शताब्दी ऑलिंपिक सहभागाची

खाशाबा जाधव
खाशाबा जाधव

बेल्जियम ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडू प्रथम सहभागी झाले होते, त्याला यंदा शंभर वर्षे होत आहेत. देशात ऑलिंपिक खेळांच्या प्रसाराची व या स्पर्धेतील सहभागाची पायाभरणी शंभर वर्षांपूर्वी करण्यात उद्योगमहर्षी सर दोराबजी टाटा आणि पुण्यातील डेक्कन जिमखाना क्‍लब यांचा मोठा वाटा होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय ॲथलेटिक्‍स खेळाडू नॉर्मन प्रीतचंद याने १९०० च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवून भारतीय खेळाडूंचा ऑलिंपिक सहभाग व पदकांचा ‘श्रीगणेशा’ केला. पण ब्रिटिश राजवटीत त्याची केवळ ‘वैयक्तिक सहभाग’ अशी नोंद केली गेली.

त्यानंतर १८-१९ वर्षांनी ऑलिंपिकमधील भारतीय संघाच्या समावेशाबाबत प्रयत्न सुरू झाले. पुण्यातील डेक्कन जिमखाना क्‍लबला त्या काळी क्रीडा क्षेत्रात खूप महत्त्व होते. १९१९ मध्ये क्‍लबने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉईड जॉर्ज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा क्‍लबचे अध्यक्ष उद्योगमहर्षी सर दोराबजी टाटा यांनी १९२०मध्ये बेल्जियमधील अँटवर्प येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा संघ ब्रिटिश ऑलिंपिक कमिटीमार्फत पाठवावा, अशी मागणी केली. गव्हर्नर जॉर्ज यांनी ही मागणी मान्य केली आणि फेब्रुवारी १९२०मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने भारतीय संघाच्या प्रवेशास अनुमती दिली. 

मार्च १९२०मध्ये डेक्कन जिमखाना क्‍लबमध्ये झालेल्या बैठकीत सर दोराबजी टाटा, ए. एस. भागवत, ए. एच फैजी, प्रा. मोडक, एस. बूत आणि डेक्कन जिमखाना क्‍लबचे अन्य तीन सदस्य उपस्थित होते. ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची निवड करण्यासाठी एप्रिलमध्ये पात्रता स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय तीत झाला. या पात्रता स्पर्धेत बंगालचे पुर्मा बॅनजी (स्प्रिंटस), कर्नाटकाचे पी. डी. चौगुले (१० हजार मी. धावणे व मॅरेथॉन), साताऱ्याचे सदाशिव दातार (१० हजार मी. धावणे व मॅरेथॉन), हुबळीचे के. कैकाडी (५ हजार मी. व १० हजार मी. धावणे), कोल्हापूरचे रणधीर शिंदे (कुस्ती), मुंबईचे जी. नवले (कुस्ती) या खेळाडूंची निवड करण्यात आली. या पथकाच्या खर्चासाठी दोराबजी टाटा यांनी आठ हजार, भारत सरकारने सहा हजार आणि मुंबईतील क्रीडाप्रेमींनी सात हजार रुपये दिले. हे पथक मुंबईहून पाच जून रोजी लंडनकडे रवाना झाले. स्टॅम्फोर्ड ब्रिज स्टेडियम येथे इंग्लिश प्रशिक्षक एच. पॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे सहा आठवडे प्रशिक्षण झाले. पी. डी. चौगुले आणि शिंदे यांनी चमक दाखवली. 

प्रथमच सहभाग
ब्रिटिश राजवटीतील भारतीय पथकाचा ऑलिंपिक स्पर्धेत हा पहिल्यांदाच सहभाग होता; मात्र खेळाडूंच्या संचलनात ‘तिरंगा’ फडकला नाही. १९२३-२४ मध्ये अस्थायी स्वरूपाची भारतीय ऑलिंपिक कमिटीची स्थापना करण्यात आली. तिचे अध्यक्ष दोराबजी टाटा होते. ‘वायसीएमए’चे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. नोहरेन आणि ए. एस. भागवत हे विशेष निमंत्रित होते. त्यांनी १९२४ मध्ये ऑल इंडिया ऑलिंपिक्‍स गेम्स (म्हणजे आताच्या नॅशनल गेम्स) आयोजित करून, त्यामधून १९२४ च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी ॲथलेटिक्‍समधील पुर्मा बॅनर्जी, पी. डी. चौगुले,  सदाशिव दातार आणि कुस्तीसाठी नवले व रणधीर शिंदे यांची निवड केली.

