ढिंग टांग : ‘आरे’ ला ‘कारे’!

Dhing-Tang
Dhing-Tang

स्थळ - मातोश्री रिसॉर्ट, वांद्रेवन. (बफर झोन)
वेळ - रात्रीची. प्रसंग : रातकिड्यांची किरकिर.
पात्रे - नेहमीचीच!

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (पांघरुणात घुसमटल्यागत) नोप! 
विक्रमादित्य : (बॅटरीचा झोत टाकत) झोपलात इतक्‍यात?
उधोजीसाहेब : (पांघरूण डोक्‍यावरून काढत) सभ्य प्राणीमात्र यावेळेला झोपतात!
विक्रमादित्य : (निर्धाराने) झोपता काय...सामील व्हा! चला!!
उधोजीसाहेब : (हादरून) कुठे? अशा अपरात्री?
विक्रमादित्य : (दुप्पट निर्धाराने) मोहिमेवर निघायचंय!
उधोजीसाहेब : (पडेल आवाजात) कसली मोहीम?
विक्रमादित्य : (चेवात) निसर्गाच्या बचावाची! निसर्ग खतरे में है!! याल तर तुम्हा सवें, न याल तर तुम्हाविना, आणि आडवे याल तर तुम्हांस उल्लंघून-
उधोजीसाहेब : (गडबडीने उठून बसत) अरे अरे अरे!!
विक्रमादित्य : (जमेल तितक्‍या उग्र आवाजात) आता आरे आरे आरे नाही...कारे कारे कारे!!  आरेवनाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आम्ही कंबर कसली आहे!! तुम्ही आरे म्हणालात, तर आम्ही कारे म्हणू! तुम्ही कारे म्हणालात तर आम्ही जारे म्हणू!
उधोजीसाहेब : वारे!...म्हंजे वारे व्वा...याअर्थी!
विक्रमादित्य : (सात्विक संतापाने) आपल्या सुंदर आरेवनातली सत्तावीसशे झाडे फांद्या पसरून आक्रोश करत आहेत! आरेवनातील सुंदर सुंदर फुले थरकाप उडून म्हणताहेत, ‘‘काका, मला वाचवा. काका, मला वाचवा!’’
उधोजीसाहेब : (भाबडेपणाने) हे कोण काका?
विक्रमादित्य : (अभिमानाने) मीच! त्या छोट्या छोट्या फुलांचा मी काकाच ना? आरेवनातली प्राणिसंपदा आणि माझं रक्‍ताचं नातं आहे असं मला वाटतं! 
उधोजीसाहेब : (समजूत घालत) हे पहा, तुझ्या त्या आरेवनात छान छान झाडं आहेत हे मान्य! पण विकाससुद्धा व्हायला हवा की नाही? 
विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) तुम्हाला ल्युना माहिताय, ल्युना?
उधोजीसाहेब : (मान हलवत) लहानपणी एकदा चालवली होती! प्याडल मारताना दम निघाला होता! 
विक्रमादित्य : (वैतागून) ती ल्युना मोपेड नाही हो बॅब्स! ही ल्युना आरेकर आहे! ‘निसर्ग सोसायटी, आरेवन कॉलनी, ऑफ गोरेगाव लिंक रोड’ हा तिचा ॲड्रेस! 
उधोजीसाहेब : (कपाळावर आठी घालत) ही कोण बया?
विक्रमादित्य : (शांतपणे) तिनं आजवर आठ बच्चांना जन्म दिला आहे! पक्‍की मुंबईकर आहे! अधूनमधून गोरेगाव लिंक रोड ओलांडते! आसपासच्या सोसायट्यांमध्ये हिंडते! पण कधी त्रास नाही दिलान! त्या ल्युनानं मला साकडं घातलंय, ‘येवढं, माझं आरेचं घर वाचव रे बाबा!!’
उधोजीसाहेब : (विचारात पडत) लिंकरोड ओलांडते? दूध, ब्रेडबिड आणायला जात असेल...नै?
विक्रमादित्य : (दुप्पट वैतागून) ती बिबट्याची मादी आहे, बॅब्स! दूध आणि ब्रेड कशाला खाईल?
उधोजीसाहेब : (च्याटंच्याट पडत) तिनं तुला साकडं घातलंन?
विक्रमादित्य : (गंभीरपणाने) आरेवनातली सत्तावीसशे झाडं मेट्रोच्या कारशेडसाठी तोडण्याचा कुटिल डाव रचणाऱ्या सरकारला ताळ्यावर आणण्याचा विडा उचललाय मी! आमच्या ल्युनाचं घर असं उजाड करण्याचा सरकारला काहीएक अधिकार नाही! कोण आमच्या ल्युनाला बेघर करतो, मी पाहतोच! आत्ताच्या आत्ता आम्ही आरेवनावर चढाई करून ते काबीज करणार आहोत! येता आरे, जाता कारे!! तुम्हीही सामील व्हा!!
उधोजीसाहेब : (गळ घालत) जरा सबुरीनं घे नारे!! चार-आठ दिवसांनी करा नारे तुमची मोहीम! एवढं जागावाटपाचं मार्गी लागलं की मग जाऊ! चालेल नारे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com