ढिंग टांग : आरे : एक अरण्यरुदन!

ब्रिटिश नंदी
Wednesday, 18 September 2019

स्थळ : मुंबईलगतचे निबीड आरेवन.
वेळ : अरण्यात घड्याळ चालत नाही!
प्रसंग : मचाणावरचा.पात्रे : निसर्गतज्ज्ञ व विख्यात निसर्ग छायाचित्रकार मि. यूडी थॅकरे व त्यांचे पुत्रवत शिष्य किंवा शिष्यवत पुत्र मास्टर ॲडी!

स्थळ : मुंबईलगतचे निबीड आरेवन.
वेळ : अरण्यात घड्याळ चालत नाही!
प्रसंग : मचाणावरचा.पात्रे : निसर्गतज्ज्ञ व विख्यात निसर्ग छायाचित्रकार मि. यूडी थॅकरे व त्यांचे पुत्रवत शिष्य किंवा शिष्यवत पुत्र मास्टर ॲडी!

यूडी : (डोळ्याला दुर्बीण लावून कुजबुजत) आह..! ओह!! एहे!! अयाया..!!
ॲडी : (उत्सुकतेनं कुजबुजत) कुछ दिखा क्‍या? 
यूडी : (वैतागून) हिंदीत का बोलतोयस?
ॲडी : बिबट्या दिसतोय का दुर्बिणीतून? मला बघू दे ना!
यूडी : (आवंढा गिळत) नाही...पायाला शिंची गांधीलमाशी चावतेय!
ॲडी : (हिरमोड होत) हात्तिच्या... काही हालचाल दिसली तर लग्गेच सांगा हं! इथल्या बिबट्याचं घर वाचवण्याची मी प्रतिज्ञा केली आहे! कुठल्याही परिस्थितीत मी बिबट्यांना बेघर होऊ देणार नाही!! 
यूडी : (संयम ठेवत) आपल्याला असं मचाणावर किती काळ बसावं लागणार आहे? पायाला रग लागली आहे!!
ॲडी : (समजूत घालत) संयम सोडू नका! कंट्रोल, कंट्रोल! आपण इथं बिबट्या बघायला आलेलो नाही! 
यूडी : (च्याट पडत) मग काय बघायचं इथं? अरे, मी जगविख्यात निसर्ग छायाचित्रकार आहे, हे विसरलास का?
ॲडी : (च्युईंगम चघळत) शिकारी! शिकारी बघायला आलोय! आरेवनात दानवांचा हल्ला होणार आहे, अशी खबर आहे! तुमची बंदूक तयार आहे ना?
यूडी : (निसर्गप्रेमाने) हल्ली आरेवनातही चोरटी शिकार वाढली आहे तर !! आणि मी बंदूक वापरत नाही! एकतर क्‍यामेरा वापरतो, नाहीतर धनुष्यबाण!! 
ॲडी : (तावातावाने) या नतद्रष्ट सरकारनं मेट्रोच्या कारशेडसाठी आमच्या आरेवनातली सत्तावीसशे झाडं तोडण्याचा कट रचलाय! त्यांच्यावर सोडा ना तुमचे बाण!! कारशेडसाठी यांना हीच जंगलातली जागा सापडली का? तुमचा मित्रपक्ष असला म्हणून काय झालं? हे आमच्या मुंबईकर बिबट्यांचं माहेरघर आहे!!
यूडी : (नेमस्तपणाने) अरे, बिबट्यांसाठीच मेट्रो सुरू करणार असतील इथून!
ॲडी : (हतबुद्ध होत) बिबटे ट्रेनला लटकून प्रवास करतात का? मुंबईकर बिबटे असले म्हणून काय झालं?
यूडी : (सबुरीनं घेत) डोण्ट वरी! इथं मेट्रो प्रकल्प होणार नाही! आरेवनाचाही ‘नाणार’ होईल, ही माझी भविष्यवाणी ऐकली नाहीस का? पण थोडं सबुरीनं घ्यावं आपण!!
ॲडी : (सबुरीचं आवाहन फेटाळत) नो म्हंजे नोप! सरकारी लाकूडतोडे आले की आपण लागलीच हल्लाबोल करायचा!! आणि इथल्या सत्तावीसशे झाडांना चिकटून बसायचं!
यूडी : (सावधपणाने) त्यापेक्षा असं मचाण बांधून बसलं तर नाही का चालणार?
ॲडी : (ठामपणाने) नाही... मचाण बांधलेल्या झाडावर त्यांनी कुऱ्हाड चालवली तर? आपण पडू ना खाली!!
यूडी : तेही खरंच! हे कमळवाले लोक हल्ली वाघालाही घाबरेनासे झाले आहेत! काहीतरी करायला हवं!!
ॲडी :बॅब्स... आपल्या आरेवनात हत्ती का नाहीत?
यूडी : (दातओठ खात)... आणून सोडले पाहिजेत!!
ॲडी : (उत्साहाने) आपण पेंग्विन आणले तसे?
यूडी : (विचारमग्न अवस्थेत) काहीसं तसंच! एकदा आरेवनात हत्तींचा संचार झाला की कारशेड काय, काहीच बांधता येणार नाही या लोकांना! 
ॲडी : (अभिमानाने) बांधायचंच असेल तर इथं मचाण बांधा म्हणावं... आमच्यासारखं!
यूडी : (उजळलेल्या चेहऱ्यानं) चल, आता घरी जाऊया!
ॲडी : (आश्‍चर्यानं) आपलं आंदोलन अर्धवट सोडून? ते शक्‍य नाही!!
यूडी : (चिंतातुर आवाजात) आरेवनात कारशेडऐवजी राम मंदिर बांधू म्हणाले हे कमळवाले... तर काय करायचं? बोल!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang