ढिंग टांग : मूल्यमापन!

ब्रिटिश नंदी
Thursday, 22 August 2019

परवाच दिल्ली येथे जाऊन वरिष्ठांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल अवगत केले, हे तुम्हा सर्वांना अवगत आहेच. सध्या आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू आहे. अन्य अनेक पक्षांतील नेतेमंडळी आपल्या पक्षात येण्यासाठी उत्सुक नव्हे, उतावीळ झाले असल्याचे चित्र आहे. ईडी, सीबीआय अशा स्वायत्त संस्थांची भीती घालून त्यांना आपण पक्षात ओढून घेत आहोत, असा आपल्यावर आरोप केला जातो.

सर्व पक्ष सहकारी-
परवाच दिल्ली येथे जाऊन वरिष्ठांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल अवगत केले, हे तुम्हा सर्वांना अवगत आहेच. सध्या आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू आहे. अन्य अनेक पक्षांतील नेतेमंडळी आपल्या पक्षात येण्यासाठी उत्सुक नव्हे, उतावीळ झाले असल्याचे चित्र आहे. ईडी, सीबीआय अशा स्वायत्त संस्थांची भीती घालून त्यांना आपण पक्षात ओढून घेत आहोत, असा आपल्यावर आरोप केला जातो. परंतु, सहकाऱ्यांनो, त्यात काहीही तथ्य नाही. वरील सर्व संस्था स्वायत्त असून आपापल्या मर्जीने कर्तव्य बजावत असतात. आपला पक्षच उत्तम दर्जाचा व लोकशाहीची चाड बाळगणारा असल्याने अन्य पक्षांतील लोक आपल्याकडे आपोआप ओढले जातात. 

ईडीच्या नोटिसा आल्या, की विरोधी पक्षांतील नेते ताबडतोब आपल्या पक्षकार्यालयासमोर रांगेत उभे राहतात, असा खोटा प्रचारविरोधी पक्षच करीत आहेत. काही नेते हे पाण्यासारखे असतात. पाणी म्हणजे जीवन! हे जीवन जगवण्यासाठी व त्याच्या बचावासाठी आपला पक्ष कटिबद्ध आहे. ‘पाणी उतार शोधते’ ही म्हण येथे गैरलागू आहे. पंप लावल्यास पाणी वर चढते, हे सत्य आहे!! आपण पक्ष नव्हे, तर पंप आहोत, हे ध्यानी असू द्यावे.
तथापि, इनकमिंगचा जोर वाढीस लागल्याने काही प्रमाणात आपण दक्षता बाळगणे गरजेचे आहे. इनकमिंगवाल्याचे राजकीय कूळ-शील विचारात घेऊन मगच त्यास पक्षात प्रवेश द्यावा, त्याचे योग्य मूल्यमापन केल्याशिवाय त्यास पक्षात घेऊ नये, अशी सक्‍त ताकीद दिल्लीतील वरिष्ठांनी दिली आहे. या संदर्भात खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. 
१. आपला पक्ष लोकाभिमुख, स्वच्छ आणि सच्छील चारित्र्याच्या कार्यकर्त्यांचा आहे. इनकमिंगवाले नेते त्याच टाइपचे असावेत. अन्यांना सावकाश प्रवेश द्यावा.
२. इच्छुक नेत्याच्या नावावर भ्रष्टाचाराच्या किमान पाच केसेस असणे अपेक्षित आहे. असा नेता संघर्षाला नेहमी तयार असतो, असे निदर्शनास आले आहे.
३. अपरंपार जमीनजुमला, दहा-वीस घरे, तीनेक शेतघरे, अडीच-तीन किलो सोने आणि काही कोटींचे समभाग अशी जंगम मालमत्ता असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे. निवडणुकांचा खर्च परस्पर भागतो, असे निदर्शनास आले आहे.
४. पक्षनिष्ठा हा एक पोलिओसारखाच जवळपास नामशेष झालेला विकार आहे. त्यामुळे हा गुण ग्राह्य धरण्यात येऊ नये. 
५. एखादा इच्छुक नेता फारच बदनाम, भ्रष्ट असला तर त्याच्याकडून ‘‘मोदीजींच्या अभूतपूर्व विकासयात्रेत सामील होण्यासाठी आलो’ असे तीन वेळा वदवून घ्यावे! यापूर्वी त्याने महान नेत्याबद्दल काहीही बोलले असले तरी ते ‘डिलिटेड म्याटर’ मानावे!!
६. इनकमिंगवाल्या नेत्यांमुळे आपल्या जुन्या व जाणत्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, ही भावना सपशेल चुकीची आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेत जो टिकेल, त्याला यश मिळेल! 
७. जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या भविष्याची फारशी चिंता करु नये. कारण ते आता अस्तित्वातच नाही.
८. काही मातब्बर पक्षाच्या प्रमुखांनी ‘आमच्या लोकांना तुमच्यात घ्या’ असे सांगत वशिल्याच्या चिठ्ठीसह नेते पाठवण्याचा सपाटा लावला आहे. तेव्हा सावध!! 
९. नव्याने पक्षात दाखल झालेल्या नेत्याला आपल्या पक्षाच्या विचारसरणीशी काहीही देणेघेणे नसते. त्याने फक्‍त निवडणूक जिंकणे अपेक्षित आहे. 
१०. इनकमिंगची वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे. असेच चालू राहिल्यास निवडणुकीच्या तोंडावर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. आपल्याकडे ॲडमिशन फुल झाल्यास मित्रपक्षाच्या गोटात म्यानेजमेंट कोट्यातून इच्छुकांना जागा मिळवून द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang