सरमिसळ शिक्षणाचा गुणकारी प्रयोग

Education
Education

‘विशेष गरजा असलेली मुले’ आणि सर्वसाधारण मुले यांच्या एकत्रित शिक्षणाच्या संकल्पनेविषयी व्यापक जागरूकतेची गरज आहे. पुण्यात येत्या सोळा नोव्हेंबर रोजी होत असलेली एकदिवसीय कार्यशाळा हा तशा प्रयत्नांचा एक भाग आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने या संकल्पनेची ओळख करून देणारा लेख.

भारतीय प्राचीन शिक्षणपद्धती म्हणजे गुरुकुल पद्धती. कृष्ण, सुदामा, पेंद्या हे विविध सामाजिक, आर्थिक, शारीरिक व बौद्धिक क्षमतांचे असूनही त्यांचे शिक्षण एकत्र एकाच गुरुकुलात झाले. त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता सर्वांच्याच सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरल्या. ‘शिकणं’ म्हणजे नक्की काय?

नवनवीन माहिती मिळवणे, साठवून ठेवणे, योग्य ठिकाणी त्याचा वापर करणे, नव्याने मांडणी करणे, आठवून सांगणे, निरीक्षण करणे, तर्कसंगती लावणे अशा अनेक प्रक्रिया ह्या ‘शिकणं’ या एकाच प्रक्रियेचा भाग आहेत. शिक्षण झाले की नाही, हे समजण्यासाठी बोलणे, लिहिणे ही मुख्य माध्यमे आहेत. काही मुले ही माध्यमे सहजतेने वापरू शकत नाहीत. त्यांना येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्यांच्यावर मठ्ठ, मंद, चंचल असे शिक्के मारले जातात. या अडथळ्यांची कारणे आपण तीन प्रकारांत विभागू शकतो. शारीरिक अपंगत्वामुळे, संदेशवहन करणाऱ्या मज्जातंतूंमधील जोडणी चुकीची असल्यामुळे व गुणसूत्रातील दोषांमुळे. परंतु, हे अडथळे असेही नसतात, की त्यासाठी वेगळ्या शाळेतच त्यांनी शिक्षण घ्यायला हवे. उलट ते मुख्य प्रवाहातील शाळेत शिकू शकतात; एवढेच नव्हे तर तसे एकत्र शिक्षण मिळाल्याने त्यांना अनेक फायदे होतात. फक्त त्यांच्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. यामध्ये गतिमंद, अध्ययनअक्षम, काही स्वमग्न, अतिचंचल इत्यादी मुले येतात. 

शाळेतच, शाळेच्याच वेळात, आठवड्यातून दोन दिवस १-१ तास त्यांच्यावर कौशल्य विकसनाचे काम केले तर खूप सकारात्मक फरक पडतो. यालाच ‘रेमेडिअल टीचिंग’ असे म्हणतात. यामध्ये मूल केंद्रस्थानी ठेवून पालक, समुपदेशक, रेमेडिअल टीचर, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, डॉक्‍टर, अशा सगळ्यांचा पूरक सहभाग आवश्‍यक आहे. पाठ्यपुस्तकाचा वापर न करता त्या त्या वयात विकसित व्हायला हव्यात अशा क्षमतांवर काम केले जाते. दैनंदिन व्यवहार, सामाजिक, कारक (Motor Skills) व भाषा (ऐकणे, कळणे, सांगता येणे इ.) अशा कौशल्यांच्या विकासावर काम केले जाते. याचा परिणाम आपोआपच अभ्यासात दिसतो; फक्त त्यासाठी काही अनुकूल गोष्टी कराव्या लागतात. वर्गात बसण्याची व्यवस्था, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत किंवा प्रश्नपत्रिका/उत्तर लिहिणे, प्रगती तपासण्याची पद्धत, या सगळ्यात थोडे आवश्‍यक बदल केले, तर फरक पडतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. या गोष्टींसाठी शाळेने सहकार्य केले, तर त्याचा फायदा मुलांच्या प्रगतीसाठी होतो. 

एकत्रित शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. १) आत्मविश्वासात वाढ होते. (फक्त मुलांच्याच नाही तर पालकांच्याही), २) मुलांना ‘स्व’ची जाणीव होते, ३) बरोबर शिकणाऱ्या मुलांमध्ये द्वेष न करता, फक्त सहानुभूती न देता परस्परपूरकतेची भावना जागृत होते/वाढते. 

एकत्रित शिक्षणाचा फायदा जसा विशेष गरज असण्याऱ्या मुलांना होतो; तसाच इतर सर्वसामान्य मुलांनाही होतो. सर्वांना मदत करून एकत्र पुढे जाण्याचा संस्कार होतो. समता, बंधुता, एकात्मता हे अभ्यास, परीक्षेपुरते मर्यादित न राहता आचरणात आणता येते. त्यांच्यातही काही न्यूनगंड असेल तर तोही दूर होतो. पण हे सगळे नीट होण्यात समुपदेशकाचा मोठा वाटा असतो. शाळेतील काही मुलांना विशेष मदत का लागते, ती करण्याची गरज का आहे, हे जर नीट समजावून सांगितले तर वर्गातील सर्व मुले ह्या मुलांना नक्कीच समजावून, सामावून घेतात. वर्गात कोणतीच अडचण येत नाही.

तसेच जर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमची मुलेही लहान आहेत, त्यांनीच का समजावून घ्यायचे, असा प्रश्न उपस्थित केला तर तेव्हा त्यांनाही समुपदेशनातूनच हे समजावावे लागते. काही वेळा काही शिक्षकांनाही ह्या मुलांच्या अडचणी काय आहेत ते लक्षात येत नाही. बाकी सगळे कळते, मग अभ्यास कसा जमत नाही, पेपर कसा लिहिता येत नाही? असे प्रश्न शिक्षकांनाही असतात. तेव्हा त्यांनाही ते समजावून सांगण्याची जबाबदारी समुपदेशकास पार पाडावी लागते. या सगळ्या प्रयत्नांमुळे ‘विशेष गरजा असणारी मुले’ स्वतःच्या गतीने आत्मसन्मानाने प्रगतीचा टप्पा गाठू शकतील. 

पुण्यात होणाऱ्या कार्यशाळेत याविषयी अधिक मंथन होईल. समावेशक शिक्षणाची संकल्पना योग्य प्रकारे शिक्षण प्रक्रियेतील घटकांपर्यंत पोचवावी, सरकारनेही यासाठी केलेल्या कामाची, आखलेल्या योजनांची, सोयीसवलतींच्या अध्यादेशाची, शाळेत त्याचा वापर कसा करावा इत्यादीची कल्पना स्पष्ट व्हावी, या हेतूने पुण्यात ‘ध्रुव एज्युकेशनल अँड रिसर्च फाउंडेशन’तर्फे ही कार्यशाळा होत आहे. टिळक रस्त्यावरील मा. स. गोळवलकर प्रशालेच्या सभागृहात शनिवारी (ता. १६) सकाळी साडेदहा वाजता ती सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com