धक्कादायक : आता झाडांचा ‘श्वास’ गुदमरतोय

tree
tree

मानव तयार करत असलेला एकचतुर्थांश कार्बन डायऑक्‍साईड जगभरातील झाडे शोषून घेतात. नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या साह्याने या कार्बन डायऑक्‍साईडचा उपयोग झाडे आपल्या स्वतःच्या वाढीसाठी करतात. परंतु, मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डायऑक्‍साईड तयार होण्याचे प्रमाण वाढत राहिले तर या शतकाअखेरीस तो शोषून घेण्याची जगभरातील झाडांची क्षमताच कदाचित संपून जाईल. 

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधन सीझर टेरर यांच्या नेतृत्वाखालील संघाने कार्बन डायऑक्‍साईड आणि झाडे यांच्या संबंधांचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष नेचर क्‍लायमेट चेंज या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. झपाट्याने कमी होत असलेली जंगले, जीवाश्‍म इंधनाचा वारेमाप वापर आणि त्यावरील अवलंबित्व त्यामुळे कार्बन डायऑक्‍साईड वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी होत आहे. या शतकाअखेरीस म्हणजे सन २१०० नंतर झाडांची कार्बन डायऑक्‍साईड शोषून घेण्याची क्षमता किती टिकून असेल, याबाबत संशोधकांना शंका वाटते. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी जास्तीत जास्त झाडांची लागवड एवढा एकच उपाय पुरेसा नाही. तर जीवाश्‍म इंधनाचा वापर कमी करणेही तेवढेच आवश्‍यक आहे. तसेच असलेली जंगले टिकविणेही गरजेचे आहे, असे यातील प्रमुख संशोधक सीझर टेरर यांचे म्हणणे आहे. 

कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण जसजसे वाढत जाईल, तस तसे त्याचे शोषण करण्यासाठी झाडांची संख्या आणि क्षमताही वाढावी लागेल. त्यासाठी झाडांना अधिक पोषणमूल्याची गरज भासेल. झाडांना अधिकप्रमाणात नायट्रोजन आणि फॉस्फरस मिळण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या बुरशी आणि सूक्ष्मजंतू झाडांच्या मुळाशी सोडावे लागतील. वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण येत्या ५० ते ६० वर्षांत दुप्पट होण्याची शक्‍यता आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे टेरर यांचे मत आहे.

गवताळ प्रदेश, झुडपांचे प्रदेश, शेतजमिनी आणि जंगले यांचा तुलनात्मक अभ्यास विविध प्रयोग व उपग्रहांकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आला. वाढीव निर्माण होणारा कार्बन डायऑक्‍साईड शोषून घेण्याची क्षमता झाडांमध्ये विकसित करण्यासाठी जमिनीतील पोषणमूल्ये किती वाढवायला लागतील, तसेच वातावरणातील कोणत्या घटकांना नियंत्रित करावे लागेल, याचाही सविस्तर अभ्यास संशोधकांनी केला. योग्यपद्धतीने झाडांच्या पोषणमूल्यात वाढ झाल्यास या शतकाअखेर कार्बन डायऑक्‍साईड शोषण्याच्या झाडांच्या क्षमतेत १२ टक्‍क्‍यांनी वाढ होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. जो कार्बन डायऑक्‍साईड शोषला जात नाही, तो वातावरणात राहतो, त्यामुळे तापमान वाढ होते. ही तापमान रोखण्यासाठी मोठ्या अर्थव्यवस्थांवर नागरिकांनीच दबाव आणला पाहिजे. तरच सन २१०० नंतर परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

पृथ्वीचे फुफ्फुस जळतेय! 
ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या जंगलात मोठी आग लागलीय. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तेथील आगींचे प्रमाण ८४ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. युरोपीय युनियनच्या कोपर्निकस मॉनिटरिंग सर्व्हिसच्या अंदाजानुसार ब्राझीलमधील आगींमुळे २२८ टन कार्बन डायऑक्‍साईडचे उत्सर्जन झाले आहे. अर्थात हा अंदाज आहे. आग पूर्णपणे आटोक्‍यात आल्यानंतर नेमका अंदाज सांगता येऊ शकेल.

मानवी कृतींतून निर्माण होणारा कार्बन डायऑक्‍साईड दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलांत शोषला जातो. त्यामुळे जंगलांना नैसर्गिक ‘कार्बन सिंक’ही म्हटले जाते. पण या वर्षी प्रशांत परिसरातील अधिक उष्ण हवामानामुळे वनस्पतींची वाढ कमी होईल आणि त्या कमी प्रमाणात कार्बन डायऑक्‍साईड शोषतील, असे संशोधकांना वाटते. त्यामुळे २०१८च्या तुलनेत यावर्षी वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढेल, असे तज्ज्ञांना वाटते. जंगलतोड आणि खनिज तेलांच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्‍साईडच्या प्रमाणात ३० टक्के वाढ झाल्याचे या वर्षाच्या सुरवातीलाच आढळून आले होते. यावर्षी वातावरणात कार्बन डायऑक्‍साईडचं प्रमाण ४११पीपीएम (पार्टस पर मिलियन) इतके राहील, असे संशोधकांना वाटते. २०१३मध्ये कार्बन डायऑक्‍साईडच्या पातळीने पहिल्यांदा ४०० पीपीएमची पातळी ओलांडली होती. आगीत भस्मसात झालेले जंगल पुन्हा उभे राहण्यासाठी २० ते ४० वर्षांचा कालावधी लागतो. ॲमेझॉनच्या जंगलांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. मात्र तरीही ८० टक्के जंगल शाबूत आहे. अजूनही आग धूमसत आहे. जर ३० ते ४० टक्के जंगल नष्ट झालं तर हवामानाचे चक्र बदलू शकते, असे तज्ज्ञांना वाटते. ॲमेझॉनच्या जंगलांमधून पृथ्वीवरील एकून ऑक्‍सिजनपैकी १० ते २० टक्के ऑक्‍सिजन मिळतो, असा पर्यावरणतज्ज्ञांचा दावा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com