दगड आणि दऱ्या 

Editorial article for Jammu and Kashmir
Editorial article for Jammu and Kashmir

जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे. 

जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे लक्षात घेऊन बहुस्तरीय, सर्वंकष उपाययोजना केल्याशिवाय यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही. वास्तविक, याविषयी आजवर कमी चर्चा झालेली नाही, तरीही सध्याच्या परिस्थितीची धोरणकर्त्यांनी, प्रशासनाने; किंबहुना साऱ्या देशाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याने त्याकडे पुन्हापुन्हा लक्ष वेधावे लागते. मुख्य म्हणजे हा राष्ट्रीय प्रश्‍न असून, त्यादृष्टीनेच त्याकडे पाहिले जावे आणि त्यासाठी पक्षीय भूमिकांच्या, तात्पुरत्या राजकीय लाभांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. पुलवामा जिल्ह्यातील ताज्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा "इस्लामिक स्टेट'चा सदस्य असल्याचे समोर आले; तर शुक्रवारीच नवी दिल्लीत ताब्यात घेण्यात आलेले दोघे काश्‍मिरी तरुणही जम्मू-काश्‍मीरमधील "इस्लामिक स्टेट'शी (आयएसजेके) संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. इथल्या राजकीय प्रक्रियेशी, घटनात्मक चौकटीशी कसलाच संबंध नसलेली; त्या विचारातही न घेणारी राज्यविहीन आणि मूलतत्त्ववादी विखारातून दहशतवादाची आग भडकवत ठेवणारी संघटना जर काश्‍मिरात हातपाय पसरू लागली तर ते भारताच्याच नव्हे, तर जगाच्याच दृष्टीने मोठे संकट ठरेल. विकासाचे प्रश्‍न, शिक्षणाचा, रोजगाराचा अभाव यामुळे तरुण हिंसाचारास प्रवृत्त होतात, हा सिद्धांत नेहमीच मांडला जातो; पण तो सर्वथा लागू पडत नाही. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेत असून, आयएससारख्या अत्यंत कडव्या संघटनेचे त्यांना वाटणारे आकर्षण याची कारणे शोधायला हवीत. मुख्य म्हणजे स्थानिक काश्‍मिरी तरुणांमधील वाढत असलेली मानसिक तुटलेपणाची भावना ही मुख्य समस्या आहे. ती कमी करण्याच्या प्रयत्नांची आजवरची दिशा तरी चुकली किंवा झालेले प्रयत्न अपुरे ठरले, हे मान्य करावे लागेल. पोलिस आणि निमलष्करी दलांवर सातत्याने होत असलेल्या दगडफेकीतून हे वास्तव प्रकर्षाने समोर येत आहे. अशा जमावांना पांगविणे ही पोलिसांची फार मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच काही पोलिसांनी साध्या वेशात त्या जमावांमध्ये शिरून दगडफेक करणाऱ्यांना शिताफीने ताब्यात घेतले आणि अनपेक्षितरीत्या समोर आलेल्या या परिस्थितीने गांगरलेल्या जमावाने आंदोलन आवरते घेतले. 2010मध्येदेखील असा प्रयोग केला होता. 

कायदा-सुव्यवस्था राखणे आणि हल्ले रोखणे यासाठी प्रयत्न करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण त्यांच्या या प्रयत्नांच्या जोडीनेच प्रक्षुब्ध झालेल्या मनांचे काय करायचे, या आव्हानाकडे दुर्लक्ष होता कामा नये. सध्या महाविद्यालयात शिकत असलेला किंवा ते पूर्ण करून उच्च शिक्षण घेत असलेला त्या राज्यातील तरुणवर्ग नव्वदीनंतर जन्म घेतलेला आहे. चकमकी, तणाव, हिंसाचार आणि दहशतवाद अशा वातावरणातच तो वाढला आहे. याचकाळात राजकीय पक्षांची दिवाळखोरी त्यांनी अनुभवली, राज्य सरकार आणि नोकरशाहीच्या निष्क्रियतेचा अनुभव घेतला, हुर्रियतसारख्या फुटिरतावादी संघटनांमधील लाथाळ्या आणि वैचारिक संभ्रम त्यांच्या अस्वस्थतेत आणि गोंधळात भर टाकणारा ठरला. पाकिस्ताननेही दहशतवादाची निर्यात करून या अस्वस्थ पोकळीचा जास्तीत जास्त फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. आता तर आयएस ही अत्यंत कडवी संघटना तेथे शिरकाव करताना दिसते आहे. लष्कर आणि पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या आटोकाट प्रयत्नांना राजकीय व्यवहाराची, राजकीय व्यवस्थापनाची जोड मिळाली नाही,तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळेच या गंभीर राष्ट्रीय प्रश्‍नाचे राजकारण करण्याची संकुचित वृत्ती म्हणजे आगीशी खेळ ठरेल, याचे भान राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्वंच राजकीय पक्षांनी ठेवायला हवे. 

पोलिस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून सातत्याने सुरू आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या काही नातलगांचेच अपहरण केले. त्यांच्या मुक्ततेसाठी पोलिसांच्या ताब्यातील हिज्बुल मुजाहिदीनच्या कट्ट्रर दहशतवाद्याच्या वडिलांना सोडण्यात आले. या घटनेनंतर राज्याचे पोलिसप्रमुख एस. पी. वैद यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्यातील विसंवाद त्यातून समोर आला. कथुआतील बलात्कार प्रकरणात वैद यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर भाजपचे काही स्थानिक नेते त्यांच्यावर नाराज होते, असेही सांगण्यात येते. मुळातील स्फोटक परिस्थितीत "35-ए 'या कलमाविषयीच्या वादाने आणखी भर घातली आहे. काश्‍मीरची ओळखच पुसून टाकण्याचा हा डाव असल्याच्या प्रचाराला आणखी एक निमित्त मिळाले आहे. पाकिस्तान या आगीत तेल घालण्यास टपलेला असून, "इतरांच्या दहशतवादविरोधी लढाईत आम्ही कशाला शक्ती खर्च करू,' असा निरर्गल प्रश्‍न विचारून पंतप्रधान इम्रान खानने आपले खरे रूप लगेचच दाखवून दिले आहे. एकूणच देशाच्या राजकीय व्यवस्थेपुढील हे एक बहुपदरी आव्हान आहे, हे लक्षात घेऊन सरकार आणि राजकीय पक्षांच्या प्रगल्भ वर्तनाची, प्रतिसादाची अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com