हुषारी आणि सचोटी (पहाटपावलं)

शेषराव मोहिते
बुधवार, 7 जून 2017

मग ही माणसे ठामपणे उभी राहतात, तेव्हा कितीही ताकदवान शक्ती त्यांना हरवू शकत नाही. ही माणसे कसल्याही आमिषाला बळी पडत नाहीत. कुणी कितीही टीका केली, तरी डगमगत नाहीत. त्यांनी केलेल्या बंडामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावलेले आहेत, त्यांची शक्ती अफाट असते

सार्वजनिक जीवनात वावरणारी अनेक माणसे आपण पाहतो. काही जण खूप आदर्शवादी असतात. वर्तमान समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी आपले वर्चस्व पणाला लावलेले असते. त्यांना व्यक्तिगत आयुष्यात कोणाकडून काहीही नको असते. स्वतःकडे जे आहे, विशेषतः अन्याय, अत्याचार याविषयी त्यांच्या मनात असणारी पराकोटीची चीड आणि या अन्याय व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठण्याची, त्यास प्रतिकार करण्याची क्षमता, यावर त्यांचा स्वतःचा प्रचंड विश्‍वास असतो. त्यामुळे ही माणसे कशालाही घाबरत नाहीत. पण त्यांना हेही ठाऊक असते, की केवळ त्यागाच्या किंवा आदर्शवादाच्या बळावर आपण फारसे काही करू शकणार नाही. त्यासाठी व्यवहार हा सांभाळावाच लागतो. व्यवहार सांभाळल्याशिवाय या माणसांना जे साध्य करायचे आहे, त्यासाठी ठाम पाय रोवून उभे राहताच येत नाही. मग ही माणसे ठामपणे उभी राहतात, तेव्हा कितीही ताकदवान शक्ती त्यांना हरवू शकत नाही. ही माणसे कसल्याही आमिषाला बळी पडत नाहीत. कुणी कितीही टीका केली, तरी डगमगत नाहीत. त्यांनी केलेल्या बंडामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावलेले आहेत, त्यांची शक्ती अफाट असते, येनकेन प्रकारे या माणसांना प्रभावशून्य करण्यासाठी ते सर्व प्रकारच्या अस्रांचा वापर करीत असतात.

पण कोणत्याही बाबतीत नशिबाला बोल लावावा लागेल आणि ज्या लोकांच्या भल्यासाठी आपण हे बंड पुकारले आहे, त्यांच्या मनात यत्किंचितही शंका निर्माण होईल, अशी बारीकशीही फट राहू नये यासाठी ही माणसे जागरूक असतात. एखाद्या लहानशाही चुकीने आयुष्यभराची पुण्याई मातीमोल होईल याची जाणीव त्यांना असते.

या माणसांना हेही कळते, की आपण केवळ विचारांनी इतरांपेक्षा पुढे वा शहाणे असून चालत नाही. हे विचार कृतीत आणण्यासाठी आपण अधिक उद्योगी, क्रियावान असायला पाहिजे. नाहीतर आपल्या उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष कृतीत न आलेल्या विचारांचे विडंबन पाहायची वेळ येते. ही वेळ येऊ नये, यासाठी ही माणसे प्राणपणाने आपले इमान जपत असतात. तेव्हा कुठे त्यांच्या शब्दांना शस्राची धार येते. त्यांच्या एका हाकेसरशी लाखो लोक उठायला लागतात. अशा लोकांना त्यांच्यासारखेच कितीतरी चांगले लोक भेटतात. स्वतःमधील अगणित क्षमता, ज्या आपण आजवर नीट विकसितच होऊ दिल्या नव्हत्या, त्या क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने त्यांच्या जगण्यातील आनंद गुणाकाराने वाढत जातो. एखाद्या वावटळीत उडालेल्या पालापाचोळ्याचेही सोने व्हावे तसे त्यांच्या आयुष्याचे सोने होते.

आपल्या देशात गांधीजींच्या आंदोलनात हे घडलं. "जेपीं'च्या नवनिर्माण आंदोलनात घडले. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकात शरद जोशींनी सुरू केलेल्या शेतकरी आंदोलनात हे घडले. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांबाबत हे असे घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पण आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे, की केवळ आपली हुशारी आणि क्रियाशीलता पाहून लोक आपणासोबत येत नाहीत. आपली सचोटी ही त्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते.

Web Title: editorial article