काळा ढग! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

स्थळ : मातोश्री, वांद्रे. काळ : आलेला!
वेळ : सांगून न येणारी! प्रसंग : बांका!!

स्थळ : मातोश्री, वांद्रे. काळ : आलेला!
वेळ : सांगून न येणारी! प्रसंग : बांका!!

विक्रमादित्य : (हातात आयफोन नाचवत) बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (घाईघाईने पांघरुणात शिरत) नको! मी आता कपाळाला बाम लावलाय! 
विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) कुछ बात करनी थी!
उधोजीसाहेब : (पांघरूण डोक्‍यावर घेत) सांगितलं ना! आता मी कपाळाला बाम लावलाय! नाऊ नो गप्पा!! बाम लावलं की जाम झोंबतं मला!!
विक्रमादित्य : (मुद्दा रेटत) आपण थोडक्‍यात वाचलो बॅब्स! गॉड इज ग्रेट!
उधोजीसाहेब : (डोक्‍यावरचे पांघरूण काढत) घरात पुन्हा उंदीर आला होता?
विक्रमादित्य : (चक्रावून) पुन्हा म्हंजे? आधी कधी आला होता? मी तर पावसाबद्दल बोलत होतो...!
उधोजीसाहेब : (अंगावर शहारे आणत) आग लागो त्या पावसाला! दरवर्षी येतो, मुंबईची...वाट लावतो आणि जातो! खापर फुटतं आमच्यावर! 
विक्रमादित्य : (खुशीत) काल तुम्ही त्या पत्रकारड्यांना जाम झापलं म्हणे!!
उधोजीसाहेब : (फुशारकी मारत) सोडतो की काय! कोणीही अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतलंच म्हणून समजा!! लेकाचे विचारत होते की इतके कोटी रुपये खर्च करूनही मुंबईत पाणी तुंबलं ते का? आता ह्याला काय उत्तर देणार? 
विक्रमादित्य : मग तुम्ही काय उत्तर दिलंत?
उधोजीसाहेब : (छाती काढून) मी म्हटलं, तुम्ही आधी पाऊस थांबवा, मग बघू!! मोरी तुंबली तर आधी वाहता नळ बंद करावा लागतो, येवढं साधं समजत नाही, ह्या लोकांना!!
विक्रमादित्य : (एकदम आठवण होऊन) बॅब्स, त्या नऊ किलोमीटरच्या ढगाची काय भानगड आहे?
उधोजीसाहेब : (गडबडून) काही नाही...तू जाऊन झोप बरं!
विक्रमादित्य : (मुद्दा न सोडता) मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग आला होता, फुटला असता तर खेळ खलास झाला असता, असं तुम्हीच सांगितलंत ना पत्रकारांना?
उधोजीसाहेब : (सावरून घेत) खोटंय की काय! मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय नऊ किलोमीटरचा ढग!
विक्रमादित्य : (उत्साहात) वॉव! कसा दिसत होता?
उधोजीसाहेब : कसा म्हंजे? काळा काळा होता...
विक्रमादित्य : (बालसुलभ कुतूहलानं) तुम्ही गॉगल लावला होता?
उधोजीसाहेब : (संतापून) वाट्टेल ते विचारू नकोस त्या पत्रकारड्यांसारखं! चेचीन!!
विक्रमादित्य : (कुतूहलाची हद्द...) त्यात पाणी होतं?
उधोजीसाहेब : (वैतागून) मग काय मिरिंडा असणार? वेडाच्चेस!! अरे, ढग पाण्याचाच असतो!! 
विक्रमादित्य : (प्रश्‍नांची सरबत्ती करत) तुम्ही कुठे बघितलात? मला कसा दिसला नाही? नाइन किलोमीटर्स लाँग ढग म्हंजे भायखळा ते बांद्रा का? की बांद्रा ते कांदिवली? नऊ किलोमीटर साइजच्या ढगात किती पाणी मावतं? त्यात गरम पाणी असतं की गार?...
उधोजीसाहेब : किती प्रश्‍न विचारशील? येवढे प्रश्‍न त्या पत्रकारांनीही विचारले नाहीत!
विक्रमादित्य : (खुलासा करत) त्यांना विचारायचे होते, पण एकदम तुम्ही ढगासारखे फुटून त्यांच्यावर बरसलात रागावून! हाहा!! 
उधोजीसाहेब : संतापणारच! सोडतो की काय! अरे, आम्ही ह्या मुंबईसाठी दिवसरात्र राब राब राबतो, आणि हे लोक असं बोलतात! दोन दिवस मी झोपलेलोदेखील नाही!...फक्‍त रात्री झोपलो होतो, तेवढाच!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) मीसुद्धा दिवसरात्र ट्विट करत होतो बॅब्स!!
उधोजीसाहेब : (खोल आवाजात) नऊ किलोमीटरच्या ढगाबद्दल मी एवढा पोटतिडकीनं सांगत होतो, पण कुणी विश्‍वास ठेवेल तर शपथ!!
विक्रमादित्य : मग आता तो ढग कुठे गेला?
उधोजीसाहेब : (क्षणभर विचार करून) मी फुंकर मारली, तो उडाला कुठल्या कुठे! कळलं? जा आता! 
जय महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang