बहुआयामी विज्ञानेश्वर

डॉ. जे. के. सोळंकी
Wednesday, 9 September 2020

ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरूप यांचे निधन झाले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य यांविषयीच्या आठवणींद्वारे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.

ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरूप यांचे निधन झाले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य यांविषयीच्या आठवणींद्वारे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

प्रा. गोविंद स्वरूप यांनी आपल्या ९१ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ७० वर्षापेक्षा जास्त काळ विज्ञानाच्या उपासनेत व्यतीत केला.त्यांच्या निधनाने या क्षेत्रातील तळपता सूर्य कायमस्वरूपी अस्तास गेला, अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करीत आहे. 

१९६० च्या सुमारास भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्राची कोणतीही चिन्हे किवा माहिती नव्हती, तेव्हा परदेशातील चांगली नोकरी सोडून भारतपुत्र डॉ. होमी भाभा यांच्या हाकेला ओ देऊन गोविंद स्वरूप भारतात आले आणि रेडिओ खगोलशास्त्राच्या कामाला वाहून घेतले. जगात अप्रतिम व उच्च दर्जाच्या रेडिओ दुर्बिणी उभ्या करणे हे फक्त आणि फक्त प्रो. स्वरूपच करू शकले.

उच्च विचारसरणी,दूरदृष्टी,अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर, उपलब्ध असलेले मनुष्यबळ, त्यांना प्रशिक्षण देण्याची अफाट शक्ती, नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्व यासारख्या गुणांच्या जोरावर एक परिपूर्ण टीम तयार करून प्रथम उटी येथील रेडिओ दुर्बीण (ओआरटी) व नंतर जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) पुण्याजवळील खोडद याठिकाणी उभारण्यात ते यशस्वी ठरले ते केवळ जिद्द, सचोटी, प्रचंड आत्मविश्वास व सकारात्मकऊर्जा या गुणवत्तेमुळे. माझा व स्वरूप सरांचा संबंध १९८९ पासूनचा. अगदी कमी वयात मला एका जगप्रसिद्ध अशा बहुआयामी व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य. प्रो. स्वरूप यांचे भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन या विषयांवर असलेले प्रभुत्व मला अनुभवयास मिळाले.

त्यांच्यामुळेच मला विज्ञानाची गोडी लागली व मी गाव, खेड्यामध्ये विज्ञान प्रसाराचे छोटे काम करू शकलो. किंबहुना माझ्या थांबलेल्या शिक्षणाची शिडी पुन्हा सुरु होण्यामागे त्यांची प्रेरणा नक्कीच होती. माझी डॉक्‍टरेट डिग्री मिळाल्यानंतर त्यांनी माझे भरभरून कौतुक केले होते.

स्वतंत्र विश्‍व
अनेक प्रसंगी ते त्यांचे अनुभव व प्रसंग सांगत असत त्यामुळे सतत काहीतरी नवीन गुण त्यांच्याकडून शिकायला मिळत असे.  त्यांच्या या प्रयत्नामुळे ‘आयसर’सारख्या संस्था कशा उभारल्या गेल्या, शिक्षणामध्ये बदल कसे होत गेले, इ. ऐकता आले. प्रा. स्वरूप एक प्रकारचे स्वतंत्र विश्वच होते. ताऱ्याप्रमाणे सतत कार्यरत व उर्जित राहणे, स्पन्दकाप्रमाणे समयसूचक राहून अनेक विषयांवर प्रकाश टाकणे, आकाशगंगेप्रमाणे अनेक विषय व गोष्टींवर प्रभुत्व ठेवून मार्गदर्शन करणे, या कोणत्याही एखाद्या व्यक्तीला न झेपणाऱ्या गोष्टी  प्रा.स्वरूप यांना सहज साध्य होत.

अनेक संशोधन पेपर, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्याने, प्रबंध, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, यामध्ये त्यांचे कर्तृत्व असामान्य आहे व त्यांचे रेडिओ खगोलशास्त्रातील योगदान फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात नावाजलेले आहे. प्र. स्वरूप यांच्यासारख्या प्रगल्भ व  बहुआयामी विज्ञानेश्वर एकदाच जन्म घेतो, असाधारण कार्य करतो व समाजाला पुढील अनेक शतके उपयुक्त ठरतील अशा अनेक गोष्टी निर्माण करतो. 
(लेखक जीएमआरटी (एनसीआरए) पुणे,येथे वरिष्ठ अधिकारी आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr jk solanki