परिवर्तनाचा उत्सव

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

आश्विन महिन्यात येणारे पावसाचे थेंब ओलसर ओंजळीत बहुधा फुलं घेऊन येत असावेत. आकाशातून येताना चमचमणारे हे रुपेरी गोल जमिनीवर पोचेपर्यंत मधल्या प्रवासात त्यांत रंग आणि गंध भरले जातात.

आश्विन महिन्यात येणारे पावसाचे थेंब ओलसर ओंजळीत बहुधा फुलं घेऊन येत असावेत. आकाशातून येताना चमचमणारे हे रुपेरी गोल जमिनीवर पोचेपर्यंत मधल्या प्रवासात त्यांत रंग आणि गंध भरले जातात.

पाऊसथेंबांची ही नक्षी मातीला भिडली, की रंग-गंधांचा स्तिमित करणारा महोत्सव जिकडंतिकडं डोलू लागतो. रंगांचे आणि गंधांचे हे थेंब परागकणांशी सूत जमवितात; आणि पाकळ्यांच्या मिटलेल्या तलमकोमल वाटा खुल्या करवून घेतात. फुलांचे मळे उमलून-बहरून आल्याचा गंधस्पर्शी अनुभव आपल्याला येतो. हे चित्र डोळ्यांच्या कॅमेऱ्यांत कायमस्वरूपी ठेवण्याचा मोह आवरता येत नाही; आणि मग रंगबावरी धून आपल्याला वेढून टाकते. बाहेर डोकावलात, तरी आत्ता, या क्षणी तुम्हाला अशा किती तरी पुष्पसड्यांचं दर्शन घडेल. आश्विनाची हीच तर खासीयत आहे. आश्विन हा महिनाच जणू रंगांचा असावा. हिरवागार, लुसलुशीत चारा खाऊन आणि वाहत्या खळाळांतलं पाणी पिऊन जनावरं जोगवावीत, तसं रसरसलेपण, भरलेपण सृष्टीत सगळीकडंच दिसतं आहे. निसर्गाकडं जेवढं म्हणून सर्जनशील आहे, सुंदर आणि उदात्त आहे, ते सारं त्यानं आता खुलं केलं आहे. मृगाच्या पावसाबरोबर जमिनीवर उमटलेली हिरवी नक्षी आता तशीच राहिलेली नाही.

तिचा हिरवटपणा बदलला आहे. तिचं रूप अधिक खुललं आहे. आजपासून नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होतो आहे. राजप्रासादातून प्रवेशित होताना दुतर्फा दिगंत वैभवाचं देखणेपण सामोरं यावं; आणि पुढं आलेलं राजदरबाराचं शाही रूप नजरबंदी करीत जावं, तसं नवरात्रोत्सव आणि विजयादशमी यांचंही आहे. निसर्गाच्या सौंदर्यप्रासादाचा उंबरठा आपण आज ओलांडतो आहोत.
पावसाळ्याची पावलं निघता निघता अडकत आहेत. शरदाच्या थंडीची चाहूल लावणाऱ्या आश्विन महिन्याचा प्रारंभ झाला आहे. शुद्ध प्रतिपदेच्या घटस्थापनेपासून सगळीकडं त्याचं स्वागत होतं आहे. नवरात्र हा परिवर्तनाचा उत्सव आहे. वाईट प्रवृत्तींचा नाश करून अधिकाधिक सात्त्विक होण्याचा प्रयत्न या काळापासून सुरू करावयाचा असतो. सीमोल्लंघनाला जाऊन आपण विजयादशमी साजरी करतो; पण आपल्या कर्तृत्वाचं सीमोल्लंघन आपण करतो का? विजय किंवा यश मिळविण्याच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती, सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वातून काढून, विजयपथावरून वाटचाल करण्यास आपण सिद्ध होतो का? नवरात्रकाळात अखंड दीपप्रज्वलन केले जाते. संकटांचा, अडथळ्यांचा अंधकार दूर करण्यासाठी अशा तेजाची आवश्‍यकता असते. नवरात्रातील हेच दीपतेज विजयादशमीला पराक्रमाच्या दुंदुभींनी गर्जून जातं; आणि तेजानं उजळून निघतं. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. अस्तित्व टिकविण्यासाठीही बदल स्वीकारावे लागतात. वनस्पतींचा, प्राणिसृष्टीचा हजारो वर्षांचा इतिहास बदलांच्या अशा अनेक खुणांनीच लिहिला गेला आहे. निसर्गही सतत बदलांचाच संदेश देत असतो. आपल्यातील अपूर्णता दूर केल्यास परिपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग आपोआप सापडेल. नवरात्रोत्सवाचा तोच अर्थ आहे.

Web Title: editorial article malhar arankalle