‘घबराहट’ रागाची आवर्तने सुरू

गांधीनगर - अक्षरधाम मंदिराचे महंत स्वामी महाराज यांचे आशीर्वाद घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गांधीनगर - अक्षरधाम मंदिराचे महंत स्वामी महाराज यांचे आशीर्वाद घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

सध्या देशात ‘घबराहट’ राग ऐकू येऊ लागला आहे. हातातून सत्ता सुटू नये, म्हणून सत्ताधीश आणि सत्ताधारी धडपडू लागतात, तेव्हा या रागाचे स्वर ऐकू येऊ लागतात. प्रत्येक राजवटीत हा राग कधी ना कधी ऐकू यायलाच लागतो. 
 

एक जुना विनोदी सिनेमा होता, ‘साधु और शैतान’! 
मेहमूद, किशोरकुमार अशा विनोदवीरांनी त्यात माल केली होती. त्यातला एक प्रसंग! आपल्या टॅक्‍सीत एक मृतदेह लपवलेला आहे हे मेहमूदला माहिती नसते. गायक असलेला किशोरकुमार टॅक्‍सीत बसतो. नजर मृतदेहावर पडल्यावर त्याची पाचावर धारण बसते. आधी निरनिराळे सूर आळवत असलेला किशोरकुमार अचानक धापा टाकू लागल्यावर मेहमूद विचारतो, ‘पंडित जी ये कौनसा राग है?’ त्यावर किशोरकुमार सांगतो, ‘ये घबराहट राग है!’ आणि टॅक्‍सी थांबवून पळत सुटतो. सध्या देशात ‘घबराहट’ राग ऐकू येऊ लागला आहे. गुजरातमध्ये जनमानस फारच बिघडल्याचे पाहून तेथील लोकांवर सवलतींचा वर्षाव करण्यासाठी निवडणूक आयोगाकरवी तेथील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा लांबवणे ही या ‘घबराहट’ रागाची सुरवात होती. वस्तू व सेवा कर ’ ज्याला ‘गुड अँड सिंपल टॅक्‍स’ म्हणून टाळ्या घेण्यात आल्या, त्याचे रूपांतर ‘वाईट व किचकट कायद्या’त झाले. त्याचा फटका बसलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका दत्त म्हणून समोर उभ्या ठाकल्यानंतर या ‘घबराहट’ रागाचे आणखी एक आवर्तन झाले. तत्काळ जीएसटी परिषदेची बैठक बोलावून २८ टक्के कर असलेल्या वस्तूंची यादी झटक्‍यात कमी करण्यात आली. विरोधी पक्षांनी जेव्हा त्याला विरोध केलेला होता, तेव्हा गुजरातच्या निवडणुका नव्हत्या आणि अहंकाराने छाती फुगलेली होती; परंतु गुजरातच्या निवडणुका आणि तेथील जनतेच्या असंतोषाची टाचणी या फुग्याला लागताच भराभरा करांचे दर कमी झाले. प्रश्‍न एवढाच, की गुजरातच्या निवडणुका नसत्या तर हे बदल झाले असते का? 

हे झाले तात्कालिक दाखले. सत्ताधीशांच्या मनात आगामी लोकसभा निवडणुकांमधील यशाबाबत कुठेतरी धास्ती बसली असावी. पुढे- मागे गरज लागलीच तर आतापासूनच चुचकारून ठेवण्यासाठी सर्वशक्तिमानांनी थेट चेन्नई गाठली. अचानक त्यांना द्रमुकच्या शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांची आठवण झाली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करावीशी वाटली. हे प्रेम अचानक कसे उफाळून आले? पूर्वी जयललितांबरोबर हातमिळवणी केली होती. त्या दुर्दैवाने हयात नाहीत. त्यांच्या पक्षाची कोणत्याही क्षणी वाताहात होईल अशी स्थिती आहे. तमिळनाडूचे राजकारण आजही द्रविडी शक्तींच्या हातात आहे. अण्णा द्रमुक पंगू किंवा दुर्बळ झाल्यानंतर द्रमुक हाच शक्तिशाली द्रविडी पक्ष उरतो. आता द्रमुकची चलती असणार हे उघड आहे.

