भाष्य : ट्रम्प यांच्या मनमानीला लगाम

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सभापती नॅन्सी पेलोसी.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सभापती नॅन्सी पेलोसी.

वेळ येईल तेव्हा अमेरिकी संसद आपला अंकुश वापरू शकते, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीचा विचार करता, या कारवाईचा ट्रम्प यांना मोठा राजकीय तोटा होणार नसला, तरी त्यांच्या कारकिर्दीला लागलेला हा बट्टाच आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने म्हणजे प्रतिनिधीगृहाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर केला.

महाभियोगासारखा खटला ट्रम्प यांच्या मागे कसा लागला हे आणि त्याची पुढील वाटचाल, त्याचे परिणाम समजून घेतले पाहिजेत. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहात ट्रम्प यांच्यावर दोन कारणांसाठी हा खटला चालवला गेला. ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी आणि अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांच्या पुत्राचा युक्रेनमध्ये व्यवसाय आहे. ज्यो बिडेन हे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या विरोधातील डेमोक्रॅटिक पक्षाचे २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांची प्रतिमा मालिन करण्याच्या हेतूने ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव आणला. बिडेन यांच्या पुत्रावर भ्रष्टाचाराचा आरोप करून युक्रेनने त्याची चौकशी करावी, तरच अमेरिका युक्रेनला आर्थिक मदत करील, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली. ट्रम्प यांनी वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी अमेरिकी संसदेने मंजूर केलेली आर्थिक मदत अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पदाचा गैरवापर केल्याने एकच गदारोळ झाला.

अमेरिकेत कायदेमंडळाने याची चौकशी सुरू केल्यानंतरसुद्धा ट्रम्प हे, ही चौकशी थोतांड असल्याची टिप्पणी करीत राहिले. हे महाभियोगाचे पहिले कारण. कायदेमंडळाने ‘व्हाइट हाउस’मधील अधिकारीवर्गाला चौकशीसाठी बोलावले असता, ट्रम्प यांनी त्यांना रोखत सरकारी कामात अडथळा आणला हे दुसरे कारण. लबाडी करण्यात ट्रम्प पटाईत आहेत. किंबहुना कायम वादाच्या चर्चेत राहून आपला कार्यभाग साधून घेणे ही त्यांची शैली आहे. 

डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असलेल्या प्रतिनिधीगृहात महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता तो संसदेच्या वरच्या सभागृहात मंजुरीसाठी पाठवला जाईल. असा खटला चालविले गेलेले ट्रम्प हे अँड्रयू जॅक्‍सन आणि बिल क्‍लिंटन यांच्यानंतरचे तिसरे अध्यक्ष आहेत. १९७४ मध्ये ‘वॉटरगेट’ प्रकरणामुळे रिचर्ड निक्‍सन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत महाभियोग टाळला होता. १९९८मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरणात क्‍लिंटन यांना दोषी ठरवले होते. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती. ट्रम्प यांचे वर्तन तर त्यापेक्षा कैक पटींनी चुकीचे आहे. त्याला अर्थकारणाची आणि राष्ट्रीय सुरक्षेची गडद किनार आहे. मात्र, ट्रम्प यांच्याकडून माफी मागणे तर दूरच, ट्रम्प आपली चूक मान्य करतील, असे वाटत नाही.

व्लादिमीर पुतीन, अब्देल फतेह अल-सीसी, मोहंमद बिन सलमान, जैर बोलसोनॅरो, बोरिस जॉन्सन अशा उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचे प्रतिनिधित्व ट्रम्प करतात. महिलांबद्दल वक्तव्ये, मुस्लिमांना अमेरिकेत मज्जाव, मेक्‍सिकोचा सीमावाद, ‘नाटो’मधील आडमुठी भूमिका अशा अनेक विषयांत ट्रम्प ‘वेगळे’ धोरण राबवतात. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला व्यावसायिक नफ्याचा आणि अर्थकारणाचा वास आहे.

