भाष्य : दिल्ली अब ज्यादा दूर नहीं

Delhi-Pollution
Delhi-Pollution

प्रदूषणाची समस्या पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेली आहे; परंतु तिचे निश्‍चित आणि फार गंभीर असे परिणाम नवी दिल्लीतील आरोग्य आणीबाणीच्या निमित्ताने समोर आले आहेत. जी गोष्ट आज दिल्लीत घडतेय ती उद्या मुंबई किंवा पुण्यात घडणार नाही कशावरून? तेव्हा या संदर्भात फार उशीर होण्याआधीच पावले उचलण्याची गरज आहे.

जगभर हवामानबदल ही एक गंभीर समस्या ठरते आहे आणि त्यामागील अत्यंत महत्त्वाचे कारण मानवनिर्मित प्रदूषण आहे, हेदेखील आता हळूहळू का होईना, पण सर्वांना पटलेले आहे. असे हे प्रदूषण पुन्हा एकदा ठळकपणे जगासमोर आले ते राजधानी दिल्लीमध्ये जाहीर झालेल्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या निमित्ताने. एक ते पाच नोव्हेंबर काळात दिल्लीतील शाळांना सुटी जाहीर झाली, अंदाजे चाळीस विमाने दिल्ली विमानतळावरून अन्य ठिकाणी वळविली गेली आणि ‘दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झाली आहे,’ अशी कबुली खुद्द दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व केंद्र सरकार या दोघांनाही फटकारले. या सर्व घटना घडल्या त्याचे मुख्य कारण होते दिल्लीतील अतिधोकादायक पातळीवरचे हवेचे प्रदूषण (२.५ मायक्रोन कणांसाठी ३८४). 

२०१९ च्या जागतिक प्रदूषण निर्देशांकानुसार जगातील शंभर सर्वाधिक प्रदूषित शहरे बघितली, तर त्यापैकी २८ शहरे ही केवळ भारतातील आहेत. सर्वाधिक प्रदूषणाचा निर्देशांक १०० असेल, तर भारतातील ही सर्व २८ शहरे ९५.५३ (फरिदाबाद पाचव्या क्रमांकावर) ते ७०.४४ (डेहराडून ९० व्या क्रमांकावर) अशा श्रेणीत येतात. दिल्लीचा क्रमांक जगभरात चौदावा असून, निर्देशांक ९१.३१ असा आहे. हा जागतिक प्रदूषण निर्देशांक त्या शहरातील सर्वसाधारण प्रदूषण दाखवतो, ज्यात हवेचे प्रदूषण पहिल्या क्रमांकावर, तर पाणी प्रदूषण दुसऱ्या क्रमांकावर अंतर्भूत केलेले असते. म्हणजेच मानवी जीवनासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या शुद्ध हवा व पाणी या दोन घटकांपासून एखाद्या शहरातील नागरिक किती वंचित आहेत, हे हा निर्देशांक सांगतो.

मुळातच एखाद्या देशातील एखाद्या शहरात अशी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागते, ही घटनाच आज आपण सर्वत्र चर्चा करत असलेल्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आणि त्याच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करते. इथे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय हे पाहणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार सार्वजनिक आरोग्य आणीबाणी अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. यात प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती, संसर्गजन्य व जीवघेणे आजार यांचा अतिफैलाव, रासायनिक अथवा अन्य प्रदूषकांमुळे प्रदूषित झालेली हवा व त्यामुळे मानवी जीवनासाठी निर्माण होणारे अनेक धोके यांचा समावेश होतो.

अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, लोकांच्या/समाजाच्या म्हणजेच सार्वजनिक आरोग्यावर कोणत्याही घटकांमुळे परिणाम होऊन तो समाज त्याच्या नेहमीच्या कार्यक्षमतेनुसार कामे करण्यास सक्षम नसतो, तेव्हा त्याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असे म्हटले जाते.

