विशेष : ‘सीओईपी’ला लाभलेले सक्षम नेतृत्व

Prataprao-Pawar
Prataprao-Pawar

‘सीओईपी’च्या कार्यात सातत्याने भरीव योगदान देणारे प्रतापराव पवार आता या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. प्रतापरावांच्या या क्षेत्रातील कामगिरीविषयी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या सहकाऱ्याने व्यक्त केलेले मनोगत.

प्रतापराव पवार २००४ पासून  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (‘सीओईपी’) या संस्थेशी संबंधित आहेत. मी त्यांना सर्वप्रथम २००५ मध्ये भेटलो, तेव्हा ते ‘सीओईपी’च्या वित्तीय समितीचे अध्यक्ष आणि नियामक मंडळाचे सदस्य होते. तेव्हा विभागाला ‘सरफेस प्लेट’ घ्यायची होती; पण तिची किंमत खूप जास्त होती. अशा स्थितीमध्ये मी पवार सरांना मदतीची विनंती केली. त्यांनी संबंधित विक्रेत्याला परिस्थिती समजावून सांगितली. ‘सीओईपी’चे मंडळ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्याला दिली; उत्पादनाच्या खरेदीवर सूट देण्यासाठीही त्याचे मन वळविले. पवारांच्या आग्रहामुळे आम्हाला उत्पादनावर भरपूर सूट तर मिळालीच; पण त्याचबरोबर त्यावर अतिरिक्त हमीही मिळाली. ते ‘सीओईपी’च्या स्वायत्ततेच्या पर्वातील प्रारंभीचे दिवस होते. जनतेच्या पैशाचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा आणि बचत झालेले पैसे अन्य प्रकल्पांवर कसे खर्च करायचे, याचे प्रशिक्षण पवार सरांनी आम्हा सर्वांना दिले. शेवटच्या काही वर्षांमध्ये केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेने बारा कोटी रुपयांची बचत केली. माझ्या दृष्टीने हा स्वतंत्र अशा प्रकल्पाचा अभ्यासविषय आहे. अन्य संस्थादेखील यापासून आदर्श घेऊन स्वत:चा फायदा करून घेऊ शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवार सरांनी संस्थेच्या हिशेब पद्धतीत पारदर्शकता आणली. दुहेरी हिशेब पद्धतीची सुरुवात त्यांनीच केली आणि सगळ्या खात्यांमध्ये सुसंगती आणली. आजमितीस ‘सीओईपी’मधील सर्व खाती लोक संकेतस्थळावर पाहू शकतात. संचालक मंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्प आणि खाते अहवाल मांडला जातो तेव्हा संचालक मंडळातील सर्वच सदस्य त्यांच्या कामाचे कौतुक करतात. वेळेचे मूल्य आणि त्याचा सदुपयोग कसा करायचा, हे मी पवार सरांकडून शिकलो. कार्यक्रम कोणताही असो, तेथे ते वेळेवर उपस्थित असतात.

वक्तशीरपणा, दृढनिश्‍चय आणि जिद्द यांचा अनोखा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळतो. ‘सीओईपी’मधील मुलींचे वसतिगृह आणि नव्या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना राहण्यासाठी विशेष सोय नव्हती; तसेच नवे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविण्यासाठी प्राध्यापकांबरोबरच खोल्यांची कमतरता होती. महाविद्यालयाकडे पुरेसा निधीदेखील नव्हता. पवार सरांनी राज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांकडे धाव घेत विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहाबरोबरच शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतुदीची विनंती केली. या दोन्ही वास्तूंच्या उभारणीसाठी साधारणपणे वीस कोटी रुपयांचा खर्च आला. मुलींसाठीचे वसतिगृह आणि शैक्षणिक संकुल यांच्या उभारणीसाठी प्रति चौरस फूट १२५० रुपये एवढाच खर्च करण्यात आला.

तेव्हा बाजारपेठेतील दर साधारणपणे अठराशे ते दोन हजारांच्या आसपास होता. पवार सरांच्या कल्पकतेमुळे संस्थेचे पंधरा कोटी रुपये वाचले. कमीत कमी स्रोतांचा वापर करत सर्वोत्तम निर्मिती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य. सुरुवातीला मुलींसाठीच्या वसतिगृहाची क्षमता चारशे होती. त्यांनी ‘सीओईपी’च्या मंडळाला विश्‍वासात घेत ती सहाशेंवर नेली. त्यांच्या या प्रयत्नामुळेच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीस वसतिगृहामध्ये स्थान मिळते.

जिद्द आणि चिकाटी असलेले ध्येयासक्त उद्योगपती या नात्याने पवार सर नेहमीच स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आग्रही असतात. त्यांचे मित्र (कै.) शेखर कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी बनावटीच्या वस्तूंच्या निर्मितीची जिद्द रुजविली. ज्यांचे पेटंट संपले आहे अशा उत्पादनांच्या आयातीच्या संधी कशा मिळवायच्या याचे धडे कुलकर्णींनी दिले. हे सगळे पवार सरांमुळे घडू शकले. अशा पद्धतीनेच तरुणांना प्रशिक्षण देऊन आपण देशाला पुढे नेऊ शकतो आणि देशाला काही परत करू शकतो, अशी त्यांची ठाम भावना आहे. वित्तीय समितीच्या बैठकांना ते उपस्थित राहतात; पण त्यासाठीचा भत्ता घेण्यास मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या भत्त्याची रक्कम गरजू विद्यार्थ्यांना दिली जावी, अशी सूचना त्यांनी केली. निःस्वार्थपणे समाजाची सेवा कशा पद्धतीने करावी, याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. 

