ढिंग टांग : दिल्लीतले धुके..!

Fog
Fog

पार्लमेंटाच्या गेटजवळ आम्ही (उगीचच) टहलत होतो. येणाऱ्या- जाणाऱ्या खासदारांना गाठून काहीबाही विचारावे, हा आमचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. तिथे आम्हाला एक चुरगळलेल्या कागदाचा बोळा मिळाला. त्यावर कुणीतरी अत्यंत सुवाच्च अक्षरात काहीबाही लिहून काढले होते. मजकूर वाचनीय, चिंतनीय आणि मननीय होता. त्यात सच्चाई होती आणि लिखाण रोखठोक होते. सुरुवातीला आम्हाला वाटले, की हा कोण्या नामचीन संपादकाने लिहिलेला अग्रलेखच असावा! पण नाही, तो अग्रलेख नव्हता. ते एक डायरीचे पान होते किंवा ते डायरीचे पान नसेलही, साधा फुलस्केप असेल! काही संपादक पलंगावर बसून समोरील डेस्कावर फुलस्केपांची चळत ठेवून अग्रलेख लिहून काढतात, हे आम्ही पाहिले आहे. पण ते असो. वाचकांच्या माहितीसाठी तो मजकूर आम्ही येथे उघड करीत आहो. लेखकाने आपले नाव गुलदस्तात ठेवलेले असले, तरी त्यातील सच्चाई लपून राहात नाही, हे सुज्ञ वाचकांना कळेलच.

दि. ११ डिसेंबर २०२०
महत्त्वाची टिप - १. उद्या बारामतीच्या साहेबांचा वाढदिवस आहे. पुष्पगुच्छ आजच बुक करून ठेवणे.
२. उद्या ट्विटरवर टाकावयाची शेरोशायरी आजच निवडून ठेवणे.
जय महाराष्ट्र. सकाळी उठलो. (रोजच उठतो.) दिल्लीत आज थोडे ज्यास्त धुके आहे, असे वाटले. तयार होऊन पार्लमेंटात आलो. पार्लमेंटात जाणे तितके सोपे उरलेले नाही. बोंडुकवाले टीव्ही च्यानलवाले तेथे टपून बसलेले असतात. वेषांतर करून जावे, असे मनात आले. पार्लमेंटाच्या दाराशी आमचे खासदार मा. अनिलजी देसाई बहुधा माझीच वाट पाहात उभे होते. ते कुठेही उभे असले तरी कुणाची तरी वाट बघत आहेत, असाच त्यांचा चेहरा असतो. त्यांना विचारले, ‘‘आज धुके फार आहे का हो? मला थोडे धूसर दिसते आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘धुके आहेच कुठे? स्वच्छ तर दिसते आहे!’’ मी विषय बदलला.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर पाठिंबा द्यावा की न द्यावा, या चिंतेने मा. देसाई यांना ग्रासले होते. ‘काय करावे?’ त्यांनी विचारले. मी हाताची घडी घातली आणि टीव्ही पत्रकाराकडे बघावे, तशा नजरेने बघून म्हटले, ‘‘हा काय प्रश्‍न झाला?’’ 
ज्या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याकडे नाही, अशा प्रश्‍नाला नेहमी प्रतिप्रश्‍नाने बगल द्यावी, एवढे मला (दिल्लीत राहून राहून) कळले आहे. मा. देसाईजी सारखे मुंबईत आमच्या बांदऱ्याच्या साहेबांना फोन लावत होते. साहेब फोन उचलत नसल्याने ते कासावीस झाले. त्यांनी पुन्हा मला विचारले, ‘‘आता काय करायचं?’’
‘‘हा काय प्रश्‍न झाला?’’ मी पुन्हा एकदा हाताची घडी घातली!  

‘‘कालपर्यंत आपला पाठिंबा होता, आज आहे का? हा खरा प्रश्‍न आहे!’’ मा. देसाईजी म्हणाले आणि पुन्हा कुणाची तरी वाट पाहू लागले. ‘‘कळेल लौकरच!’‘ मी म्हणालो. उत्तर द्यायचे नसेल, तर डोळे मिटून हे दोन शब्द उच्चारावेत! पत्रकार खूश होतात. कारण ‘कळेल लौकरच’ या दोन शब्दांत ‘ब्रेकिंग न्यूज’ दडलेली असते.

दिवसभराचे कामकाज आटोपता आटोपता संध्याकाळी मा. देसाईजींचा फोन वाजला. त्यांनी घाईघाईने उचलला. ‘‘जय महाराष्ट्र...हो, हो...बरं...हो, मॅडम! चालेल...नक्‍की! काय? माती?...नाही नाही, नाही खाणार, मॅडम! जय महाराष्ट्र!’’ असे म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि मला म्हणाले. ‘‘पाठिंबा गेला उडत! चहा प्यायला जाऊ या?’’ 
‘‘हा काय प्रश्‍न झाला?’’ मी पुन्हा हाताची फायनल घडी घातली. दिल्लीतले धुके स्वच्छ झाले होते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com