ढिंग टांग : नवे वर्ष, नवे संकल्प!

Dhing-Tang
Dhing-Tang

महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढाऱ्यांच्या अनेक पिढ्या झटल्या. त्यांच्या संघर्षातूनच हा महाराष्ट्र घडला आहे, असे म्हंटात. असेलही! दृढसंकल्प हा आपल्या नेत्यांचा स्थायीभाव आहे. तसा तो नसता तर महाराष्ट्राचा एवढा विकास झाला असता का?

मुळीच नाही! तेव्हा आपल्या लाडक्‍या नेत्यांच्या नववर्षाच्या जबरदस्त संकल्पांविषयी माहिती करून घेणे, हे नागरिक म्हणून आपले प्रथम कर्तव्य आहे. महाजनो येन गत: स पंथ: असे संस्कृत सुभाषित जुनेच आहे. (संस्कृत सुभाषित जुनेच असणार! नवे कुठले?) याचा अर्थ महाजनांनी चाललेल्या (खुलासा : गिरीश महाजन प्लीज नोट!) मार्गावर पावले टाकल्यास प्रगती ठरलेलीच! या उक्‍तीनुसार आम्ही अनेक महाजनांना म्हणजेच पुढाऱ्यांना त्यांच्या पंथ वा मार्गाबद्दल विचारून घेतले. (नंतर कटकट नको!) अनेक पुढाऱ्यांना गाठून विचारले की ‘‘बुवा, तुमचा नववर्षाचा संकल्प काय आहे?’’
त्यांनी दिलेल्या प्रामाणिक आणि प्रांजळ उत्तरांचे आम्ही वाचकांसाठी येथे संक्षेपात संकलन केले आहे. या संकल्प विचारण्याच्या कामात आम्हाला अनेक अडथळे आले. पण त्यावर मात करून आम्ही आमचा संकल्प पुरा केला...वाचा!

माननीय मुख्यमंत्री उधोजीसाहेब, सीएम : सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. विशेषत: माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना हार्दिक आणि आर्थिक शुभेच्छा देतो! शेतकरी हे आपले बांधव आहेत, कारण ते बांधावर असतात!! (काय पण विनोद! ह्या!!) यंदाच्या वर्षीचा संकल्प विचारताय? सांगतो! बंद खोलीत बसून कुठलाही करार करणार नाही! केलाच तर त्याचं रेकॉर्डिंग करीन! 

मा. संजयाजी राऊत : अर्ज किया है...
नया साल हो या गया साल, दाल कुछ तो काला था! 
बिल्ली की बाते करते हो, हमने तो बाघ को पाला था!
...कसा वाटला शेर? रोज ट्‌विटरवर एक टाकणार आहे! आपलं ऑपरेशन टायगर कंप्लीट झालं असल्यानं सध्या फार काम नाही! यूपीत सरकार फॉर्मेशनसाठी बोलावतायत! बिहारमधून प्रशांत किशोर आपल्यालाच सल्ला विचारायला लागलेत! बघू, जाऊ! लौकरच भूकंप होईल!! (हे आपलं उगीच!)
मा. दादासाहेब बारामतीकर : त्या ऐंशी तासांबद्दल एक अक्षरही विचारलंत तर बाहेर काढीन! संकल्प? संकल्प वगैरे काही नाही! महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायला आपण नेहमीच बांधील होतो, आहो आणि राहू!...आता यात बातमी शोधायला जाऊ नका! तुम्ही ना, कशाची बातमी कराल, सांगता येत नाही!
मा. जयंत्राव पाटील : होईल, होईल! सगळं काही साहेबांच्या कृपेनं ठीक होईल! मला खात्री आहे! फडणवीस सरकारचा खोटेपणा रोज बाहेर काढणार आहे!
मा. प्रथ्वीबाबाजी चव्हाणसाहेब : सगळं कठीणच आहे, म्हंजे केंद्रात धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत जो काही भयंकर प्रकार चालू आहे, त्यात अधिक दोष मोदीजींचा की अमित शहाजींचा हे पहावं लागेल! आर्थिक स्थिती भयानक बिघडली आहे? काय?...काय म्हणालात? संकल्प? हां हां, आहे ना, संकल्प आहेच! तसे बरेच संकल्प आहेत, पण हायकमांडनी एकदा ओके दिला की मग सांगतो! ओके?
मा. चंदूदादा कोल्हापूरकर : ‘मेरा सुंदर सपना बीऽत गयाऽऽ...’ हे गाणं पाठ करायला घेतलं आहे! नीट ओठांवर बसलं की आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत म्हणणार आहे!
मा. नानासाहेब फडणवीस : ‘मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन!...’ असं मी पुन्हा म्हणणार नाही! म्हणणार नाही! म्हणणार नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com