झाडांच्या फांद्यांवरून सरसरत बागडत असतो. सागाला वाईट वाटतं, कारण त्याच्या अंगाखांद्यावर पक्षी किंवा खार कुणीच खेळत नाही. ही अस्पृश्‍य वागणूक त्याच्या नशिबी का आली असेल? एकाकी आणि उपेक्षित अवस्थेत जगायची त्याला सवय तर झाली नसेल? एवढं मात्र खरं की, आपलं अस्तित्व तो ताठ मानेनं टिकवून आहे. कुणी पुसो अथवा ना पुसो.

आता हे रणरणतं ऊन...सगळ्यांचेच देह होरपळत आहेत...सागाच्या देहावर एकही पान नाही. अस्थिपंजर होऊन तो आता आपल्या साऱ्या खराटलेल्या भुजा पसरून उभा आहे. मैत्रीसाठी पसराव्यात तशा. कुणाची तरी तो आतुरतेनं वाट पाहात आहे. पण कोणी येत नाही. त्याच्याशी स्नेह जोडत नाही. त्याच्या माथ्यावरचे रुबाबदार तुरे गळून पडले आहेत. सर्वांगी धूळ जमत आहे. सोबतीला फक्त पायतळीचा वाळका पाचोळा...

काल पहाटे मात्र अचानकपणे मला एक चमत्कार पाहायला मिळाला. भोवतालच्या डोंगराडोंगरातून कोकिळांचं कल्लोळगानं सुरू झालेलं होतं. खिडकी उघडून मी वेध घेतला, तर कोकिळा आर्त स्वरात सागाच्या सर्वोच्च फांदीवर बसून आपल्या बांधवांना आर्त साद घालीत होती. तिचे निमंत्रक आलाप पहाटेच्या त्या शुभसमयी "वसंता'तले जणू स्नेहाचे सर्ग होऊन गेले होते, आणि त्या स्नेहधुंद वातावरणात तनमनाची उन्मनी अवस्था झाल्यासारखा साग आनंदानं मोहरून गेला होता.

Web Title: editorial article