संचलनात फडकला ‘तिरंगा’ 
सर्व प्रयत्नांना संस्थात्मक स्वरूप येत गेले आणि १९२७ मध्ये इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची अधिकृत स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीनेही त्यास मान्यता दिली. दोराबजी टाटा अध्यक्ष झाले. मद्रास कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे हॅरी क्रो बक आणि ए. जी. नोहरेन यांनी त्यांना साथ दिली. नोहरेन हे पहिले सचिव व जी. डी. सोंधी सहसचिव झाले. दोराबजी टाटा यांनी भक्कम आर्थिक पाठबळ दिले. पुढे १९४८ च्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी ॲथलेटिक्‍स, जलतरण, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॉक्‍सिंग, फुटबॉल, हॉकी या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा निर्णयही झाला. या ऑलिंपिकमध्ये प्रथमच खेळाडूंच्या संचलनात ‘तिरंगा’ फडकला.

पुढे १९९६ मध्ये तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी भारतीय ऑलिपिक संघटनेचे अध्यक्ष बनले व त्यांनी देशातील ऑलिंपिक चळवळीला नवे परिमाण देऊन ऑलिंपिक खेळांच्या प्रसाराला वेग व दिशा दिली. देशातील नामवंत कंपन्या व उद्योगसमूहांनी किमान एक दर्जेदार खेळाडू दत्तक घेणे, परदेशातील तज्ज्ञ प्रशिक्षक आणून प्रशिक्षण देणे, परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवणे, देशात अनेक ठिकाणी क्रीडा सुविधा निर्माण करणे, स्पोर्टस मेडिसीनला प्रोत्साहन; तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकतील, असे प्रयत्न करून त्यांनी याचा पाया रचला. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाने १९२० मध्ये प्रथम भाग घेतला, तेव्हापासून १९८० पर्यंत हॉकी संघाने आठ सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझपदके मिळवून जागतिक हॉकी जगतात वर्चस्व मिळवले. मात्र त्यानंतर भारताची पीछेहाट झाली. वैयक्तिक ब्राँझपदक तब्बल ३२ वर्षांनी १९५२ मध्ये कुस्तीत खाशाबा जाधव यांच्या रूपाने मिळाले; तर १९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिसमध्ये ब्राँझपदक मिळवले. म्हणजेच ऑलिंपिकमध्ये १९२० ते २००० अशी ८० वर्षे भारत सहभागी झाला; मात्र वैयक्तिक पदके दोनच मिळाली.

सोळा वर्षांमधील प्रगती
गेल्या पंचवीस वर्षांत देशात क्रीडा संस्कृती रुजू लागल्यानंतर २००० ते २०१६ या सोळा वर्षांत विविध ऑलिंपिंकमध्ये आपण कुस्ती, बॉक्‍सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस, वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये तब्बल चौदा वैयक्‍तिक पदके मिळवली. त्यात एक सुवर्ण, चार रौप्य व नऊ ब्राँझपदकांचा समावेश आहे.

२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये आपण सर्वाधिक वैयक्तिक सहा पदके मिळवली. ऑलिंपिकच्या पदकतक्‍त्यात तेव्हा भारताचे नावही नसायचे अथवा क्रम अगदी तळात असायचा. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदके मिळवायची असतील, तर त्याची सुरुवात खेळाडूंच्या लहानपणापासूनच व्हायला हवी. कझाकिस्तानसारखे छोटे देशही सुवर्णपदकांची लयलूट करताना दिसतात, तेव्हा आपला देश क्रीडा क्षेत्रात किती मागे आहे, याची जाणीव होते.

ऑलिंपिक पदके मिळवण्यासाठी देशात ऑलिंपिक संस्कृती जोमात वाढवली पाहिजे. सरकारचेही आर्थिक पाठबळ भक्कम असायला हवे, तसेच पालकांनीही ऑलिंपिक खेळ खेळण्यास पाल्यांना प्रोत्साहित करायला हवे. भारतीय खेळाडूंच्या ऑलिंपिकमधील प्रवेशास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षात ऑलिंपिकमध्ये भारत अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करूया!
(लेखक महाराष्ट्र हौशी ॲथलेटिक्‍स संघटनेचे अध्यक्ष आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com