ढिंग टांग : ‘एकज एक’ भाषा!

Dhing-Tang
Dhing-Tang

एका गहन प्रश्‍नाला हात घालण्यापूर्वी (आमची) थोडीशी पार्श्‍वभूमी दाखवणे (पक्षी : सांगणे) गरजेचे आहे. येथे आम्ही भाषिक प्रश्‍नाला हात घालतो आहो. जो अत्यंत ज्वलंत (पक्षी : जाळपोळप्रोत्साहक) आहे. ॲक्‍चुअली, आम्हाला इतक्‍या भाषा येतात, की आमची मातृभाषा नेमकी कुठली हेच आम्हाला समजेनासे झाले आहे. आम्ही जन्माला आलो तेव्हा जन्मदात्रीने आमचे रूप बघून ‘अय्यो!’ म्हटले आणि जन्मदात्याने ‘हे राम’! कपाळाला हात दोघांनीही लावल्याचे (नंतर) समजले. त्यामुळे आमची मातृभाषा मात्र नीटशी समजली नाही. आम्ही चिक्‍कार भाषा शिकलो. माणूस ज्या भाषेत यथेच्छ गाळीप्रदान करू शकतो, ती त्याची भाषा अशी फार साधी व सोपी व सरळ अशी आमची व्याख्या आहे. (कोण आक्षेप घेतो ते आम्ही बघतोच ***!!!) लहान मूल मातृभाषेतच उत्तम शिक्षण घेऊ शकते, अशा शोध लागल्याने आमची भयंकर पंचाईत झाली. परिणामस्वरूप, निकराच्या शैक्षणिक लढाईत शिक्षकवर्गाने सपशेल हार पत्करल्यामुळे आम्हालाही विद्यार्जनाचा आग्रह पाचव्या यत्तेतच सोडून द्यावा लागला. इतुके सारे केवळ मातृभाषेच्या अभावी घडले.

तथापि, भारतीय भाषांचे वैविध्य याविषयी आमचा प्रगाढ अभ्यास असून, त्याबद्दल येथे काहीएक मत मांडणे आम्ही आमचे कर्तव्य समजू. आपला महान देश किनई (फारा दिसांनी हा शब्द वापरात आला किनई?) विविध संस्कृती, जातीधर्म आणि भाषांनी विनटलेला आहे. (हादेखील शब्द फा. दि. वा. आ. कि.?) एक माणूस दुसऱ्या माणसास तिसऱ्याच भाषेत काय बोलेल, हे चौथ्याला समजणार नाही, अशी आपल्या देशाची सद्यःस्थिती (हा शब्ददेखील फा. दि. वा. आ. कि.?) आहे. 

आपल्या भारत देशात एकंदरित सातशे ऐंशी भाषा बोलल्या जातात. परंतु ऐकल्या फार कमी जातात! कोठल्याही भाषेत बोल्लात, तरी हल्ली कोण कोणाचे ऐकतो? भारतासारख्या विभिन्न संस्कृती एवं भाषांच्या देशात एकच एक भाषा असावी, असा सुविचार गुजराथीमिश्रित हिंदी भाषेत पुढे आला आहे. तो आमचे परमकारुणिक गुरुवर्य मा. मोटाभाई यांच्याकडूनच आल्याने आम्हास शतप्रतिशत मान्य आहे. कोणीही कोणाचे ऐक्‍कत नसताना किमान एका भाषेतच न ऐकण्याची प्रक्रिया सोपी जाईल, असा पोक्‍त विचार यामागे असणार, हे उघड आहे. ‘आपडे एकज एक भाषा जोईये’ असा विचार मा. मोटाभाई यांनी व्यक्‍त केल्यामुळे अनेकांनी अनेक भाषांमध्ये चिक्‍कार गालिप्रदान एकसमयावच्छेदे करोन सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचा आम्ही, ज्याला आपण अस्सल कोल्हापुरी मराठी म्हणतो, त्या भाषेत धिक्‍कार करतो. (खुलासा : तबियतदारांनी कोल्हापुरी मराठीतील निवडक शब्दसाज येथे पारखून घ्यावेत! असो.) 

ज्याला आपण नया भारत म्हणून ओळखतो, त्या भारताची राष्ट्रभाषा गुजराथी असावी, असा एक मतप्रवाह छे! आम्हाला तोदेखील मान्य आहे, कारण गुजराथी भाषा आम्हाला आवडते. (खुलासा : गुजराथीत आवडणे म्हणजे ‘येणे’! पहा शब्दप्रयोग : मने गुजराथी लेंग्वेज आवडे छे!) चूंकी हिंदी कोणालाही येत असल्याने तीच ‘एकज एक’ भाषा असावी, असाही एक मतप्रवाह है!! चूंकी आम्हाला चूंकी हा शब्द वापरायची चूष असल्याने हे मतही आम्ही ग्राह्य मानू.

पापुआ न्यु गिनी नामक देशात सर्वाधिक साडेआठशे भाषा बोलल्या जातात, असे आम्ही ऐकले आहे. मा. मोटाभाई यांना कळवले पाहिजे. तेथे त्यांची गरज आहे, असे आमचे (नम्र) मत आहे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com