ढिंग टांग : पत्तेवाटप!

Dhing-Tang
Dhing-Tang

मु. उधोजीसाहेब : (कंटाळून) आणखी किती वेळ असंच बसून राहायचं आहे? कंटाळा आला!
छगनबाप्पा : (घड्याळात पाहत) थोडी वाट पाहूया!
बाळासाहेब थोरातजी : थोडा टाइम जाऊ द्या अजून!
छगनबाप्पा : आमचे दादा येतीलच इतक्‍यात!
जयंत्राव पाटीलसाहेब : (चुळबुळत) त्यांची वाट कशाला बघायची! राजामाणूस आहे, मनाला आलं येतील, नाही आलं-जातील! आपला कुठं कंट्रोल आहे त्यांच्यावर?
एकनाथभाई शिंदे : (अदबीने) साहेब, डाव आपला, घर आपलं! कोण रोखतंय आपल्याला? वाटा तुम्ही साहेब!
सुभाषाजी देसाई : (अस्वस्थपणे) काही उलटसुलट घडण्याआधी वाटून टाका, साहेब!
बाळासाहेब थोरात : माझा विचार बदललाय! आमच्या हायकमांडचा मूड बदलला तर भानगड होऊन जाईल!! लौकर वाटा! (चिमटा काढत) का हो राऊतसाहेब?
नितीनजी राऊत : (दचकून) अं? हो...हो...हो तर!
एकनाथभाई शिंदेजी : (छातीवर हात ठेवत) तुम्ही राऊतसाहेब म्हटल्यावर इथं काळजाचा ठोका चुकला! म्हटलं आता हे इथे कुठे आले? 
उधोजीसाहेब : (दिलासा देत) काळजी करू नका! मी त्यांना दिल्लीत बरीच कामं दिली आहेत! ते इथं येणार नाहीत! कधी वाटप करायचं ते फायनल सांगा, मी तयार आहे!
सुभाषजी देसाई : (रुमालाने चेहरा पुसत) तुम्ही वाटा, साहेब! मी डाव मांडतो! कागद-पेन्सिल घेऊन आलोय मी!
उधोजीसाहेब : (ड्रावरातून कागद-पेन काढत) माझ्याकडेपण आहे! मीच मांडामांड करीन! कळलं? (इथे सुभाषाजी निमूटपणे आपला कागद-पेन्सिल गुंडाळून ठेवून देतात.)
जयंत्राव : वाटप करण्याआधी थोरल्या साहेबांना फोन करून परमिशन घेतलेली बरी, असं वाटतं! बघा बुवा!
बाळासाहेब : (डोळे मोठे करत) साहेबांचं काय घेऊन बसलात? आमच्या दिल्लीतल्या हायकमांडची परमिशन नको? 
छगनबाप्पा : (थंडपणाने) मग लावा ना फोन दिल्लीला! कोणी रोखलंय?
बाळासाहेब : (चुळबुळत) मघापास्नं आठ वेळा लावला फोन! कुणी उचलून नाही ऱ्हायलं! (स्वत:शीच) काय करावं?
एकनाथभाई : (आक्रमकपणे) का? आमच्या साहेबांकडेही अधिकार आहे, म्हटलं! ज्याची जागा, त्याचा क्‍याट, त्यानंच सगळं ठरवायचं, हा जगात सगळीकडे नियम आहे! साहेब, तुम्ही वाटा बिनधास्त!
छगनबाप्पा : (आध्यात्मिक चेहरा करत) हे पाहाऽऽ... असं आहे की, हे जे वाटप आहे, ते आज ना उद्या करावंच लागणार आहे! आज झालं काय, उद्या झालं काय... काय फरक पडतो? आज वाटताय तर आज वाटा, उद्या वाटायचं तर उद्या वाटाऽऽ... आम्हाला काऽऽही घाईऽऽ नाऽऽही!!
उधोजी : (धीर करून) ओक्‍के! वाटून टाकू! आपण किती जण आहोत?
एकनाथभाई : (उत्साहात) आपण सातजण आहोत साहेब! तुम्ही धरून हां!!
उधोजी : (चुकचुकत) मी खेळणार नाही, फक्‍त वाटणार! खरं तर मी पाच-तीन-दोनची तयारी करून आलो होतो! कारण माझ्याकडे एकच क्‍याट आहे! काय करायचं?
छगनबाप्पा : (शांतपणे) काही हरकत नाही! एक क्‍याट इज इक्‍वल टू बावन प्लस दोन जोकर! वाटा तुम्ही!
जयंत्राव : (आर्थिक आढावा घेत) चोपन भागिले सहा म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला नऊ पत्ते आले! कसं करायचं?
उधोजी : आपण च्यालेंज, च्यालेंज खेळू! चालेल?
छगनबाप्पा : (दिलेरपणाने) चालेल! मी कश्‍शालाही तयार आहे! पिसा पत्ते!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com