अग्रलेख : काळोखातल्या सावल्या!

 Mobile Security
Mobile Security

आपल्या हातातील साध्याशा मोबाईल फोनमध्ये एक अदृश्‍य गुप्तहेर दडलेला आहे आणि आपल्या प्रत्येक हालचालीवर तो पाळत ठेवतो आहे, ही कल्पनासुद्धा अंगावर शहारे आणणारी. कारण, आपल्या मोबाईलमध्ये काय नसते? बॅंक खात्याच्या पासवर्डपासून ते मित्र-मैत्रिणींच्या खासगी संदेशांपर्यंत कित्येक गोष्टींचा तिथे खच असतो. परंतु, आधुनिक हॅंडसेट आणि दळणवळणाचे हे तंत्रज्ञान सुरक्षित असल्याचा सेवापुरवठादार कंपन्यांचा निर्वाळा गृहीत धरून आपण निश्‍चिंत असतो. ‘व्हॉट्‌सॲप’वर धाडलेला संदेश, फोटो किंवा व्हिडिओ क्‍लिप दुसऱ्या कोणाला बघता येणारच नाही. कारण, आपला फोन पासवर्डच्या खुणेने किंवा परवलीच्या आकड्याने कडेकोट बंदिस्त आहे, असा आपल्याला आंधळा विश्‍वास असतो. काही मातब्बर मोबाईल कंपन्या तर हॅंडसेटमध्ये डोळ्यांच्या बुब्बुळांची खात्री पटवून मगच वापरासाठी तो उघडला जाईल, अशी योजना करून देतात. सुरक्षिततेसाठी आणखी काय हवे? पण, वरकरणी सेफ दिसणारे हे प्रकरण खरेच इतके सुरक्षित आहे काय? हा खरा सवाल आहे.

‘एंड टू एंड एन्क्रिप्शन’ची वारंवार ग्वाही देणाऱ्या ‘व्हॉट्‌सॲप’ने गेल्या आठवड्यात एका इस्रायली स्पायवेअर कंपनीला कॅलिफोर्नियाच्या कोर्टात खेचण्याची घोषणा केल्याने मोबाईलची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अधूनमधून अशी चर्चा समाज माध्यमांवर होतच असते. परंतु, दरवेळी संबंधित कंपन्या सुरक्षिततेची नवी दुहाई देतात आणि प्रकरण वाऱ्यावर विरते. या वेळी मात्र ‘व्हॉट्‌सॲप’नेच खासगी माहिती बेकायदा पद्धतीने गोळा केल्याच्या आरोपावरून दुसऱ्या कंपनीला कायद्याचा बडगा दाखवल्याने सारे काही आलबेल नाही, हे ठळकपणे उघड झाले. ‘एनएसओ’ नावाची इस्रायली कंपनी ‘पेगासस’ नावाचे स्पायवेअर तयार करते. विविध देशांच्या सरकारांना ‘योग्य’ मोबदला घेऊन हे स्पायवेअर वापरासाठी देऊ करते. स्पायवेअर म्हणजे गुपचूप चालणारे सॉफ्टवेअरच. एका विशिष्ट लिंकवर क्‍लिक केले, की ‘पेगासस’ सॉफ्टवेअर चोरपावलांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये शिरते आणि आपल्या नकळत फोनबुक, मेसेजेस, व्हॉइस कॉल्स, फोटोगॅलरी, पासवर्डस या खासगी माहितीवर डल्ला मारते. सौदी अरेबिया हा ‘पेगासस’चा सर्वांत मोठा ग्राहक असल्याचेही उघड झाले आहे. तथापि, ‘व्हॉट्‌सॲप’ने केलेल्या आरोपानुसार २०१९ च्या मे महिन्यात काही भारतीय पत्रकार, सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख यांच्या फोनवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगासस’चा उपयोग करण्यात आला. ‘व्हॉट्‌सॲप’च्या या दाव्यामुळे मोठीच खळबळ माजणे साहजिकच होते. ‘पेगासस’ची निर्माती कंपनी ‘एनएसओ’ने मात्र हा दावा फेटाळला असला, तरी नजीकच्या भविष्यात हे प्रकरण भारतातील राजकारण ढवळून काढेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

हे इस्रायली सॉफ्टवेअर फक्‍त देशोदेशीच्या सरकारांनाच उपलब्ध होऊ शकते, खासगी कंपन्यांना नव्हे. मग भारतात त्याचा वापर करण्याची परवानगी कोणी दिली? कोणाकोणाचे फोन असे ‘चोरून’ बघण्यात आले? का बघण्यात आले? साडेपाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा या नव्या ‘स्नूपगेट’शी काही संबंध आहे काय? असे बरेच सवाल उभे राहिले आहेत. हे संशयाचे धुके लवकरात लवकर निवळले तर बरे; अन्यथा देशातील आर्थिक आणि सामाजिक वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही. समाज माध्यमांचा भारतातला वापर हा अजस्त्र म्हणावा लागेल. ‘व्हॉट्‌सॲप’, ‘ट्विटर’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ अशा शेकडो ॲप्सच्या जोरावर या देशातील सामाजिक कारभार चालू असतो. समाज माध्यमे हा आता फक्‍त संपर्काचा मार्ग राहिला नसून, ते नव्या युद्धनीतीमधले प्रमुख अस्त्र ठरू लागले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छुपे युद्ध माध्यमांमध्येच खेळले जाते आहे, हे तर आपण रोजच पाहतो. निवडणुका तर हल्ली डिजिटलीच लढल्या जातात. धार्मिक श्रद्धांचा मुद्दा आला, की हीच माध्यमे प्रसंगी विखारी बनलेली आपण अनुभवली आहेत. मनात जसे देवाचे अधिष्ठान असते, तशीच सैतानाची पिलेही दडून असतात. त्याचे प्रत्यंतर सर्वाधिक कुठे येत असेल, तर ते समाज माध्यमांमध्ये. देशोदेशीच्या गुप्तहेरांचे किंवा विशिष्ट पंथातील अनुयायांचे ‘ब्रेनवॉशिंग’ केल्याचे किस्से आपण वाचतो, टीव्हीवर ऐकतो. परंतु, हे सारे दुसऱ्याच्या बाबतीत घडत असल्याने त्याची फार फिकीर केली जात नाही. परंतु, ‘ब्रेनवॉशिंग’ आपलेही केले जाऊ शकते. किंबहुना, या घटकेला ती प्रक्रिया चालू आहे, याची जाणीव आपल्याला नसते. कारण, यासाठी अन्य कोठे जावे लागत नाही. हे सैतानी हल्ले आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातूनच होत असतात. यावर कुठल्याही व्यवस्थेचे नियंत्रण अजून तरी नाही. मानवी विकारांचे नियमन करणारे एखादे ॲप भविष्यात निर्माण झाले, तरी ते योग्य हातांमध्ये पडले तर ठीक; अन्यथा काळोखात वावरणाऱ्या या सावल्या उघड्यावर येतील आणि त्यांचे सैतानी रूप थरकाप उडवणारे असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com