बेरीज आणि वजाबाकी

Rajyasabha
Rajyasabha

राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला.

लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील एकजुटीचे दर्शन घडवण्याची संधी काँग्रेससह तमाम विरोधकांनी गमावली आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’चे उमेदवार हरिवंश नारायण सिंग यांनी काँग्रेस आघाडीचे हरिप्रसाद यांचा सर्व अडथळ्यांवर मात करून पराभव केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आधीच दिवाळी साजरी झाली. या निवडणुकीस अनेक अर्थाने महत्त्व होते आणि राज्यसभेत भाजपच्या तुलनेत एकत्रित विरोधकांकडे अधिक संख्याबळ असल्याने, या निवडणुकीत खलबतखान्यातील मनसुब्यांना भलतेच महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे एकीकडे देशातील मैदानी लढतीत सातत्याने विजय मिळवणाऱ्या भाजपने या मुत्सद्देगिरीच्या लढतीतही विरोधकांचा पराभव केला आणि बेरजेच्या राजकारणात बाजी मारताना, तथाकथित विरोधी ऐक्‍यातही मोठीच वजाबाकी घडवून आणली.

खलबतखान्यातील मनसुब्यांच्या या लढतीत भाजपने खरे तर निवडणुकीआधीच बाजी मारली होती, ती स्वपक्षीय उमेदवार उभा न करता नितीशकुमार यांच्या जनता दल (यू.) पक्षास उमेदवारी देऊन! विरोधी बाकांवरील काही पक्ष हे भाजपऐवजी अन्य पक्षीय उमेदवार असला, तर त्यास मतदान करतील, ही मोदी तसेच शहा यांची अटकळ खरी ठरली आणि त्यामुळेच हरिवंश सिंग यांचा विजय झाला आहे!

मोदी तसेच शहा यांनी ही खेळी करताना, एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. नितीशकुमार यांच्या पक्षास राज्यसभेचे उपाध्यक्षपद बहाल करण्याच्या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासमवेतची आघाडी पक्की तर झालीच; शिवाय या निवडणुकीत बिजू जनता दलाच्या नऊ खासदारांची मते वळवण्यात  ते यशस्वी  झाले. मोदी-शहा यांची
ही चाल कमालीची यशस्वी ठरली. आपल्या पक्षास उमेदवारी मिळताच, नितीश यांनी नवीन पटनाईक यांना एक दूरध्वनी करून त्यांचे मन वळवले आणि शेवटच्या क्षणी मोदी यांनी केलेल्या दूरध्वनीमुळे पटनाईक यांचा निर्णय पक्‍का झाला. खरे तर ओडिशामध्ये पटनाईक यांचा प्रथम क्रमांकाचा विरोधक भाजपच आहे. तरीही त्यांच्या खासदारांनी ‘रालोआ’च्या
उमेदवाराच्या पारड्यात आपली मते टाकली. भाजपच्या दृष्टीने जमेची आणखी एक मोठी बाब म्हणजे गेली चार वर्षे सातत्याने मोदी यांच्यावर थेट तोंडसुख घेणाऱ्या आणि अविश्‍वास ठरावावर बहिष्कार टाकून विरोधकांना बळ देणाऱ्या शिवसेनेने घेतलेली कोलांटउडी! शहा यांनी संजय राऊत यांना घातलेली गळ या वेळी शिवसेनेला थेट ‘रालोआ’च्या गोटात घेऊन गेली. या साऱ्या वेगवान घडामोडी केवळ राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या नव्हे तर लोकसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपला मोठाच दिलासा आहे. त्यामुळेच मग भाजप आनंदोत्सव साजरा न करते, तरच नवल होते! एकीकडे भाजप या बेरजेच्या गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवत असताना, काँग्रेस तसेच अन्य विरोधक हे काठावरही उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. राज्यसभेत सध्या ‘आम आदमी पक्षा’चे तीन खासदार आहेत आणि त्यांची काँग्रेसच्या बाजूने लढायची तयारीही होती. मात्र, त्यांची मागणी अगदीच साधी होती आणि ती म्हणजे राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना केवळ एक दूरध्वनी करण्याची होती. राहुल गांधी यांनी म्हणे दिल्लीतील आगामी राजकारणाचा विचार केला आणि केजरीवाल यांना फोन करण्याचे टाळले! त्यामुळे ‘आप’च्या तीन खासदारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आणि तेही काँग्रेस आघाडीत वजाबाकी करताना, भाजपलाच फायद्याचे ठरले! या पार्श्‍वभूमीवर आता विरोधकांना आपल्या एकुणातच राजनीतीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वंदना चव्हाण यांना काँग्रेसने देऊ केलेली उमेदवारी शरद पवार यांनी नाकारली, असे सांगण्यात येते. सगळा घटनाक्रम पाहता सत्ताधाऱ्यांनी बेरजेचे तर विरोधकांनी वजाबाकीचे राजकारण केल्याचे दिसते. या प्रश्‍नाचाही विरोधकांच्या या आघाडीला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. मोदी यांचा पटनाईक यांना गेलेला एक दूरध्वनी ‘रालोआ’ला विजयाच्या दिशेने घेऊन गेला, तर राहुल यांनी न केलेला दूरध्वनी विरोधकांना भलताच महाग पडला. ही अशी रणनीती विरोधक अमलात आणणार असतील, तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभे करण्याचे विरोधकांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहू शकते. राज्यसभा उपाध्यक्षपद निवडणुकीत रंगलेल्या राजकीय नाट्यातून मिळालेला तोच धडा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com