क्‍यूबावर निर्बंध घालण्याच्या आधी क्‍यूबातील प्रसिद्ध सिगारेटचा साठा करणारे जॉन केनेडी, इराणचे तत्कालीन सर्वेसर्वा अयातोल्ला खोमेनी यांच्याशी थेट राजकीय सौदा करणारे रोनाल्ड रेगन, पदाचा दुरुपयोग करून आपल्या पोळीवर ‘तेल’ ओतून घेणारे बुश पिता-पुत्र, असे अमेरिकी राजकारण्यांचे अनेक दाखले देता येतील. अमेरिकी अध्यक्षपदाचा स्वार्थासाठी वापर न करणारे नेते तसे फारच दुर्लभ. तेव्हा व्यावसायिक असणाऱ्या ट्रम्प यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे ठरते. पण, म्हणून व्यवस्थेतील काहीएक विवेकाचे भानसुद्धा न ठेवता उघडउघड ओरपायचे, हे ट्रम्प यांचे दुसऱ्या अर्थाने वेगळेपण आहे. कसलाही अनुभव नसताना त्यांच्या मुलीची प्रशासनात उच्चपातळीवर लुडबूड, जावयाकडे थेट पश्‍चिम आशियातील पेच सोडवण्याची जबाबदारी, खासगी वकिलांना दुसऱ्या देशांतील बड्या नेत्यांशी वाटाघाटी करायला पाठवणे, खासगी सहकाऱ्यास सरकारी कागदपत्रे हाताळायला लावणे, असे प्रताप ट्रम्प यांनी केले आहेत. निवडणुकीच्या काळात आणि हाताशी वेळ कमी राहिला असताना तर ते पोकळ घटनांना मुलामा देऊन आपली पाठ थोपटून घेतील. त्यामुळे, येते नऊ-दहा महिने अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडी जग कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज देतील. 

अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहात महाभियोगाच्या खटल्यावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य आहे, तिथे हा खटला संमत होईल अशी शक्‍यता नाही. २०१५-१६ च्या दरम्यान ट्रम्प यांची सर्रास निंदा करणारे रिपब्लिकन नेते आज एका मर्यादेबाहेर आवाज उठवत नाहीत. डझनभर अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणारे, स्वपक्षात खदखद असताना पक्षांतर्गत विरोधकांना बाजूला सारून, आपला दरारा राहील याची तजवीज करून, जमेल त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची कला ट्रम्प यांना साधली आहे. त्यामुळे नोव्हेंबर२०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत ट्रम्प अमेरिकी अध्यक्ष असतील. सर्वेक्षणात दिसून आलेले जनतेचे समर्थन पाहता रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असे दिसते.

तसेच, आगामी अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांच्या प्रतिस्पर्धी गटातील उमेदवारांना अजून तरी सूर गवसलेला नाही. प्रत्यक्ष मतदानाला अजून बराच अवधी असला, तरी आजचा विचार करता ट्रम्प यांचे पारडे जड मानले जात आहे. इम्रान खान आणि नरेंद्र मोदींप्रमाणेच ट्रम्प यांच्यामागे समाजमाध्यम समर्थकांची मोठी फौज आहे.

त्याचबरोबर, स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत ट्रम्प यांची कामगिरी उजवी आहे. आपल्या विरोधातील खटला हा सर्वसामान्य अमेरिकी जनतेविरोधी असल्याचा कांगावा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. येत्या काळात ते या प्रकरणाचे मोठ्या प्रमाणावर भांडवल करून प्रचारात रंग भरतील. शेकून निघालेल्या या प्रकरणाचा धडा घेऊन ट्रम्प यापुढे नेमस्त कारभार करतील अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. त्यांची कार्यपद्धती आणि सर्वार्थाने वेगळा असलेला राजकीय पिंड त्यांना या गोष्टी संयतपणे हाताळायला शिकवेल असे नाही. पण, महाभियोगाच्या खटल्याने त्यांच्या ‘मी’पणाला तडा देत, त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक कारकिर्दीत पहिल्यांदाच जाहीरपणे पुरावे सिद्ध करून त्यांना जाब विचारला आहे. अनेक भानगडी करून आपली वाट सुकर करायची आणि भानगडी या ना त्या मार्गाने झाकायच्या, असे ट्रम्प यांचे एकूण धोरण राहिले आहे. त्याला आता त्यांना काहीशी मुरड घालावी लागेल.

याचा मोठा राजकीय तोटा त्यांना होणार नसला, तरी त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीला लागलेला हा बट्टा आहे; ज्याचा डाग त्यांना ना सत्तेने पुसता येईल, ना पैशाने. राष्ट्रवादाचा हुंकार, उजवी विचारसरणी आणि त्याच्या जिवावर मिळणारे बहुमत म्हणजे कोरा चेक नसून, वेळ पडेल तेव्हा अमेरिकी संसद आपला अंकुश वापरू शकते, हा जुना धडा या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. अमेरिकेत अशी नोंद होणे ही दुर्मीळ गोष्ट. त्यामुळे, ही सुनावणी फक्त एक प्रक्रिया न राहता ट्रम्प यांच्या बेबंदशाहीला घातलेला लगाम म्हणून इतिहासात नोंद होईल, जे नक्कीच अभूतपूर्व आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com