गरज दुभंगलेली मने सांधण्याची...

रक्षाबंधनाचा सण साजरा करताना हिंदू व मुस्लिम धर्मीय. (संग्रहित छायाचित्र)
रक्षाबंधनाचा सण साजरा करताना हिंदू व मुस्लिम धर्मीय. (संग्रहित छायाचित्र)

सध्याच्या काळात द्वेषाच्या विरोधात एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. ‘चला करूया द्वेषाला हद्दपार!’ ही संजय नहार, नीलेश नवलखा यांच्या पुढाकाराने येत्या नऊ ऑगस्टपासून सुरू होत असलेली मोहीम त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द्वेषाच्या विरोधात एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. पण ती आत्ताच निर्माण झालेली नाही. सहा एप्रिल १९९८ ला मला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी मी जम्मू- काश्‍मीरचे राज्यपालपद स्वीकारावे, असा आग्रह केला होता. पण मी नम्रतापूर्वक नकार दिला. याचे कारण निवृत्त झाल्यानंतर सामाजिक ऐक्‍यासाठी काम करायचे ठरवले होते. मला माझी ‘बुलेट फॉर बुलेट’ ही प्रतिमा बदलायची होती. देशात शांतता नांदण्यासाठी द्वेषाला हद्दपार करण्याची गरज मला तेव्हापासूनच वाटते आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावर भर दिला. ’इंडिया अगेन्स्ट हेट्रेड’ला शुभेच्छा देताना त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्‍य ‘स्वतःच्या रागावर आणि द्वेषावर विजय मिळविणाराच खरा हिरो असतो’ (The True hero is one who conquers his own anger and hatred.) हे या चळवळीसाठी वापरण्यासाठी परवानगी दिली.

सांप्रदायिक अहंकार, जातीय हिंसाचाराशी दोन हात करण्याची वेळ ३६ वर्षांतील सेवेत माझ्यावर अनेकदा आली. बंदुकीच्या धाकाने आणि द्वेषाने शांतता, सौहार्द प्राप्त होऊ शकत नाही, हे जाणवले. हिंसेच्या पोटातही मुळात द्वेष असतो. मुळातच तो तयार कसा होत असेल, हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. मानवजात अस्तित्वात कशी आली आणि मृत्यूनंतर त्याचे काय होणार, हे कुणाला माहीत नाही. ग्रह कुठून आले आणि चंद्र, सूर्य, तारे त्यांची भूमिका यथायोग्य कशी पार पाडतात, निसर्गाचा अनेकदा गरिबांनाच फटका का बसतो, हे कुणी जाणत नाही. त्यामुळे अनेकांनी निसर्गातील घटनांचा आपापल्या परीने अर्थ लावला. त्या दृष्टिकोनातील विविधतेतून वेगवेगळे धर्म अस्तित्वात आले. पुढे खरे-खोटे सुंदर रंगवून सांगणारा धर्मोपदेशकांचा वर्ग जन्माला आला. त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यातील विधी जन्माला घातले. जन्मानंतर, यौवनात प्रवेशताना, विवाह आणि मृत्यूपर्यंत प्रत्येक धर्मात स्वतंत्र विधी आहेत. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाल्यानंतर आपण ज्या धर्मात जन्मलो तोच सत्य धर्म आणि इतरांचे धर्म खोटे, असे नव्या ठिकाणीही म्हणू लागला, तेव्हा सगळे प्रश्न निर्माण होऊ लागले. 

सत्तेसाठी धर्माचा वापर 
भारतात हिंदू-मुस्लिम वैर जुने आहे. यामागे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी अनेक कारणे आहेत. एकेश्वरवादी जेव्हा धर्माचा प्रसार करतात आणि कुटुंबांचे, गावांचे धर्मांतर केले जाते; तेव्हा तिथे असलेली जुनी, जातीची उतरंड विस्कळित होते. त्यातून हिंसा भडकते. अशा तणावामागे धार्मिक मतभेद दिसून येत असले तरी धर्माचा वापर हा प्राचीन काळापासून राजकीय वर्चस्वासाठी करण्यात आला, हे वास्तव आहे. त्यातून युद्धेही झालेली आहेत. ‘धर्म ही अफूची गोळी’ असल्याचे कार्ल मार्क्‍स म्हणाला होता. कष्टकऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी धर्माचे आयुध वापरले जाते. मात्र जनतेवरची पकड घट्ट रहावी, यासाठी राज्यकर्ते, राजकारणी आपले हितसंबंध जपण्यासाठी नेहमी धार्मिक श्रद्धांना हात घालतात. 

आपल्या देशातही हेच घडतंय...सत्ता राखण्यासाठी सध्याचे राज्यकर्ते मुस्लिम अल्पसंख्याक हा विषय सोयीप्रमाणे वापरताना दिसतात. पूर्वी धर्मापेक्षा जाती महत्त्वाच्या असत. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये धार्मिक फूट पाडून गरिबांची मते मोठ्या प्रमाणात मिळविली गेली. त्याचे दुर्दैवी परिणाम म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण. परिणामतः मुस्लिम धर्मगुरूंचे हात बळकट झाले. इतर धर्मातील नेत्यांप्रमाणे या धर्मगुरूंनाही अनुयायांना भीती दाखवून त्यांच्यावरील पकड घट्ट ठेवणे सोपे झाले. या समाजाची लोकसंख्या १५ टक्के आहे. हा धोकादायक पायंडा सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येऊ शकतो. अशाने देश अधिक कमजोर बनेल आणि धोक्‍याची स्थिती उद्भवेल.

आशेचे किरण
सुमारे ३५ वर्षांपासून मित्र असलेले संजय नहार हे नीलेश नवलखा यांच्यासोबत ‘इंडिया अगेन्स्ट हेट्रेड’ (भारताची द्वेषाविरुद्ध लढाई) ही मोहीम येत्या नऊ ऑगस्टपासून सुरू करत आहेत. १९८६-८७ मध्ये नहार पुण्याहून पंजाबला आले होते. त्यावेळी पंजाबात स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहित केले होते. खालिस्तानवाद्यांना पंजाबात यश मिळाले तर इतर फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन मिळेल, अशी नहार यांची भूमिका होती. ‘इंडिया अगेन्स हेट्रेड’ ही लोकचळवळ व्हावी ही काळाची गरज आहे. घटनेचा आणि कायद्याचा आदर करणारी आणि कोणाचाही द्वेष न करणारी चळवळ उभी राहणे, हेच शांततेच्या दिशेचे पहिले पाऊल ठरेल. कोणत्याही व्यक्तीच्या, समूहाच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात ही चळवळ नसेल, तर द्वेषाची जागा सौहार्दाने घेण्यासाठी कायद्याच्या चौकटीत करता येणाऱ्या सर्व गोष्टी केल्या जातील. सभा, बैठका घेतल्या जातील. जिथे द्वेषापोटी एखादी व्यक्ती किंवा समूहावर अन्याय होत असेल तर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी ही चळवळ पुढे येईल. 

समाजमाध्यमांपासून सांस्कृतिक वर्तुळालाही द्वेषाची लागण झालेली आहे यासाठीही खोलात जाऊन काम करण्याची गरज आहे. या चळवळीला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे. त्यामध्ये निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी जोडले जात आहेतच. शिवाय एक लाख तरुणांना शांतिसैनिक म्हणून या आंदोलनासोबत जोडले जाणारआहेत ...जे माझ्यासाठी आशेचे किरण आहेत.

(लेखक पंजाबचे माजी पोलिस महासंचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com