ढिंग टांग : कालाय तस्मै नम:!

ब्रिटिश नंदी
Saturday, 12 October 2019

दादू : सदूऽऽऽ..!
सदू : बोल दादूऽऽ...!
दादू : सध्या पावसापाण्यात हिंडतोहेस...छत्री घे हो!
सदू : तू रेनकोट घे!
दादू : मी छत्री आणि रेनकोट दोन्ही सोबत ठेवतो! ऊन पडलं की छत्री, पाऊस पडला की रेनकोट!
सदू : बामची बाटली पण जवळ ठेवत जा! पडसं झालं तर उपयोगी येईल!
दादू : तू रुमाल ठेवतोस ना?
सदू : रुमालाशिवाय मी या खोलीतून त्या खोलीतसुद्धा जात नाही! परवा पुण्याला तर सात रुमाल लागले मला!

दादू : सदूऽऽऽ..!
सदू : बोल दादूऽऽ...!
दादू : सध्या पावसापाण्यात हिंडतोहेस...छत्री घे हो!
सदू : तू रेनकोट घे!
दादू : मी छत्री आणि रेनकोट दोन्ही सोबत ठेवतो! ऊन पडलं की छत्री, पाऊस पडला की रेनकोट!
सदू : बामची बाटली पण जवळ ठेवत जा! पडसं झालं तर उपयोगी येईल!
दादू : तू रुमाल ठेवतोस ना?
सदू : रुमालाशिवाय मी या खोलीतून त्या खोलीतसुद्धा जात नाही! परवा पुण्याला तर सात रुमाल लागले मला!
दादू : अरे हो...तुझे दौरे सुरू झालेत ना?
सदू : झाले! परवा पार गोरेगावापर्यंत जाऊन आलो! बरं वाटलं!!
दादू : शाबास! सध्या आपली दोघांचीही एकच पंचाईत आहे!
सदू : कुठली रे?
दादू : मतदारांना आवाहन तरी काय करायचं? ‘सत्ता आम्हाला द्या,’ असं सांगायला गेलो तर लोक म्हणतात, ‘ती तुमच्याकडेच आहे! तीच काय पुन्हा मागता?’ त्यामुळे फॉर ए चेंज, मी आपला आमच्याच लोकांच्या माफ्या मागतोय!
सदू : काहीतरीच! आपल्या लोकांची माफी कसली मागायची?
दादू : ज्यांची तिकिटं कापली त्यांची मागावीच लागते, सदूराया! ‘मी आमच्या मावळ्यांपुढे डोकंच काय, गुडघेसुद्धा टेकीन’ असं म्हटलं मी परवा भाषणात!
सदू : गुडघे टेकवल्याशिवाय डोकं कसं टेकवता येईल? फिजिकली इंपॉसिबल आहे दादूराया!
दादू : अरेच्चा! हे लक्षातच नाही आलं माझ्या! जेव्हा जेव्हा मी डोकं टेकवतो तेव्हा तेव्हा गुडघेही टेकतातच! उलटं म्हणायला हवं होतं...हो ना?
सदू : जाऊ दे! माझी कथा वेगळीच आहे! मी हल्ली सत्ता मागायला गेलो तर लोक हसतात! मग मी वेगळीच आयडिया केली!
दादू : कुठली रे?
सदू : मी डायरेक्‍ट विरोधी पक्षाचंच तिकीट मागायला गेलो! म्हटलं, ‘आम्हाला आता सत्ता नकोच...निदान आम्हाला विरोधात निवडून द्या!’ 
दादू : सुंदर आयडिया आहे! मीसुद्धा तसंच करणार होतो, पण ऐनवेळी निर्णय बदलला!
सदू : बरं झालं, तू निर्णय बदललास ते! नाहीतर मी काय आवाहन करणार होतो?
दादू : भाऊ भावाला नकळतसुद्धा मदतीला धावून येतो तो असा!! हो की नाही?
सदू : खरंच! थॅंक्‍यू!!
दादू : यंदा तुझं ते ‘लाव रे तो व्हिडिओ’ नाही का रे?
सदू : अजून काही ठरवलं नाही...पण बहुतेक नाहीच!! लाइट अँड साऊंड शो करायचा म्हणजे खूप खर्च होतो! त्यात पाऊस!!
दादू : च्यानलवाल्यांचा ‘टीआरपी’ घसरणार की रे!
सदू : मी तरी काय करू?
दादू : तेही खरंच!
सदू : ‘तुमच्या मनातली खदखद, मळमळ, सळसळ उघडपणे मांडणारा विरोधी नेता म्हणून मला काम करायचं आहे,’ असं मी आता लोकांना सांगतोय!
दादू : ‘एकहाती सत्ता द्या,’ असं गेल्या निवडणुकीपर्यंत सांगत होतास! बघ, आता काय दिवस आले!!
सदू : कालाय तस्मै नम:...दुसरं काय?
दादू : मीसुद्धा ‘पंचवीस वर्ष युतीत सडलो’, असं सांगत होतो! आता आणाभाका घेतो! काळाचा महिमा रे...खरंच!
सदू : हे सगळं कशामुळे झालं माहिताय? आपण एकमेकांना वेळीच टाळी दिली नाही ना? म्हणून! कळलं?
दादू : आता तरी दे की टाळी!
सदू : नको! राहू दे!! आत्ता टाळी दिली तर विरोधी नेत्याचं कामसुद्धा हातातून जाईल!
दादू : बरं! बेस्ट ऑफ लक हं!
सदू : तुलाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang