एक ‘जीवदान’ प्रतिस्पर्ध्यांना महागात

अनंत बागाईतकर
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे!

राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे!

राजकारणाची चैतन्यशीलता चकित करणारी असते. एखादा पक्ष किंवा नेता विशिष्ट हेतू बाळगून एखादा निर्णय करतो. पण तो निर्णय केल्यानंतर त्याचे परिणाम त्याच्या नियंत्रणात राहात नाहीत. ते परिणाम कदाचित कलाटणी देणारेदेखील ठरू शकतात. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकारण घडले, ते याच प्रकारचे ठरले. काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव आणि रणनीतीकार अहमद पटेल यांना हरविण्यासाठी भाजप, त्याहीपेक्षा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राजकीय सर्वस्व पणाला लावल्यासारखे चित्र होते. त्यांनी अतोनात प्रयत्न केले. अनेक लढाया जिंकलेल्या या रणनीतीकाराला एका अहमद पटेल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पटेल यांना हरविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे भाजपने नाकारले असले, तरी चित्र हेच होते. एका नेत्याने याचे चांगले वर्णन केले. ‘अहमद पटेल जिंकल्यास काँग्रेसच्या ‘जीर्णोद्धारा’स सुरवात होऊ शकते आणि भाजपला तो जिव्हारी घाव लागेल.’ 

अमित शहा यांना ज्या काही कायदेशीर हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले होते, त्याला अहमद पटेल जबाबदार असल्याची त्यांची धारणा होती. त्याची किंमत चुकती करण्याच्या स्थितीत अमित शहा असल्याने त्यांनी त्यांचे पत्ते खेळले अन्‌ पटेल यांना घाम फोडला. पण परिस्थितीने अशी वळणे घेतली की त्यांची विजयमालिका या पराभवाने वाईट पद्धतीने खंडित झाली. जर भाजपने ही बाब प्रतिष्ठेची केली नसती तर काँग्रेसमधल्याच अंतर्गत लाथाळ्यांमुळे अहमद पटेल आपोआपच पराभूतही झाले असते. पण भाजपला घाई आणि घमेंड नडली. हीच ती राजकारणाची चैतन्यशीलता !

अमित शहा ज्या दिमाखात राज्यसभेत प्रवेश करू इच्छित होते, तो आता काळवंडून गेला. ज्या अहमद पटेलांचे पक्षांतर्गत स्थानदेखील काहीसे डळमळीत झालेले होते, ते पुन्हा पक्के व बळकट झाले. एवढेच नव्हे तर त्यांनी भाजप व विशेषतः अमित शहा यांचे डावपेच धुळीस मिळविण्यात जी चतुराई दाखवली त्यामुळे काँग्रेसमधील त्यांचे ‘चाणक्‍यपद’ अबाधित राहिले, किंवा आणखी काही काळ तरी ते तसेच राहण्याची शक्‍यता निर्माण झाली.

एकप्रकारे अहमदभाईंना जीवदान मिळाले आणि कधी कधी जीवदान मिळालेला फलंदाज शतक, द्विशतक मारून प्रतिस्पर्ध्यांना ते जीवदान अतिमहागात पाडतो तशीच काहीशी स्थिती झाली आहे.

हा झाला अहमद पटेल यांच्या व्यक्तिगत लाभाचा भाग ! परंतु काँग्रेस पक्षातही या विजयामुळे एक नवा उत्साह संचारल्याचे दिसते. त्याचप्रमाणे गुजरातमधील काँग्रेसमध्येही चैतन्य आल्याचे चित्र आहे जे जवळ आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अत्यावश्‍यक राहील. देशभरात काँग्रेसला लागलेल्या गळतीला गुजरातचाही अपवाद नाही. गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला नुकताच राम राम ठोकला. एवढेच नव्हे तर त्यांच्यासकट त्यांच्या अनुयायी आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून अहमद पटेल यांना पाडण्याच्या भाजपच्या कारवाईत सक्रिय भाग घेतला. थोडक्‍यात या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमित शहा यांनी काँग्रेसला गुजरातमध्ये जवळपास नेस्तनाबूत करण्याचीच योजना आखलेली होती. त्यामुळेच फुटीर आमदाराला १५ कोटी रुपये आणि पुढील निवडणुकीत तिकिटाची हमी अशी भरभक्कम आमिषे दाखविली गेल्याची चर्चा होती. यामध्ये काँग्रेसच्या आदिवासी आमदारांनी पक्षाबरोबर उभे राहण्यात कमालीचे साहस दाखविल्याचे अहमद पटेल यांनी कबूल केले. त्याचप्रमाणे मतदानानंतर दिल्लीत निवडणूक आयोगाबरोबर झालेल्या नाट्यमय सामन्यातही काँग्रेस पक्ष, नेते यांनी चतुराई दाखवली. यामध्ये गुजरातमधील नेते शक्तिसिंग गोहिल यांची भूमिका विशेष वाखाणण्यासारखी ठरली. काँग्रेसच्या दोन फुटीर आमदारांची मते बाद ठरविण्यात त्यांनी जी विलक्षण चतुराई, प्रसंगावधान दाखवले त्याला भल्याभल्यांनी दाद दिली. कारण एकदा मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर गोष्टी हातातून निसटल्या असत्या. त्यामुळे मतमोजणीच्या आधीच निवडणूक आयोगाकडे गाऱ्हाणे मांडण्याची व त्यासाठी आवश्‍यक ते पुरावे सादर करण्याची कल्पना त्यांनी मांडली. त्यांनी त्यासाठी जे काम केले त्यामुळेच आयोगालादेखील या प्रकरणात कुठेही फट सापडू शकली नाही. काँग्रेसच्या कायदेपंडित नेत्यांची शिष्टमंडळे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री यांची शिष्टमंडळे यांनी आळीपाळीने निवडणूक आयोगाला भेटून अक्षरशः आयोगाला आखाड्याचे स्वरूप आणले. अखेर आयोगाने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ते आता कोणालाही भेटणार नाहीत, कारण त्यांना या प्रकरणाचे तपशील मिळाले असल्याचे सांगून वाटेला लावले. एखाद्या सरकारचे पाच पाच मंत्री व त्यातही कायदामंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन बाजू मांडण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग. अर्थमंत्री व कायदेपंडित अरुण जेटली यांच्यासारख्या मंत्र्यानेही निवडणूक आयोगाकडे जाणे ही बाब अनाकलनीय होती. यामुळेच भाजपने विजयासाठी किती इरेला पेटलेला होता हे लक्षात येते; पण निवडणूक आयोगाने घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात कुचराई केली नाही, कारण हे प्रकरणच इतके स्पष्ट व उघड होते की त्यात संशयाला जागा नव्हती.

गुजरातमध्ये विधानसभेच्या १७० जागा जिंकण्याचा मनसुबा अमित शहांनी व्यक्त केला आहे. थोडक्‍यात गुजरातमध्ये विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेसचे अस्तित्व ठेवायचे नाही ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आता भाजपने ‘काँग्रेसमुक्त’च्या पुढे जाऊन ‘विरोधी पक्षमुक्त’ भारताची भाषा बोलण्यास प्रारंभ केला आहे. लोकशाहीत अशी इच्छा बाळगणाऱ्या महत्त्वाकांक्षेस काय म्हणावे? त्या महत्त्वाकांक्षेचा राज्यसभा निवडणूक हा प्रारंभ होता. पण त्याचे गणित साफ चुकले. इरेला पेटलेल्या अमित शहांची पुढची चाल काय असेल, याचे अंदाज बांधले जात आहेत. काँग्रेसच्या गोटात उत्साह आला असला तरी गटबाजी कायम आहे. एका उपदव्यापी भाजप नेत्याने केलेली टिप्पणीही बोलकी आहे. तो म्हणाला, ‘अहमद पटेल जिंकले तर जिंकू द्या, त्यांना ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर व्यवहारात अडकवू आणि आत टाकू !’ भाजपने आता सूडबुद्धीचे राजकारणही सुरू केले आहे हा तर याचा अर्थ नाही? पण सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे !

Web Title: editorial article anant bagaitkar