ढिंग टांग - ...बोलून दाखवले!

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

जीवश्‍च कंठश्‍च प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. राहवेना, म्हणून पत्र लिहीत आहे. कारण विचारा? कारण, माझी किनई ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ अशी अवस्था झाली आहे. समोर असता, तर प्रेमाने किमान एक तरी गालगुच्चा घेतला असता. 

जीवश्‍च कंठश्‍च प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. राहवेना, म्हणून पत्र लिहीत आहे. कारण विचारा? कारण, माझी किनई ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ अशी अवस्था झाली आहे. समोर असता, तर प्रेमाने किमान एक तरी गालगुच्चा घेतला असता. 

परवा मेट्रो शुभारंभाच्या कार्यक्रमात थेट मा. नमोजींच्या समोरच तुम्ही ‘युतीचंच सरकार येणार’ असे जाहीर केल्याने आमचे हे असे झाले आहे! ‘युती होणार’ हे मी हजार वेळा लोकांना सांगत होतो. कुणी विश्‍वास ठेवील तर शपथ! पण तुम्ही एका वाक्‍यात सगळ्यावर कडी केलीत!! महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी देणारे तुमचे उद्‌गार होते. तुमच्या भाषणाला सर्वाधिक टाळ्या मीच (सर्वात जोरात) वाजवल्या, हे तुम्ही पाहिलेत ना? 

‘युती झालीच आहे, सरकारसुद्धा युतीचेच येणार’’ असे तुम्ही (चक्‍क) जाहीर भाषणात म्हणालात (आणि माझ्याकडे पाहिलेत!) हे सारे घडले तेदेखील आमच्या पूजनीय श्री नमोजी यांच्यासमोर!! माझ्यासारख्या (भक्‍ताला) आणखी काय हवे? आपली मैत्री आभाराच्या पलीकडली आहे, याची मला जाणीव आहे. पण तरीही कृतज्ञता नेहमी व्यक्‍त करावी, असे मला वाटते. 
तुम्ही हे सुमधुर वाक्‍य उच्चारलेत, तेव्हा अंगावर रोमांच आले!! टुणकन उडी मारणार होतो, पण बरे दिसले नसते, म्हणून आवरले!! गेली पाच वर्षे आपल्यात सुरू असलेला बेबनाव खोटाखोटाच होता, हे लोकांना अखेर कळून चुकले. तुम्ही हे वाक्‍य उच्चारलेत, तेव्हा आमच्या मा. चंदुदादा कोल्हापूरकरांनी मला जोरात चिमटा काढला. म्हणाले, ‘‘आहेब्बुवा, मज्जाय एका माणसाची!!’’ पण मी हूं की चूं केले नाही. 

तुम्ही आणि मी (म्हणजेच तुमचा पक्ष आणि आमचा पक्ष) हे आता महाराष्ट्रातले एक राजकीय अद्वैत ठरले आहे. पूर्वी काँग्रेसच्या दोघा मोठ्या पुढाऱ्यांना ‘दो हंसो का जोडा’ असे म्हणत असत. आपला जोडा मोरांचा आहे. (खुलासा : जोडा म्हंजे जोडी या अर्थाने! मराठी अर्थाने नव्हे!!) महाराष्ट्राच्या राजकीय रानातले आपण दोन मोर आहोत. निवडणुकीचे ढग आभाळात अवतरले की आपला पिसारा फुलतो. छे, मी वाहावत चाललो आहे का? जाऊ दे. आता जागावाटप निव्वळ उपचार आहे. तो लौकरच जाहीर करून टाकू. आहे काय नि नाही काय! कळावे. 
नेहमीच आपला. नानासाहेब फ. 
* * *
नाना-
जय महाराष्ट्र! परवा तुमच्या नमोजींनी माझा उल्लेख ‘माझा धाकटा भाव’ असा केला. तेव्हा मी उगीच हळवा झालो आणि नको ते बोलून बसलो. ‘युती आहेच, सरकार युतीचेच राहणार’ असे मी बोलून बसलो खरा, पण ते फार मनावर घेऊ नये. ‘सत्ता हवीच आहे, पण ती महाराष्ट्राच्या विकासासाठी’ असेही मी (सावधपणे) पुढे बोलून ठेवलेले आहे, हे विसरू नका. मा. नमोजी यांनी मला सगळ्यांसमोर ‘लहान भाऊ’ म्हटले. तेव्हा हा जिव्हाळा आहे की चॉकलेट? हे कळे कळेपर्यंत वेळ निघून गेली. साहजिकच मला काहीतरी असेच बोलणे भाग होते. शेवटी युतीचे बोलून गेलो. तुम्हीही विनाकारण मोठमोठ्यांदा टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेतलेत! ‘ही हेडलाइन आहे’, असे मीडियावाल्यांना सुचवण्याचा तुमचा उद्योग माझ्या नजरेतून सुटलेला नाही. मी काहीही बोललो असलो तरी जागावाटपाच्या चर्चा, वादविवाद, भांडणे, मारामाऱ्या हे काही चुकणार नाही, हे बरे समजून असा. महाराष्ट्राच्या विकासासाठी युती हवी आहे, तुमच्या विकासासाठी नव्हे!! कळावे. 
आपला. उधोजी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang