तपास एका पत्रलेखकाचा! (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

पिवळेधमक ऊन पडलेल्या सकाळी मी खिडकीतून बाहेर बघत असताना माझा मित्र आणि सुविख्यात गुप्तहेर शेरलॉक होम्स ह्याला केवळ डिवचण्यासाठी म्हणालो, ‘‘एक पुढारी वाटणारे, पण साहित्यिक दिसणारे एक गृहस्थ घाम पुसत आपल्या घराच्या दिशेनेच येताना दिसत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्याला लीलया हुकवत घाईघाईने येणाऱ्या ह्या गृहस्थांचं आपल्याकडे काय काम असेल बरं?’’ 

‘एलिमेंटरी डॉ. वॉटसन! ते दुसरे तिसरे कोणीही नसून महाराष्ट्रातील साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपादराव जोशी आहेत. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर नेहमी जाणं-येणं असल्यानं पादचाऱ्यांना हुकवणं हा त्यांच्या हातचा मळ आहे...आणि हो! ते पुढारी वाटणारे साहित्यिक नसून, साहित्यिक वाटणारे पुढारी आहेत!,’’ पाइपमध्ये तंबाकू भरत शेरलॉक म्हणाला. नंतर तीनच मिनिटांनी त्याचा मला आदर वाटला, कारण त्याचे म्हणणे शतप्रतिशत खरे निघाले.

‘मी...श्रीपाद जोशी...अतिशय गंभीर पेचप्रसंगातून वाचवा होम्ससाहेब!,’’ मी दिलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावून ते म्हणाले, ‘‘आमच्या यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी आम्ही प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल ह्यांना बोलावलं होतं. पण त्यांना कोणीतरी नंतर पत्र पाठवून ‘येऊ नका’ असं सांगितल्यानं भयंकर घोळ झालाय! ह्यामुळे महाराष्ट्राची नामुष्की झाली आहे...कोणी पाठवलं असेल पत्र?,’’ कपाळावरला घाम पुसत श्रीपादजी म्हणाले. माणूस सभ्य असावा! एखाद्या मराठी टीव्ही मालिकेतील हिरॉइनच्या बापाचा रोल करणाऱ्या चरित्र अभिनेत्याप्रमाणे दिसणाऱ्या श्रीयुत जोशी ह्यांनी अचानक हुंड्याची मागणी झाल्यावर करतात, तसा चेहरा टाकला होता.

‘नयनतारा सहगल ह्या थोर विदुषी व लेखिका असून त्यांचे माहेर मराठी, त्यातून कोकणात आहे..,’’ श्रीयुत जोशींनी माहितीत भर घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना शेरलॉक होम्सने थांबवले.

‘त्यांचं ‘रिच लाइक अस’ हे पुस्तक तुम्ही वाचलंय का मि. जोशी?’’ होम्सने विचारले.

‘आमच्या महाराष्ट्रात त्यांचं कुठलंच साहित्य कोणीच वाचलेलं नसावं, पण साहित्य संमेलनाला त्याची गरज नसते...’’ मि. जोशींनी खमकेपणाने खुलासा केला. त्यात तथ्य असावे, असे मला त्यांच्या देहबोलीवरून जाणवले.
‘‘व्हॉट इज साहित्य संमेलन?,’’ मी मध्येच तोंड घालून विचारले. 

‘इट्‌स लाइक ब्रेकफास्ट-लंच-डिनर पॅकेज..,’’ होम्सने शांतपणे उत्तर दिले. साहित्य संमेलन ह्या विषयावर त्याने पाऊण तास एक भाषण ठोकले.

होम्सचा मानवी स्वभावाचा अभ्यास अगदी दांडगा आहे. विशेषत: मराठी माणूस हा त्याचा फार आवडीचा विषय! मराठी माणूस हा जेवणासाठी काहीही करील, अगदी साहित्याची सेवासुद्धा करील, हे त्याने तपशीलवार सांगितले. 

‘हे ते पत्र...ते बनावट आहे का? कोणी लिहिले आहे? ते कृपया शोधून द्या..,’’ मि. जोशी कळवळून म्हणाले. ते पत्र हातात घेऊन होम्सने भिंगाने निरखले. ते निरखताना अनुक्रमे त्याने ‘ओह!’, ‘आयची जय’, ‘उफ्फ’, ‘हाहा!!’ असे विविध उद्‌गार काढले. पत्र माझ्या हातात देऊन जोराजोरात मान हलवली.

पत्राखाली रमाकांत कोलते अशी सही होती. पत्र नयनतारा सहगल ह्यांनाच लिहिलेले होते. पत्रावर तारीखही अचूक होती. यवतमाळ पोस्ट हपिसाचा शिक्‍का होता. अखेर सुविख्यात गुप्तहेर शेरलॉक होम्सने आपला निकाल दिला.

‘‘हे पत्र नयनतारा सहगल ह्यांनी नयनतारा सहगल ह्यांनाच लिहिलेले असावे. त्यांचे मूळ कोकणात असल्याने त्यांना ‘सध्या गावी येऊ नका,’ अशा आशयाच्या पत्रांची सवय असणार. ‘निमंत्रण कोलणारे पत्र’ म्हणून त्याखाली कोलतेसाहेबांची सही ठोकण्यात आली असून पत्राला सरकारी कचेरीचा वासही येतोय...बाकी मि. जोशी, तुमचे हस्ताक्षर बरे आहे!!’’

...शेरलॉक होम्स हा खरोखर अद्वितीय असा गुप्तहेर आहे. त्याच्यापासून काहीही लपून राहात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com