ढिंग टांग : म्यारेथॉन मुलाखत!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 8 October 2019

मंद दिव्याच्या अर्धवट अंधार कम उजेडात प्रत्यक्ष साहेब बसलेले. चेहऱ्यावर गंभीर भाव. अवघ्या महाराष्ट्राचे भविष्य जणू समोर बसलेले. त्यांच्या पुढ्यातील स्टुलावर आम्ही! आमच्या चेहऱ्यावर अष्टमीचा दिवसभराचा उपास ‘लागल्या’ची कळा. परंतु, फैनाबाज कुर्ता आणि पायजम्यातील ती मूर्ती पाहून प्रथम आम्ही (रिकाम्यापोटी. पण-) अदबीने वंदन केले. मग एक झणझणीत मुजरा केला. कानावर हात ठेवून नामघोष करणार, इतक्‍यात त्यांनी एक हात उंचावून अभय दिले. मुलाखतीला प्रारंभ झाला...

मंद दिव्याच्या अर्धवट अंधार कम उजेडात प्रत्यक्ष साहेब बसलेले. चेहऱ्यावर गंभीर भाव. अवघ्या महाराष्ट्राचे भविष्य जणू समोर बसलेले. त्यांच्या पुढ्यातील स्टुलावर आम्ही! आमच्या चेहऱ्यावर अष्टमीचा दिवसभराचा उपास ‘लागल्या’ची कळा. परंतु, फैनाबाज कुर्ता आणि पायजम्यातील ती मूर्ती पाहून प्रथम आम्ही (रिकाम्यापोटी. पण-) अदबीने वंदन केले. मग एक झणझणीत मुजरा केला. कानावर हात ठेवून नामघोष करणार, इतक्‍यात त्यांनी एक हात उंचावून अभय दिले. मुलाखतीला प्रारंभ झाला...
आम्ही : (उत्साहात) करू या सुरवात?
साहेब : मग इथं काय बटाटेवडे खायला आलात?
आम्ही : वडे आहेत?
साहेब : प्रश्‍न विचारा!
आम्ही : (आमचा पहिलाच लोडेड प्रश्‍न) क्‍या चल रहा है?
साहेब : मागल्या म्यारेथॉन मुलाखतीत आम्ही या प्रश्‍नाचं उत्तर ‘फॉग चल रहा है’ असं दिलं होतं!
आम्ही : मग?
साहेब : तेच रिपीट करा!!
आम्ही : आपला पक्ष वाजत गाजत निवडणुकीच्या रिंगणात उतरला, पण गर्जना झाली नाही. असं का?
साहेब : घसा बसला होता!!
आम्ही : आँ?
साहेब : काहीही काय विचारताय? गेल्या वेळेला युती नव्हती, म्हणून गर्जना कराव्या लागल्या! या वेळेला युती आहे, गर्जना कशी करणार?
आम्ही : नीट विस्कटून सांगा!!
साहेब : विस्कटून? बरं. ऐका...तुमचं लग्न झालंय?
आम्ही : इट्‌स काँम्प्लिकेटेड!
साहेब : बरं. उदाहरणार्थ, लग्न होण्याआधी सडाफटिंग असलेला माणूस राजा आदमी असतो. वाट्टेल तिथे जाऊ शकतो किंवा वाट्टेल तसं बडबडू शकतो. त्याच माणसाचं लग्न झालं की तो घरात गप्प गप्प असतो आणि पानात पडेल ते निमूट गिळतो. हे सत्य माहीत आहे का तुम्हाला?
आम्ही : (शिताफीने अन्य प्रश्‍नाकडे वळत) यंदा तुम्ही जागांसाठी जाम तडजोड केलीत. असं का?
साहेब : ते माझ्या घरी आले. ‘आपली तुपली मैत्री’ असं म्हणाले. मी ‘हो’ म्हणालो. एकदा मी ‘हो’ म्हणालो की मग मी जाम कुणाचंही ऐकत नसतो.
आम्ही : म्हंजे... एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मैं खुद की भी नहीं सुनता... त्या टाइप?
साहेब : ॲक्‍चुअली, तडजोड मी नाही केली, त्यांनी केली! 
आम्ही : मग तुम्ही काय केलंत?
साहेब : मी समजूतदारपणाने वागलो... माझा पक्ष हा समंजस पक्ष आहे. (चपापून इकडे तिकडे बघतात.)
आम्ही : ठामठिकभ्रुम फ्रॉक... खिक खिक... फुर्रर्र...
साहेब : काय झालं?
आम्ही : ठसका लागला... सॉरी!!
साहेब : पुढे विचारा!
आम्ही : या वेळी तुम्ही फार कमी जागा लढवताय!
साहेब : हा प्रश्‍न आहे की प्रतिक्रिया?
आम्ही : बरं. या वेळी तुम्ही कमी जागा का लढवताय?
साहेब : असंच. तुम्हाला सांगितलं ना, ते माझ्या घरी आले, ‘आम्हाला समजून घ्या,’ असं ते म्हणाले. मी समजून घेतलं. यात कमी-जास्त जागा लढवण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? पुढे.
आम्ही : महाराष्ट्राला तुम्ही यंदा आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री देणार का?
साहेब : तसं मी वचन दिलंय. 
आम्ही : कोणाला?
साहेब : ते तुम्हाला काय करायचंय?
आम्ही : याचा अर्थ पुढचा मुख्यमंत्री आपला असणार?
साहेब : मी तारीख कुठे जाहीर केलीये?
आम्ही : नाही, कारण यंदा पहिल्यांदाच तुमच्या घराण्यातला कुणीतरी निवडणूक लढवतोय!!
साहेब : मग?
आम्ही : कसं वाटतंय?
साहेब : गार गार वाटतंय! निघा आता!! जय महाराष्ट्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang