सुखाची फांदी

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 1 जून 2017

कुणाला सहानुभूतीची फुंकर पुरेशी असते. कुणाला रस्ता ओलांडायला हाताचा आधार हवा असतो; तर कुणाला यशाचं कौतुक करणारं जवळचं माणूस हवं असतं. दुसऱ्याच्या मदतीसाठी अमर्याद संधी आहेत; आपण त्या शोधणं महत्त्वाचं असतं. असल्या छोट्या गोष्टी आपण सगळेच करू शकतो. माणसाच्या आयुष्याची तीच तर सार्थकता आहे

नजरेच्या टप्प्याच्या पलीकडं धावणारा रस्ता. दुपारचं तापलेलं ऊन. रस्ता जवळजवळ निर्वृक्ष. नाही म्हणायला कुठं तरी एखादं झाड. पानगळीत बचावलेल्या किरकोळ फांद्या. डोक्‍यावर ओझं घेऊन जाणारा वाटसरू विसाव्यासाठी त्या कृशकाय झाडाच्या बुंध्याशी टेकून बसला आहे. झाडाखाली सावलीचे काही थेंब सांडलेले. क्वचित येणाऱ्या झुळकीनं तेही जागा बदलून इकडं-तिकडं घरंगळत जाणारे. थकलेल्या पांथस्थाला सावलीचे तेवढे कवडसे म्हणजे जणू अतीव समाधानाचं सोनं होतं. विश्रांतीच्या सुखाचे प्रसन्नरंगी आनंदक्षण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. रखरखीत उन्हात त्याला जणू सुखाची सावली मिळाली होती. एकेकाच्या सुखानुभवाची पातळी केवढी तरल-संवेदनशील असू शकते नाही? ज्याला ओंजळीत आभाळ झेलून घेता येतं, त्याच्या मनाचा तळ कसा शोधता येणार?

काहींच्या हातात सुखाच्या झाडाची अशी एखादी छोटी फांदी आलेली असते; आणि त्या वस्त्रगाळ सावलीतही आयुष्यातल्या अनेक उन्हाळ्यांपासून त्यांचं संरक्षण होत राहतं. निसर्गनियमानुसार ऊन-पावसाचे दिवस येत-जात राहणारच. सुखाची सावली अनुभवण्यासाठी दोन-चार पानांचे कोवळे तळवेही पुरेसे होतात.

सुखाची फांदी आपल्या हाती यायची तेव्हा येवो; पण त्या फांदीच्या आजूबाजूला असलेल्या नाजूक-पोपटी बोटांशी लवलवणारी पालवी जोडायला आपण एकेक पान तर सहजच जमा करून ठेवू शकतो. अशी पालवी भोवताली पसरलेली असते; आपण ती उचलून घ्यायची, एवढंच. परस्परांना मदत करणारे हात आपण पुढं केले, तर त्यांना स्वीकृतीचा प्रतिसाद मिळतोच; शिवाय हा प्रतिसादी हात या पूर्वसंस्कारांनी आणखी कुणापर्यंत तरी मदतीचं ताजं पान घेऊन जातो. माणसांच्या गरजा तशा खूप छोट्या असतात. ओझं उचलून एखाद्याच्या डोक्‍यावर ठेवायला दुसऱ्याच्या एका हाताचा आणि अल्प शक्‍तीचा वापर पुरेसा होतो. तिथं तेवढ्या मदतीचीच गरज असते. कुणाला एखाद्या प्रश्नावर अनुभवी सल्ला हवा असतो, कुणाला काही नवं शिकायचं असतं, कुणाला मानसिक आधाराची गरज असते, कुणाला प्रेमाचे चार शब्द हवे असतात, कुणाला सहानुभूतीची फुंकर पुरेशी असते. कुणाला रस्ता ओलांडायला हाताचा आधार हवा असतो; तर कुणाला यशाचं कौतुक करणारं जवळचं माणूस हवं असतं. दुसऱ्याच्या मदतीसाठी अमर्याद संधी आहेत; आपण त्या शोधणं महत्त्वाचं असतं. असल्या छोट्या गोष्टी आपण सगळेच करू शकतो. माणसाच्या आयुष्याची तीच तर सार्थकता आहे. ही सारी कृत्यं म्हणजे सुखाच्या फांदीची मखमली आनंदपालवी असते. ती जमा करीत गेल्यानंच फांदीचं अस्तित्व आकाराला येतं. पालवी जमा केलीच नाही, तर सावली कुठून मिळणार? ज्यांना अशा पानांची आणि फांद्यांची गुंफण करण्याचा छंद जडेल, त्यांच्यापुढं सुखाच्या-समाधानाच्या पायघड्या उलगडत जाणारच. दुसऱ्याला मदत करून आपण आपलं जगणं अर्थपूर्ण करीत असतो.

वत्सलतेची छाया अंथरण्याचा धर्म कुठलीच सावली सोडत नाही. बघा तर खरं, तुमच्या जवळच सुखाच्या फांदीचं एक छोटं पान तुम्हाला हाकारतं आहे!

Web Title: editorial article malhar arankalle