त्याचप्रमाणे करुणानिधी यांच्या कन्या कनिमोळी या आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या आहेत. पक्षाचे ए. राजा यांच्यासारखे नेते तर आधीच ‘टू जी’ गैरव्यवहारात अडकलेले आहेत. त्यामुळे एकीकडे प्रेम दाखवतानाच या पक्षाला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांचे भय दाखवणे आणि सरतेशेवटी लोकसभा निवडणुकीत मुकाट्याने मदत करण्यासाठी त्यांना भाग पाडणे. अतिशय साधी, सोपी अशी ही कार्यपद्धती! 

प्रादेशिक पक्षांना धाकदपटशा दाखवून आपल्या पंखाखाली ठेवण्याचा हा प्रकार नवा नाही. त्यांनाही मजबुरीपोटी केंद्रात सत्ताधारी पक्षाबरोबर चांगले संबंध ठेवावेच लागतात. त्यातून सत्ताधीश आपली सत्ता कायम कशी राहील, हे पाहतो. हाच खेळ सध्या सुरू आहे. या एका कृतीमुळे एका दगडात दोन किंवा त्याहून अधिक पक्षी मारण्याचे उद्दिष्ट भाजप नेतृत्वाने साध्य केले. विरोधी पक्षांच्या आघाडीत सक्रिय व महत्त्वाचा घटक असलेल्या द्रमुकबद्दल शंका निर्माण करणे आणि त्यामार्फत भाजपच्या विरोधात एकत्र होऊ पाहत असलेल्या विरोधी पक्षांमध्ये फूट पाडणे, विरोधी पक्षांची एकी होऊ न देणे सत्तारूढ पक्षाच्या हिताचे असते. काँग्रेस पक्षाने एकेकाळी हेच उद्योग केले होते. आता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ पाहत असलेल्या विरोधी पक्षांना एकत्र होऊ न देणे हे उद्दिष्ट आहे. सत्ताधीश क्रमांक २ जे सत्तारूढ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते काही दिवसांपासून लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला ३५० जागा मिळतील, असे सांगत आहेत.

लोकसभेच्या ज्या १२० जागांवर भाजपला विजय मिळालेला नाही, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वर्तमान २८२ लोकसभा सदस्यांपैकी ६० ते ७० टक्के सदस्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. २०१४च्या निवडणुकीतील पक्षाच्या यशात उत्तर प्रदेश (८०पैकी ७२), महाराष्ट्र (४८ पैकी ४२), बिहार (४० पैकी ३१), गुजरात (सर्व २५), राजस्थान (सर्व २६), मध्य प्रदेश (२८ पैकी २५), दिल्ली (सर्व ७), हरयाना (१० पैकी ७) या प्रामुख्याने उत्तर व पश्‍चिम भारतातील राज्यांचा प्रमुख वाटा होता. पक्षाने दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू व केरळ या पाच राज्यांमध्ये ६६ जागा लढवून २१ जागा जिंकल्या. या ५ राज्यांत लोकसभेच्या १२९ जागा आहेत. या २१ पैकी १८ जागा कर्नाटकातील आहेत. म्हणजेच आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू व केरळ येथे भाजपला फारसे यश मिळू शकले नाही. उत्तर व पश्‍चिम भारतातील राज्यांमधून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला जे यश मिळाले त्याहून अधिक यशाची अपेक्षा करता येणार नाही. कारण ती शिखरमर्यादा होती. त्यामुळेच आगामी निवडणुकीत पक्षाला त्या यशाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा करता येणार नाही. अर्थ हा, की गुजरात व राजस्थानात सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची जादू पुन्हा होणार नाही. म्हणजेच या राज्यांमध्ये कमी होणाऱ्या जागांची भरपाई कुठून करायची हा प्रश्‍न भाजप नेतृत्वापुढे आहे.

त्यासाठी त्यांनी पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, ओडिशा या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. हेच अचानक ‘दक्षिणप्रेम’ उफाळण्याचे कारण! सत्ता टिकविण्याची धडपड सर्वच पक्ष करतात. युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सर्व क्षम्य असते. प्रतिस्पर्ध्यांना कह्यात ठेवणे, काहींना अंकित करणे व त्यासाठी साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करणे या नेहमीच्या युक्‍त्या आहेत. या सर्वांचा सारांश काय? ३५० जागांचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या पक्षाने अचानक ‘घबराहट राग’ आळवण्यास का सुरवात केली? म्हणजेच ‘भाजप-३५०’ ऐवजी ‘एनडीए-३’ची तर ही तयारी नाही? स्वबळावर नाही; पण किमान आघाडी करून का होईना सत्तेत राहण्याची ही धडपड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com