सर्वसामान्य कामांमध्येही पवार सरांचे  असामान्यपण दिसून येते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे निश्‍चित विचार असतो. त्यांच्या अनुभवाला कारणमीमांसा आणि तार्किक अधिष्ठान असून त्यामागे त्याग आणि कटिबद्धता दिसून येते. ‘पद्मश्री’सारखा मोठा सन्मान मिळाल्यानंतरदेखील त्यांच्यातील विनयशीलता तसूभर कमी झाली नाही. आजही ते समाजसेवेच्या व्रतापासून कणभरही ढळलेले नाहीत. ‘सीओईपी’च्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी प्रसंगी औद्योगिक आणि वैयक्तिक हितसंबंधांचा वापर केला. ‘बजाज स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ (बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून ४.५ कोटींची देणगी), दि फिरोदिया स्कूल ऑफ मेटलर्जी (४ कोटींची देणगी आणि प्रसन्न फिरोदिया यांच्या माध्यमातून मिळालेली एक कोटी रुपयांची नवी कोरी उच्चदाबाची डाय कास्टिंग मशीन) यांच्या माध्यमातून ‘सीओईपी’मध्ये स्वदेशी बनावटीची उद्योग प्रयोगशाळा आकारास येत आहे, यामध्ये पवार सरांचे मोठे योगदान आहे. शिक्षणक्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या पवार सरांनी २००७ च्या आसपास ‘एज्युकॉन’ ही पथदर्शक परिषद भरवत आघाडीच्या शैक्षणिक संस्थांच्या कुलगुरू आणि संचालकांना एकाच व्यासपीठावर आणले आणि उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तमता साध्य करण्याचा मार्ग सर्वांना दाखविला.

‘एज्युकॉन’ परिषद आता जगभरात अनेक ठिकाणी भरते. ‘एज्युकॉन’मधील प्रत्येक भाषण आणि त्यांच्या थेट अनुभवांमधून उच्च शिक्षणातील नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत.

विकासाबरोबर शहराच्या  गरजाही वाढत असतात. ‘सीओईपी’ने कायमच शहराच्या गरजांना प्रतिसाद देत वेळोवेळी शहराच्या विस्तारासाठी आपली जमीन दिली आहे. ‘सीओईपी’ला विस्तारासाठी जमिनीची कमतरता भासली, अशा वेळी प्रतापराव पवार ‘सीओईपी’च्या मदतीला धावून आले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ‘सीओईपी’साठी जमीन देण्याची विनंती केली. ही विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि ‘सीओईपी’ला पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधनासाठी पुण्यातील चिखली येथे २९ एकरांची अतिरिक्त जागा मिळाली. सध्याच्या मूल्यानुसार, या जागेची किंमत जवळपास तीनशे कोटी रुपये आहे.

‘सीओईपी’ला मिळालेले हे भव्य यश होते आणि ते केवळ पवार सरांच्या मदतीमुळेच शक्‍य झाले. कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांचे योगदान ‘सीओईपी’च्या कायमस्वरूपी लक्षात राहील. केवळ जागेच्या मंजुरीमुळे समाधानी नसलेल्या पवार सरांनी राज्य सरकारबरोबर चर्चा सुरुच ठेवली. ‘सीओईपी’ ही दीडशे वर्षे जुनी संस्था असल्याने तिला चिखली येथील नवीन जागेत संशोधनासाठी काम सुरु करण्यासाठी किमान दीडशे कोटी रुपये मिळायला हवेत, असे त्यांचे म्हणणे होते. राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी सरकारकडून ‘सीओईपी’साठी दीडशे कोटी रुपये मंजूर करवून घेण्यात यश मिळविले. हे पैसे पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘सीओईपी’साठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रतापराव पवार यांच्या नेतृत्वाखाली‘सीओईपी’, ‘द भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन’, ‘आंत्रप्रेन्युअरशिप अँड लीडरशिप’ ही संस्था स्टार्टअप संस्कृतीची नवी लाट निर्माण करत आहे.  नोकरी करणाऱ्यांपेक्षा ‘नोकरी देणारे व्हा’, असे त्यांचे म्हणणे आहे. दूरदृष्टी आणि नवे काही करण्याची ऊर्मी असलेल्या कार्यकारी मंडळामुळे स्वायत्तता मिळाल्यानंतरच्या काळात  ‘सीओईपी’ने देदीप्यमान प्रगती केली. हे साध्य करण्यासाठी कार्यकारी मंडळाने आपापसांत चर्चा करून एक निर्णय घेतला होता की, चार वार्षिक बैठकांव्यतिरिक्त प्रत्येक सदस्याने वर्षातील किमान शंभर तासांचे योगदान ‘सीओईपी’साठी द्यायचे.

मात्र, पवार सरांनी दरवर्षी शंभर तासांहून अधिक काळ व्यतीत करत इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ‘सीईओपी’ला या टप्प्यावर आणून ठेवले. त्यांनी ‘सीओईपी’मध्ये भरीव बदल घडवून आणले आहेत. प्रतापराव पवार हे ‘सीओईपी’चे अध्यक्ष आहेत, हे आमचे भाग्यच आहे. त्यांचा हा अध्यक्षपदाचा कार्यकाळ ‘सीईओपी’ची ख्याती आणि ध्येयवाद कायम ठेवण्यास सहाय्यकारी ठरेल, याची खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com