दिल्लीच्या संदर्भात या दोन्ही व्याख्या हवेच्या अतिरिक्त प्रदूषणामुळे लोकांना होणाऱ्या त्रासांकडे लक्ष वेधते. हवेतील प्रदूषक कणांची पातळी किती आहे यावरून एखाद्या शहरातील प्रदूषण ठरते. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या अहवालानुसार जगातील दर दहा माणसांपैकी नऊ माणसे असुरक्षित आणि प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात घेत आहेत. इथे आपल्याला हवा गुणवत्ता निर्देशांकाचा विचार करावा लागतो. हवेतील अत्यंत छोटे घन किंवा द्रवकण ज्यांची जाडी/व्यास २.५ मायक्रोनपेक्षाही (मानवी केसाचा व्यास ५०- ७० मायक्रोन असतो) कमी असते. असे कण हे धोकादायक प्रदूषक कण म्हणून ओळखले जातात. अशा या प्रदूषित हवेचे निकष व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम देशाच्या मध्यवर्ती प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार शेजारी चौकटीत आहेत.

जी गोष्ट आज दिल्लीत घडतेय ती उद्या मुंबई किंवा पुण्यात घडणार नाही कशावरून? याचे कारण सर्वच शहरांमध्ये वाढत असलेली लोकसंख्येची घनता, अतिरिक्त खासगी वाहनांमुळे होणारे व सतत वाढते हवा प्रदूषण, पाण्याचा अतिरिक्त आणि बेसुमार वापर, वाढता कचरा आणि त्याचे अयोग्य व्यवस्थापन/विल्हेवाट, शेतीतील कचरा जाळून निर्माण होणारी (आताच्या दिल्लीतील प्रदूषणामागील एक महत्त्वाचे कारण) व उद्योग क्षेत्रातील चिमण्यांमधून बाहेर सोडली जाणारी प्रदूषित हवा, अनियंत्रित वृक्षतोड, स्व-केंद्रित उपभोग अशी साखळी आज सर्वत्र दिसते. या संदर्भात हे प्रदूषण व त्यामुळे होणारी सार्वजनिक आरोग्याची हानी आणि आज निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती याला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत, हे सत्य स्वीकारून काही उपाययोजना करणे अत्यावश्‍यक आहे. यात सर्वप्रथम नागरिकांनी प्रवासाचे सायकलीसारखे स्वच्छ मार्ग आणि सार्वजनिक वाहनाचा जास्तीतजास्त वापर करण्याची गरज आहे.

सरकारने सार्वजनिक वाहतुकीचे हे मार्ग सक्षमपणे राबवून लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. खरेतर प्रत्येक कुटुंबाने किती वाहनांची खरेदी व वापर करावा याबाबत निश्‍चित धोरण ठरविण्याची आता वेळ आली आहे. या संदर्भात पुण्यातील एका बातमीचा विचार करता येईल. पुण्यात लोकसंख्येइतकीच एकूण वाहनांची संख्या (दोन व चार चाकी मिळून) आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणावरील ही वाहने प्रमाणाबाहेर प्रदूषण सध्या करत आहेत आणि भविष्यातही करतील यात नवल ते काय? या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय हे वाहन नोंदणीच्या वेळी अशा प्रकारची योजना अमलात आणू शकते. घरातील उर्जेचा व पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे, घरताली कचऱ्याचे ओला व सुका असे नीट विभाजन करून त्याच्या विघटनास मदत करणे यामुळे हवेचे प्रदूषण आपणच रोखू शकतो.

हवेच्या प्रदूषणाबाबत लोकांना जागरूक करणे अशा प्रकारचे लोकप्रबोधनदेखील महत्त्वाचे आहे. शालेय पातळीवर कचरा व्यवस्थापन आणि गरजेनुसार संसाधनांचा वापर ही मूल्ये रुजविणे आवश्‍यक आहे. प्रदूषणाची ही समस्या पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेली आहे; परंतु तिचे निश्‍चित आणि फार गंभीर असे परिणाम या निमित्ताने समोर आले आहेत. त्यांची पुरेशी दखल न घेतल्यास मात्र ‘दिल्ली अब ज्यादा दूर नहीं है’ हेच वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com